नामपूर : शिक्षकांना ज्ञानदानासोबत अनेक प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागतात. त्यामुळे नवभारत साक्षरता कार्यक्रमावर शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातला होता.
परंतु राष्ट्रीय कार्यक्रमाच्या नावाखाली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तंबी दिल्याने जिल्ह्यात साक्षरता कार्यक्रमास सुरुवात झाली.
केंद्र सरकारच्या ‘उल्लास' ॲपवर शिक्षकांकडून माहिती भरण्यासाठी निरक्षरांचा शोध घेऊन त्यांची ऑनलाइन माहिती भरण्याची शिक्षकांमध्ये लगबग सुरू आहे. साक्षरता कार्यक्रमामुळे शिक्षकांना निरक्षरांची माहिती संकलित करावी लागत आहे. (SAKAL Exclusive Teachers Now Burdened with Literacy Programs Information requested on Ullas of centre nashik)
जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना महसूल गावनिहाय निरक्षरांची ऑनलाइन नोंदणी करण्याचे उद्दिष्ट्य शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. त्यानुसार तालुका, केंद्रस्तरावर मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देण्यात आले आहे.
निरक्षरांना साक्षर करण्यासाठी लिहिणे-वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता निरक्षरांना व्यवहारज्ञान देऊन डिजिटल साक्षर करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.
वाचन-लेखनाच्या संधी पंधरा वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना उपलब्ध करून देणे हा साक्षरता कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गेल्या काही वर्षांत देशातल्या अनेक व्यक्ती साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करू शकल्या नाहीत.
त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील शिफारशींना कार्यान्वित करण्यासाठी केंद्र सरकारने 'नवभारत साक्षरता कार्यक्रम' १ एप्रिल २०२२ पासून सुरू केला आहे. ज्यात सर्व वयोवृद्ध घटकांचा समावेश आहे.
योजनेत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानासह एकविसाव्या शतकातील नागरिकांसाठी आवश्यक अन्य घटकांना समाविष्ट केले आहे.
महत्त्वपूर्ण जीवन कौशल्यांमध्ये वित्तीय, डिजिटल साक्षरता, वाणिज्यिक कौशल्ये, बाळाची निगा व शिक्षण, कुटुंबकल्याण, स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होण्यासाठी व्यावसायिक कौशल्ये यांचा अंतर्भाव आहे.
१८ कोटींहून अधिक निरक्षर
देशात अठरा कोटींहून अधिक लोक निरक्षर असून, त्यात महाराष्ट्रातील दीड कोटींहून अधिक निरक्षरांना २०२७ पर्यंत साक्षर केले जाणार आहे. त्यासाठी 'नवभारत साक्षरता' कार्यक्रम राबविण्यात येणार असून, यंदा १२ लाख ४० हजार लोकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
त्यासाठी प्रत्येकी १० व्यक्तींसाठी एक स्वयंसेवक नेमला जाणार आहे. आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करता येणार आहे. पहिल्यांदा १५ ते ३५ वयोगटातील लोकांना शिकवले जाणार आहे.
महिला, मुली, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, बांधकाम कामगार, मजुरांना प्राधान्याने साक्षर केले जाणार आहे. राष्ट्रीय व राज्य स्तरावर साक्षरता केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
साक्षरता कार्यक्रमामुळे जीवनातील संघर्ष आणि अडचणींचा सामना करीत योग्य निर्णय घेण्यासाठी प्रौढ निरक्षर सक्षम होतील.
त्यांना केवळ वाचणे, लिहिणे आणि संख्याज्ञान शिकविण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे गुणवत्तापूर्ण आणि स्वाभिमानाने जगण्याचा त्यांचा मार्ग खुला होईल, अशी सरकारला अपेक्षा आहे.
आकडे बोलतात
० २०११ च्या जनगणनेनुसार देशात १५ वर्षाहून अधिक निरक्षरांची संख्या २५ कोटी ७६ लाख
० निरक्षरांमध्ये ९ कोटी ८ लाख, १६ कोटी ६७ लाख महिलांचा समावेश
० २०१७ ते १८ पर्यंत राबवलेल्या ‘साक्षर भारत' कार्यक्रमामुळे
देशात ७ कोटी ६४ लाख व्यक्तींना साक्षर प्रमाणित करण्यात आले
० देशात अजून १८ कोटी १२ लाख प्रौढ निरक्षर आहेत
० महाराष्ट्रात १ कोटी ६३ लाख ३ हजार ७७२ निरक्षर आहेत
जिल्हानिहाय निरक्षरांची संख्या
० पुणे : १० लाख ६७ हजार ८२३
० मुंबई : १० लाख ६१ हजार १४
० नाशिक : ८ लाख ६० हजार २५८
० सोलापूर : ८ लाख २४ हजार ४८४
० नगर : ७ लाख ८४ हजार ३२४
० जळगाव : ७ लाख ३४ हजार ३३५
० ठाणे : ६ लाख ८१ हजार ५७४
० नांदेड : ६ लाख ६६ हजार ७५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.