सिन्नर (जि. नाशिक) : ग्रामीण (Rural) भागातील सरकारी आरोग्य सुविधांकडे (Government health facilities) प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सायंकाळी सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील प्राथमिक केंद्रात घडला. डिलीवरीसाठी दाखल व्हायला आलेल्या गर्भवतीस तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा सल्ला देत त्यासाठी आरोग्य केंद्राच्या दारात उभी असलेली सरकारी नव्हे तर खाजगी रुग्णवहिका (Private ambulance) अथवा वाहन घेऊन जायला सांगत महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने आरोग्य केंद्राच्या पायरीवरच तासभर या रुग्णाला तिष्ठत ठेवल्याने या सौजन्याप्रति संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उजनी ता. सिन्नर येथे प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या गर्भवतीस पोटात दुखू लागल्याने तिच्या वडिलांनी मित्राच्या कारमधून बुधवारी सायंकाळी 6 वाजता देवपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. यावेळी नियुक्तीस असलेले दोघे वैद्यकीय अधिकारी त्यांच्या सरकारी क्वार्टर मध्ये होते. केंद्रात उपस्थित एकमेव आरोग्य सेविकेने रुग्ण महिलेची जुजबी माहिती घेतल्यावर काही वेळाने डॉ. अंजली विटेकर तेथे आल्या. सदर महिलेची पहिलीच प्रसूती असल्याने तिला सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला त्यांनी दिला. आमच्याकडे वाहन नसल्याने आरोग्य केंद्रात असलेल्या शासकीय रुग्णवाहिकेतून मुलीला सिन्नरला रुग्णालयात सोडण्याची विनंती रुग्णाच्या वडिलांनी केली.
फोन लावा मोफत रुग्णवाहिका बोलवा
मात्र आमच्या कडे असलेल्या रुग्णवाहिकेचा चालक सुट्टीवर असल्याने तुम्हीच पर्यायी व्यवस्था करून रुग्ण हलवा असे डॉ. विटेकर यांनी सांगितले. आमची परिस्थिती चांगली असती तर मुलीला सरकारी दवाखान्यात आणले नसते असे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितल्यावर 108 क्रमांकावर फोन लावून मोफत रुग्णवाहिका बोलवा असे सांगून वेळ मारून नेण्यात आली.
त्यानंतर संपर्क साधल्यावर तब्बल तासाभराने वावी येथील 108 रुग्णवाहिका देवपूरला पोहोचली. टायरमधून तारा निघालेली व अगोदरच रुग्णशय्येवर असलेल्या या 108 रुग्णवाहिकेतून केवळ नाईलाज म्हणून प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णाला सिन्नरला हलवण्यात आले. मात्र, रुगनवाहिका येईपर्यंत या महिला रुग्णास आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साधे विश्रांतीसाठी देखील आत घेण्याचे सौजन्य दाखवले नाही. रुग्ण वाहिका येईपर्यंत ही महिला केंद्राच्या पायरीजवळ आपल्या वेदना सोसत पहुडली होती.
"आरोग्य केंद्राच्या रुग्ण वाहिकेचा चालक गावातीलच असून मानधन तत्वावर सेवेत आहे. बुधवारी दुपारी या चालकाचे घरातील व्यक्तीत त्रास होत असल्याने तो तातडीच्या उपचारासाठी बाहेरगावी दवाखान्यात घेऊन गेला होता. त्यामुळे दुर्दैवाने उजनीहून आलेल्या महिलेस रुग्णवाहिका उभी असूनही सेवा देता आली नाही. सदर रुग्णाचे रिपोर्ट बघिल्यावर प्रसूतिदरम्यान अडचण येऊ नये म्हणून सिन्नर येथे जाण्याचा सल्ला सहकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. विटेकर यांनी दिला होता."
- डॉ. प्रशांत थोरात, वैद्यकीय अधिकारी, देवपूर
चार दोन कर्मचारी सोडले तर देवपूर आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी केवळ पाट्या टाकण्याचे काम करत असल्याची चर्चा आहे. वेळेवर ड्युटीवर न येणे, रुग्णांशी अरेरावीने वागणे असा प्रकार येथे नेहमीच घडत असतो. शासनाने नुकतीच नवी कोरी रुग्णवाहिका दिली आहे. या रुग्णवाहिकेचा परिसरातील रुग्णांना योग्य उपयोग झाला पाहिजे यासाठी नियोजन व्हावे अशी अपेक्षा कालच्या घटनेनंतर व्यक्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.