SAKAL Exclusive : रेल्वेच्या ‘रेलनीर’ च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील बसस्थानके व आगारांमध्ये प्रवाशांकरिता ‘नाथजल’ या नावाने अधिकृतरीत्या बाटलीबंद पाणी विक्री सुरू केली आहे.
बस स्थानकांच्या आवारात तसेच एसटी बसमध्ये स्वतंत्र विक्रेत्यांमार्फत ‘नाथजल’ ची विक्री केली जाते. या योजनेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना संबंधित स्टॉलधारकांकडून प्रवाशांची अडवणूक होत आहे.
‘नाथजल’ च्या एक लिटरच्या बाटलीची किंमत पंधरा रुपये असताना प्रत्यक्षात मात्र वीस रुपये घेतले जातात. ‘कुलिंग चार्ज’ च्या एसटी प्रवाशांच्या होणाऱ्या या लुटीकडे प्रशासकीय पातळीवरून मात्र दुर्लक्ष केले जात आहे. (SAKAL Exclusive Sale of Nathjal at high price at bus stands of msrtc extra charge under name of cooling charge nashik news)
एसटी बस स्थानकांमध्ये या अगोदर लोकल ब्रँडचे बाटलीबंद पाणी अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये प्रवाशांना विकत घ्यावे लागायचे. या पाण्याची गुणवत्ता जेमतेम असल्यामुळे सहाजिकच प्रवाशांना आर्थिक भुर्दंड व आरोग्य विषयक समस्येचा सामना करावा लागायचा.
मात्र २०२० मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संकल्पनेतून ‘नाथजल’ या नावाने एसटी ने स्वतःच पाणी विक्री करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राची संत परंपरा असलेल्या श्रेणीतील सर्वोच्च स्थानावरील संत एकनाथ महाराज यांच्या नावाने ही पाणी विक्री सुरू करण्यात आली.
त्यासाठी पुण्यातील एका खासगी कंपनीला बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला. राज्यातील सर्व बसस्थानके व आगारांमध्ये टप्प्याटप्प्याने कंत्राटी पद्धतीने पाणी विक्रीचे स्टॉल सुरू करण्यात आले. ६५० मिलिलिटर व १ लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये नाथजल विक्रीसाठी उपलब्ध असून यांचा दर अनुक्रमे १० रुपये व १५ रुपये इतका आहे.
प्रत्येक ६५० मिलिलिटर बाटलीबंद पाण्यामागे ४५ पैसे आणि एक लिटल बाटलीबंद पाण्यामागे एक रुपया एसटीला मिळतो. मात्र राज्यभरात अपवाद वगळता कोणत्याही स्टॉलवर ‘नाथजल’ वरील निर्धारित किमतीत विक्री केले जात नाही.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सर्वाधिक मागणी असलेल्या एक लिटरच्या पाण्याच्या बाटलीसाठी स्टॉलधारक १५ रुपये ऐवजी थेट वीस रुपये आकारणी करतात. याबाबत प्रवाशांनी विचारणा केल्यास कुलिंग चार्जचे कारण सांगितले जाते. याबाबत बस स्थानकांवर तक्रारी करून देखील एसटी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.
"जिथे जिथे प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त झाल्या तेथील स्टॉलधारकांवर कारवाई करण्यात आली. डमी ग्राहक पाठवून नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वच 'नाथजल' स्टॉल्सवर तपासणी केली जाईल. सर्व स्टॉल धारकांना दर्शनी भागात दर फलक लावण्याची सूचना करण्यात आली आहे."
- अरुण सिया, नियंत्रक, नाशिक विभाग
"राज्यातील सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर ‘नाथजल’ साठी वितरक नेमले आहेत. या वितरकांमार्फत एसटीच्या आवारातील सर्वच परवानाधारक स्टॉलवरून ‘नाथजल’ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येते. तसेच त्यांना ‘नाथजल’ चे खासगी वितरण देखील करता येते. यातून एसटीचे उत्पन्न वाढणार आहे. छापील किमतीपेक्षा अधिक दरात ‘नाथजल’ ची विक्री होत असेल तर तो गुन्हा आहे. या संदर्भात संबंधित बसस्थानकात प्रवाशांनी लेखी तक्रारी द्याव्यात. राज्यातील सर्वच विक्री केंद्रांवर सर्वांना दिसेल अशा ठिकाणी ‘नाथजल’ चे दर पत्रक बंधनकारक करण्यात आले आहे."
- अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ
"ठरवून दिलेल्या दरात ‘नाथजल’ विकले गेल्यास नाथजलचा खप वाढून एसटी महामंडळाला जास्त महसूल मिळेल. ‘नाथजल’ विक्रीवर आगारातील वाहतूक अधिकाऱ्यांचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. तसेच मार्ग तपासणी अधिकाऱ्यांनी मार्ग तपासणी सोबत ‘नाथजल’ विक्री नियंत्रण कार्यक्रम राबविल्यास प्रवाशांना रास्त दरात नाथजल उपलब्ध होईल."
- हिरेन रेडकर, सरचिटणीस, एसटी कामगार सेना
‘नाथजल’ उपक्रम दृष्टिक्षेपात
पुरवठादार : मे. शेळके बेव्हरेज प्रा.ली.
महामंडळाला प्राप्त निधी : प्रतिलिटर सरासरी १ रुपया इतके मानधन
प्राप्त महसूल : एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ अखेर- १ कोटी ३७ लाख १८, ७२२ रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.