सटाणा (जि. नाशिक) : गुलाबी थंडीत येथील मविप्र संचालित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व श्रीशक्ती शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित डिव्हाईन इंग्लिश मीडियम स्कूल या परीक्षा केंद्रांवर चिमुकल्यांनी सप्तरंगाची उधळण करीत ‘सकाळ’च्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा मनसोक्त आनंद लुटला. (SAKAL Drawing Competition 2023 Children in satana drawn from brush nashik news)
स्पर्धेच्या निमित्ताने शहर व तालुक्यातील शाळांना आज नंदनवनाचे स्वरूप प्राप्त झाले होते. विषयांची विविधता आणि रंगांची निवड यांचा समतोल साधण्यात चिमुकले चांगलेच गुंतले होते. प्रत्येकजण आपल्या कुंचल्यांमधून जणू सप्तरंगच उधळतोय, असे चित्र निर्माण झाले होते. जिजामाता हायस्कूल, डिव्हाईन इंग्लिश मीडियम स्कूल केंद्रावर बालचित्रकारांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे आज सर्वत्र चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. थंडी आणि रविवारची सुटी असूनही शहर व तालुक्यातील हजारो बालचित्रकारांनी आजची सकाळ रंगांच्या अनोख्या दुनियेत रंगवली. ‘सकाळ’च्या यंदाच्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या शाळकरी बच्चेकंपनीसाठी आजचा रविवार मस्त रंगीबेरंगी ठरला.
चिमुकल्यांचा स्पर्धेसाठीचा उत्साह भारावून टाकणारा होता. आज सकाळी नऊला येथील डिव्हाईन स्कूल केंद्रावर संस्थेचे सचिव दीपक सोनवणे, तर जिजामाता गर्ल्स हायस्कूल केंद्रावर प्राचार्या श्रीमती बी. बी. सावकार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. संस्थेचे विश्वस्त जयसिंग दात्रे, मुख्याध्यापिका रेणुका सोनवणे, उपमुख्याध्यापक बी. जी. सूर्यवंशी, प्रा. किरण दशमुखे यांनी स्पर्धेचे काम पाहिले.
पहिली-दुसरी, तिसरी-चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा चार गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. रविवारची सुटी असूनही मुलांनी विविध प्रकारचे रंग आणि ब्रश घेऊन शाळांमध्ये सकाळी आठपासूनच हजेरी लावायला सुरवात केली होती.
परीक्षेची वेळ सुरू झाल्यानंतरही अनेक पालक त्यांच्या मुलांना केंद्रांवर घेऊन येत होते. तर काही केंद्रांवर गर्दी वाढल्यामुळे पालकांनीदेखील शिक्षकाची भूमिका चोखपणे पार पाडली. स्पर्धेदरम्यान गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे, मुख्याध्यापक एस. बी. कोठावदे, मुख्याध्यापक पंकज दातरे आदींनी भेट देऊन चिमुकल्यांना प्रोत्साहन दिले.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी कलाशिक्षक अरुणकुमार भामरे, एन. जे. जाधव, डी. बी. सोनवणे, नंदकिशोर शेवाळे, दीपाली गोसावी, पूनम वीरगावकर, सुनील लाड, महेंद्र म्हसदे, पवन नाडेकर, शेखर दळवी, दीपक जाधव, विनोद अहिरे, ए. एन. बागूल, अजय शेवाळे, स्वाती बोरसे, सुनंदा सावंत, स्नेहल भोसले,
कल्पना पवार, राधिका जाधव, दीपाली सोनवणे, सारिका खैरनार, हर्षदा सोनवणे, नेहा देवरे, मनीषा गंगावणे, आशा सोनवणे, पूजा कुमावत, निकिता देवरे, मृणाली निकम, क्रांती चव्हाण, शारदा कराळे, गोकुळ दात्रे, शेखर अहिरे, अमोल गातवे, ज्ञानेश्वर सोळंके आदींचे सहकार्य लाभले.
मल्हार हिल कॅम्पस विद्यामंदिर
भाक्षी (ता. बागलाण) येथील श्री खंडेराव महाराजांच्या गडपायथ्याशी असलेल्या आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचालित मल्हार हिल कॅम्पस प्राथमिक विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
"'सकाळ’ नेहमीच सामाजिक मूल्यांची जोपासना करून विद्यार्थ्यांचे कलागुण जोपासते. त्यांच्या गुणवत्तावाढीसह सर्व वयोगटांसाठी विविध उपक्रम घेत असते. चित्रकलेतून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, निरीक्षण, सृजनशीलता, चिकाटी, ध्येयनिश्चिती, सकारात्मकता, निसर्गप्रेम, संस्कृतीसंवर्धन, बंधुभाव, समानता, एकात्मता आदी मूल्यांची जोपासना होत असल्याने ही स्पर्धा महत्त्वाची आहे." - चित्रा देवरे, गटशिक्षणाधिकारी, बागलाण
"‘सकाळ’चे सर्व उपक्रम कौतुकास्पद आहेत. चित्रकला स्पर्धेतून विद्यार्थ्यांना नवीन माहिती मिळते, शिकायला मिळते. जीवनाला आकार देण्यासाठी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. त्याचा श्रीगणेशा ‘सकाळ’ माध्यम समूहाने करून दिला आहे."
-विनोद अहिरे, पालक
"‘सकाळ’ माध्यम समूह, शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शनामुळेच स्पर्धेत सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. आम्ही विद्यार्थी दर वर्षी चित्रकला स्पर्धेची वाट पाहात असतो. चित्र रेखाटताना खूप आनंद मिळतो. चित्रकला स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत होत आहे." - समृद्धी साठे, विद्यार्थी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.