नाशिक रोड : नाशिक रोडचा भाजी बाजार सध्या अवैध हप्ता वसुलीचे केंद्र ठरत आहे. हप्ता वसुली आणि श्रेयवादावरून नुकताच युवकाचा खून झाल्यानंतर नाशिक रोडचा भाजी बाजार चर्चेचा विषय ठरत आहे. यातून संघटित गुन्हेगारी जन्माला येत असून नवीन गुन्हेगार तयार होत आहे. उड्डाणपुलाखालील भाजी बाजार, राजेंद्र कॉलनी आणि अण्णा हजारे मार्ग येथील भाजी बाजारावर महापालिका कारवाई करत नाही.
म्हणून येथे भाजी विक्री सर्रास रस्त्यावर केली जाते. पर्यायाने गावगुंड रोज दहा- वीस रुपये हप्ता वसुली करतात. असे सहाशे ते आठशे भाजीपाला विक्रेते आहेत. जे नाशिक रोडच्या रस्त्यांवर अवैध भाजी विक्री करतात. (Residence of Rajendra Colony fighting since 15 years to Vegetable market becoming installment collection Nashik News)
आजपर्यंत गेले पंधरा वर्षात भाजी बाजाराच्या वर्चस्वावरून सहा खून झाले आहेत. तरीही हा भाजी बाजार रोज या ठिकाणी अवैधरीत्या भरतो. गावगुंड रोज विक्रेत्यांकडून दहा ते वीस रुपये हप्ता वसुली करतात. दिवसभरात तब्बल पाच ते सात हजार रुपये हप्ता वसुली होते. महिन्याची अवैध हप्ते वसुली लाखांत आहे. म्हणून यातून संघटित गुन्हेगारी जन्माला आली आहे. नाशिक रोडचा हा अवैध भाजी बाजार सध्या गेल्या पंधरा वर्षापासून चालू आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक गावगुंडांचे मोठे अर्थपूर्ण संबंध आहे. आयुक्त आणि उपायुक्त नागरिकांनी आवाज उठवूनही लक्ष घालत नाही. गेल्या पंधरा वर्षापासून राजेंद्र कॉलनी, अण्णा हजारे मार्ग येथील रहिवासी, दुकानदार यांचा अवैध भाजी बाजार हटवण्यासाठी लढा सुरू आहे. आजपर्यंत पाचशेहून अधिक ऑनलाइन आणि ऑफलाइन तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, त्याची दखल तात्पुरती घेतली जाते.
"गेल्या पंधरा वर्षापासून भाजी बाजार उठवण्यासाठी लढा सुरू आहे. मात्र अतिक्रमण विभाग आणि प्रत्येक वेळेस आयुक्त प्रश्नाकडे कधीच गांभीर्याने पाहत नाही. पर्यायाने येथे भाजी विक्रेते ठाण मांडून आमच्यावरच दादागिरी करतात. पाचशेहून अधिक तक्रारी दिल्या, त्याचा काहीच फायदा झालेला नाही." - डॉ. प्रिया राजहंस, स्थानिक रहिवासी
"महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंध बाजाराशी जोडले असल्याचा संशय आहे. राजेंद्र कॉलनी, अण्णा हजारे मार्ग येथील भाजी विक्रेत्यांमुळे ग्राहकांना गाडी लावायला जागा राहत नाही. शिवाय हे भाजीवाले दुकानाच्या बाहेरच भाजी विक्री करीत असल्यामुळे रोजच कटकटी होतात." - जितू कुकरेजा, स्थानिक व्यापारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.