प्रतीक जोशी : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : शहरात पोलिस आयुक्त दीपक पांडे (deepak pandey) यांच्या सूचनेने ‘नो हेल्मेट-नो पेट्रोल़' (no helmet no petrol) ही मोहीम सुरू झाली आहे. शहरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत हेल्मेटच्या वापरायला सुरूवातही केली. पण काही नागरिक अजूनही हेल्मेट घालायला तयार नाहीये. खरं तर हेल्मेटची झालेली सक्ती ही प्रशासनाचा नियम आहे, म्हणून पाळावी असे नाही, तर ते आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी घालायचे आहे हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजे. शहरात अनेक रस्ते अपघात होत असतात. यात अनेकांना हेल्मेट न घातल्यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. पण अनेकदा अपघात झाला पण डोक्यात हेल्मेट घातलेलं असल्याने जीव वाचल्याची उदाहरणे आहेत.
नाशिक शहरातील रहिवासी नरेंद्र भास्कर पटेकर हा तरुण २० जानेवारी २०२१ ला रात्री नऊच्यादरम्यान स्पोर्ट बाईकने पंचवटीतून रामवाडीमार्गे अशोकस्तंभ येथे येत असताना घारपुरे घाटात एका चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती, की ते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडले. या अपघातात त्यांना मोठ्या प्रमाणावर मार लागला. चार महिने हात फ्रॅक्चर होता. गाडी तर पुर्णपणे चक्काचूर झाली. केवळ डोक्यात हेल्मेट असल्याने आपला प्राण वाचला अशी प्रतिक्रिया नरेंद्र यांनी सकाळशी बोलताना दिली.
रस्त्याने प्रवास करताना आपण जरी व्यवस्थित वाहन चालवत असलो, तरी समोरून येणारे वाहन आपल्याला धडकू शकते आणि अशा वेळेस हेल्मेट घातले असेल तर आपला प्राण वाचू शकतो. त्यामुळे सर्वांनी दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट घालणे आवश्यक आहे असेही नरेंद्रने सांगितले.
माझा अपघात इतका भीषण होता, की माझ्या गाडीचा झालेला चक्काचूर पाहून मलाच आश्चर्य वाटले. केवळ हेल्मेट घातले होते म्हणून माझा जीव वाचला अन्यथा त्या अपघातात माझा डोक्याला गंभीर इजा झाली असती. म्हणून मी माझ्या अनुभवावरून सर्वांना विनंती करेन की कृपया दुचाकी चालवताना आपण नेहमी हेल्मेट वापरावे. कारण आपला जीव अमूल्य आहे.- नरेंद्र भास्कर पटेकर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.