नाशिक : आदिवासी भागातील मुलींना शहरात शिक्षणासोबत खो-खो खेळाचे मोफत प्रशिक्षण मिळाल्याने जिल्ह्यातील ३५ ‘सुवर्णकन्यांनी’ नाशिकचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोचवले आहे. नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन संचलित (स्व) सुरेखाताई भोसले निवासी खो-खो प्रबोधिनीने लोकवर्गणीतून पाच वर्षांत ही कामगिरी केली आहे.
शासकीय अनुदानाशिवाय चालणारी ही एकमेव संस्था ठरली आहे. (SAKAL Exclusive Kho Kho Prabodhini created 35 Gold medalist Girls from public funds nashik news)
ग्रामीण भागातील विद्यार्थी व खेळाडू कौशल्य निपुण असतात. त्यांच्यातील कला, गुण हेरुन असेच ‘हिरे’ घडवण्याचे काम नाशिकमधील निवासी खो-खो प्रबोधिनीने सुरु केले आहे. २०१८ मध्ये स्थापन झालेल्या या क्रीडा प्रबोधिनीत प्रारंभी सुरगाणा, पेठ, हरसूल भागातील १६ मुली होत्या.
वाड्या, पाड्यांवर राहणाऱ्या या मुलींना शहरात घेऊन यायचे आणि त्यांना शिक्षणासोबत मोफत खो-खो प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली. मुलींची निवड करताना एकतर त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष करंडक किंवा जिल्हा खो-खो असोसिएशनच्या स्पर्धेत सहभाग घेतलेला पाहिजे. निवड झालेल्या विद्यार्थिनींची फावडे गल्लीतील महापालिकेच्या शाळेत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेत डंका
सद्य:स्थितीला १२ ते १९ वर्ष वयोगटातील ३५ मुली येथे आहेत. येथे त्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातात. डॉ. आनंद नाडकर्णी हे मोफत समुपदेशन करतात. तर फिजिओथेरपिस्ट, डायटेशियन व आयुर्वेदिक डॉक्टर हे या खेळाडूंची वेळोवेळी काळजी घेतात.
प्रशिक्षणासोबत फिटनेस राखल्यामुळे या खेळाडूंनी आजवर नागपूर येथे झालेल्या नेरूरकर राज्यस्तरीय महिला खो-खो स्पर्धेत उपविजेते पटकावले. जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक खो-खो स्पर्धेत महिला गटात संयुक्त तृतीय स्थान मिळवले. मोहोळ, सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय महिलांच्या आमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेत संयुक्त तृतीय स्थान राखले.
रोहा येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य १८ वर्षांखालील मुलींच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले आहे. नाशिक येथे झालेल्या १७ वर्षांखालील शालेय महाराष्ट्र राज्यस्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धेत विजेतेपद राखले.
विटा, सांगली येथे झालेल्या १९ वर्षांखालील शालेय महाराष्ट्र राज्य स्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धेत उपविजेतेपद पटकावून नाशिकच्या मुलींनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. १४ वर्षांखालील शालेय मुलींच्या खो-खो स्पर्धेत नाशिक विभागाचे विजेतेपद पटकावले.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
ग्रामीण भागातील मुलींची भरारी
एका महिला खेळाडूने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत पुणे विद्यापीठातर्फे प्रतिनिधित्त्व व कांस्य पदक मिळवले आहे. त्यामुळे पाच खेळाडूंना खेलो इंडिया शिष्यवृत्ती मिळते. तर दोन खेळाडूंना भारतीय विमान प्राधिकरणची शिष्यवृत्ती मिळत आहे. १० खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्रबोधिनितील एक खेळाडू अशी नाही की तिने कुठल्यातरी स्पर्धेत पदक मिळवले नाही. त्यामुळे ३५ सुवर्णकन्यांना घडवणाऱ्या या प्रबोधिनीने ग्रामीण भागातून ‘हिरे’च शोधून काढले आहेत, असेच म्हणावे लागेल. विश्वास बॅंकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर हे प्रबोधिनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सचिव उमेश अटवणे, खजिनदार सुनील गायकवाड, माजी पदाधिकारी मंदार देशमुख यांच्या माध्यमातून संस्थेचे कामकाज चालवले जाते.
आकडे बोलतात...
१८ वर्षाखालील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत उपविजेतेपद
१७ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजयी
१९ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय मुलींच्या स्पर्धेत उपविजेतेपद
१४ वर्षाखालील राज्याच्या स्पर्धेत विजयी
१४ वर्षाखालील विभागीय स्पर्धेत विजयी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.