SAKAL Exclusive : तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यात आलेल्या पिकांना पावसाने झोडपल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
त्यामुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांचे ग्रामस्तरीय समितीतर्फे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले होते. (SAKAL Exclusive Bad weather unseasonal rains destroys crops on 1200 hectares in sinnar nashik news)
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या त्रिस्तरीय ग्रामस्तरीय समितीस पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्या अनुषंगानेच अवकाळीने एक हजार २८० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, दोन हजार ४०२ शेतकऱ्यांचे नुकसान, ४३ गावांना फटका, २ कोटीची मदत अपेक्षित, जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आला असून. एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील १२८० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.
यात २४०२ शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याची कामे पूर्ण करण्यात आली आहे. ४३ गावांतील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यांना २ कोटी १९ लाख ४६ हजार ८७५ रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित आहे.
तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. नुकसानीचे जीपीएस छायाचित्र काढण्यात आले. दरम्यान, एप्रिल महिन्यात तालुक्यात आठ दिवस विविध गावांत वादळी वाऱ्यासह गारपिटीने नुकसान झाले. तसेच मे महिन्यात सुद्धा अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
गारपिटीमुळे नुकसानीची तीव्रता अधिक
काढणी योग्य स्थितीत असलेल्या कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले. गारपिटीमुळे नुकसानीची तीव्रता अधिक वाढली. कांद्याचे सर्वाधिक ९११ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्या खालोखाल विविध प्रकारच्या १९१ हेक्टरवरील भाजीपाला पिकांना फटका बसला.
गव्हाचे २२, मक्याचे ९९ तर बाजरीचे २४ हेक्टर क्षेत्र उद्ध्वस्त झाले. आगासखिंड, पांढुर्ली, विंचूरदळवी, शेणीत, बेलू, कोनांबे, सोनांबे, डुबेरे, आटकवडे, नांदूरशिंगोटे, चास, चापडगाव, दापूर, ठाणगाव, पाडळी, देवपूर या भागात सर्वाधिक नुकसान झाले.
बळीराजा मदतीच्या प्रतीक्षेत
सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना लवकर मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते पण महिना उलटून गेल्यानंतरही अजूनही मदत मिळाली नाही मार्च महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसाचा अहवालही सरकारला सादर झाला आहे.
मात्र शेतकऱ्यांना अजून एक रुपयाची मदत मिळालेली नाही. मार्च महिन्यात २६ गावांतील १०५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. ३११ शेतकऱ्यांना २८ लाख ७७ हजार ८८० रुपयांची मदत मिळणे अपेक्षित आहे. ही मदत अजूनही मिळाली नाही त्यातच एप्रिल महिन्याच्या अवकाळीची आणखी भर पडली आहे.
फळपिकांना फटका
सिन्नर तालुक्यात अनेक भागात गारपिटीसह पावसाने धुडगूस घातल्याने बळीराजावर संकट ओढवले आहेत. आर्थिक घडी पूर्णपणे कोलमडून पडेलेली असून कोणतेही पिके हातात लागलेले नाहीत.
फळ पिकांचे ३१ हेक्टरवर नुकसान मार्च महिन्यात झाले होते. फळ पिकांना नगण्य स्वरूपाचा फटका बसला होता मात्र एप्रिलच्या अवकाळीने ३२ शेतकऱ्यांच्या ३१ हेक्टर वरील फळ पिकांचे नुकसान झाले.
द्राक्ष, आंबा, चिकू, पेरू, डाळिंब या फळपिकांचा यात समावेश आहे. सर्वाधिक द्राक्ष बागांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांना सहा लाख ९७ हजार रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित आहे.
असे झाले नुकसान (आकडे हेक्टरीत)
कांदा ९११
भाजीपाला १९१
गहू २२
मका ९९
बाजरी २४
इतर ३३
एकूण १२८०
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.