चकण्याचे काजू काढ म्हणताच उतरला रुबाब
थंडीचा सिझन असल्याने आहारही या ऋतुनुसार बदलतो. काजू, बदाम, डिंक व मेथीचे लाडू, खारीक, खोबरे, गूळ, शेंगदाणे असा प्रोटीनयुक्त आहार रोजच्या आहारात समाविष्ट होतो;
परंतु वेळ, पैसा तसेच अन्य कारणामुळे अशा प्रकारचा सकस आहार प्रत्येकालाच परवडेल, असे नाही. मात्र, असे असले तरी काहींना बडेजाव मिरविण्याची चांगलीच हौस असते.
ती हौस भागविताना मागचा-पुढचा विचार न करता बडेजाव मिरविला जात असेल तर काही खरे नाही, असेच म्हणण्याची वेळ आल्याशिवाय राहत नाही. त्याचे झाले असे, की राजकारणात नुकताच शिरकाव केलेल्या एका कार्यकर्त्याला त्याचा नसलेला रुबाब बोलण्यातून व्यक्त करण्याची चांगलीच सवय आहे.
हिवाळ्यातील आहारावरील चौकातील चर्चासत्रात त्याच्या चांगल्या तब्येतीचे ‘राज’ विचारल्यावर आपले खाणे-पिणे तसेच आहे, असे सांगून त्याने वेळ मारून नेली; परंतु त्याची फिरकी घेण्याचाच निश्चय केलेल्या कार्यकर्त्यांनी खरोखरच परिस्थिती तशी आहे, याचा अभ्यास करण्यासाठी घरी जाण्याचे निश्चित केले.
त्यानुसार घर गाठले. पाणी पिण्याचे निमित्त करून एकाने किचनमध्ये कसाबसा प्रवेश केला; परंतु तेथे खरी परिस्थिती आढळली.
डब्यांवर काजू, बदामाचे लेबल चिकटविलेले दिसल्याने खरोखरच गड्या चांगलाच भारी असल्याचे उद्गार त्याच्या तोंडून निघाले. घरातून बाहेर पडताना एकाने चकण्याचे काजू काढ म्हणून सांगितल्यावर गड्याचा चेहऱ्यावरचा रुबाब उतरला. (SAKAL Special chalta bolta comedy tragedy political satire nashik)
म्हणून थंडी गायब झाली..!
सध्या वातावरणाचा ठाव घेणे कठीण झाले आहे. कधी गारवा, तर कधी वातावरणातून थंडी गायब झाल्याचा अनुभव येत आहे. थंडीपासून बचावात्मक उपाय म्हणून अनेकांकडून जॅकेट, स्वेटरचा आधार घेतला जातो.
पण, वातावरणातील हे बदल विनोदाचा विषयही ठरू शकतात, हे नुकत्याच घडलेल्या एका किस्स्यातून अनुभवायला आले. झाले असे, की सकाळी अकराच्या सुमारास काही कार्यालयीन सहकारी गप्पा मारत उन्हात उभे होते.
थंडीचा विषय निघाला तर वातावरणातील या चढ-उतारावर चर्चा सुरू झाली. त्यात चर्चेत सहभागी एकजण आपल्या सहकाऱ्याकडे बोट दाखवत म्हणाला, ‘हे रोज स्वेटर घालून येतात, म्हणून तर थंडी गायब झालेली आहे.’ इतक्याच सर्वांना हसू सुटले.
अन् चर्चा लांबविण्यासाठी ‘रेडिमेड ग्राहक’ मिळाला. मग काय तर सर्वच ‘त्यांच्या’वर तुटून पडले. अन् हास्यफवारे सुरू झाले.
‘बॉडी’ पाहिजे, नाही तर काही खरं नाही...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपून पावणेदोन वर्ष झाले. मात्र, अद्यापही निवडणुका लागलेल्या नाहीत.
निवडणुका लागतील, या आशेवर इच्छुक तयारी करीत आहेत. मात्र, निवडणुकांसाठी ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू आहे.
पदाधिकारी नसल्याने प्रशासन कारभार हाकत आहे. प्रशासकीय राजवटीमुळे कामे रखडली असल्याची ओरड सामान्यांमध्ये आहे.
हीच तक्रार शासकीय कार्यालयांमधील अधिकारी करू लागले आहेत. झाले असे, की एका शासकीय कार्यालयात एक वरिष्ठ अधिकारी कामकाजाबाबत माहिती देत होते.
ही माहिती देता-देता कामकाजातील उणीव सांगू लागले. यातच त्यांनी लोकल बॉडी पाहिजे, नाही तर काही खरं नाही. ते असल्याने निर्णय घेणे सोपे जाते.
आता लोकप्रतिनिधींकडून आग्रह होतो, त्यामुळे नेमके कोणाचे ऐकावे, अशी गत झाली आहे. ‘बॉडी’ असली म्हणजे त्यांना सांगता येते, त्यांच्यावर काही ढकलताही येते, असे सांगू लागले. त्यामुळे लवकर ‘बॉडी’ येवो, यासाठी काही तर करा, असे ते सांगू लागले.
वीस मिनिटांत २० लाख
काही लोकांवर ‘लक्ष्मी’ इतकी प्रसन्न झालेली असते, की त्यांनी कुठलाही व्यवहार केला तरी लक्ष्मी त्यांना पावतेच. काही लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी लक्ष्मी त्यांना प्रसन्न होत नाही.
तर झाले असे, की कुठल्याही गोष्टीचा सुगावा लागला, की त्याचा पाठपुरावा करणारे ‘सुराणा’शेठ एकदिवस ‘वंदन’रावांना भेटतात. इकडच्या-तिकडच्या औपचारिक गप्पा झाल्यावर ‘‘सुराणा’शेठ, तुम्ही माझ्यासाठी किती पैसे आणू शकतात’ म्हणून ‘वंदन’राव विचारणा करतात.
शेठ थोडं डोकं खाजवत लागलीच तेथून निघतात आणि २० मिनिटांत एक गोणी घेऊन परत येतात. रावही चकीत होतात. वीस मिनिटांत तब्बल २० लाख रुपये..! काय झकास काम केले तुम्ही म्हणून शाबासकी देतात. शाबासकी मिळाली; पण २० वर्षे झाले तरी अजून व्यवहार काही पूर्ण झाला नाही, आता बोला.!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.