सातपूर (जि. नाशिक) : औद्योगिक क्षेत्रात कुठलाही अपघात होऊ नये, यासाठी कंपनी प्रशासनाबरोबर औद्योगिक सुरक्षा विभागातर्फे प्रयत्न केले जातात. त्यासाठी विभागातर्फे वेळोवेळी उपाययोजनाही केल्या जातात, सुचविल्या जातात.
मात्र दुर्दैवाने एखाद्या अनैसर्गिक कारणामुळे अपघात झाला, तर त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. औद्योगिक सुरक्षा विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे हजारो कामगारांचे जीव वाचवले जातात. यावरही चर्चा होणे अपेक्षित आहे. कदाचित त्यातून उपायायांबाबत सुधारणा करता येईल. अलीकडे औद्योगिक क्षेत्रात पॉवर प्रेसमध्ये पुरुषांबरोबरच महिला कामगारांची संख्याही वाढत आहे.
या महिलांबाबत सर्वच आस्थापनांनी विशेष काळजी घ्यावी, यासाठी प्रयत्न करणार, असल्याचे औद्योगिक सुरक्षा विभागाच्या नवनियुक्त सहसंचालक अंजली आडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. (Safety of women workers first priority statement of Anjali Ade nashik Latest Marathi News)
देशात सर्वांत वेगाने महाराष्ट्रात औद्योगिक विकास होत असून, त्यातही उत्तर महाराष्ट्र आघाडीवर आहे, असे सांगून श्रीमती आडे म्हणाल्या, की नाशिकबरोबरच अहमदनगर, जळगाव तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतही कारखानदारी वाढत आहे.
दोन वर्षापूर्वी कोरोनामुळे जगातील सूत्रच बदलून गेले. कधीकाळी अतिशय बोटावर मोजण्याइतका महिलावर्ग औद्योगिक क्षेत्रात पाहायला मिळत होता. पण आता बहुतांश आस्थापनात महिला कामगारांची संख्या वाढली आहे.
बहुतांश कंपन्यांमध्ये लेथ मशिन, ग्राईडर, ड्रिलिंग, वेल्डिंगसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सीएनसी मशिन चालवताना महिला दिसत आहेत. महिलांमधील चिकाटी व कामातील सातत्य हाच खरा गुण असल्याचे विविध एचआर व्यवस्थापनांचे म्हणणे असून, औद्योगिक क्षेत्रात सर्वच कामात महिलांची संख्या वाढत आहे.
त्यामुळे मी एक महिला अधिकारी या नात्याने माझीही जबाबदारी वाढली आहे. पुरुष कामगारांबरोबर महिला कामगारांच्या सुरक्षेसाठी सर्वच आस्थापनात अधिक सक्षम उपायोजना करण्याबाबत विशेष लक्ष देणार आहे.
पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबादसह महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात पॉवर प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बोटं व हात तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे औद्योगिक सुरक्षा विभागतर्फे विशेष लक्ष देण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे.
दरम्यान, दिंडोरी येथील एका कंपनीत अपघात झालेल्या कामगारांच्या मृत्यूनंतर त्या कामगाराच्या पत्नीला त्याच कंपनीने ऑफिस कामावर घेण्यासाठी प्रयत्न केले व आस्थापनानेही मोठ्या मनाने त्यासाठी होकार दिल्याने एका कुटुंबाला आधार मिळाला, याचे समाधान असल्याचही श्रीमती आडे म्हणाल्या.
"दिंडोरी येथील मेगाफाइन कंपनीतील कामगार संदीप गायकवाड यांचा अपघातात मृत्यू झाला. याच कंपनीत त्यांची पत्नी कविता यांना कामावर घेण्यासाठी औद्योगिक सुरक्षा विभागाने प्रयत्न केले, त्याला यश मिळाले. त्यामुळे एका कुटुंबाला आधार मिळाला आहे, याचे समाधान वाटते. "
- अंजली आडे, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा विभाग, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.