राजीनामे दिले की आरक्षण मिळेल
मनोज जरांगे पाटील आता गावागावापर्यंत पोचले आहेत. त्यांच्या आंदोलनाची धग गावच्या पुढाऱ्यांनाही बसत आहे. रस्ता बंद, निदर्शने, साखळी उपोषणाला पाठबळ म्हणून आमदार, खासदार अन् मंत्र्यांनाही गावबंदी झाली.
काही ठिकाणी तर नेत्यांना घेरावसुद्धा घातला जातोय. नेत्यांनी राजीनामे देण्याचा होरा लावला जातोय म्हणून नेत्यांनीही स्टंट सुरू केले. नाशिकमधील अशाच एका नेत्याने आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला.
पण जनता काही दूधखुळी नाही. ‘ये पब्लिक है, सब जानती है’ त्यांनीही त्या नेत्याची सोशल मीडियावर पोलखोल केली. यावर मिनी मंत्रालयाच्या आवारात, दोन कार्यकर्त्यांमध्ये संवाद रंगला. नेत्याने कशाला ढोंग केले. राजीनामा द्यायचा होता, तर थेट लोकसभा अध्यक्षांकडे द्यायचा होता, असे खडेबोल सुनावले.
त्यावर दुसऱ्या कार्यकर्त्यांनी तर राजीनामे देऊन काही होणार नाही. राजीनाम्याने आरक्षण मिळेल का. अस्सं कसं मिळणार नाही म्हणतो.
सगळ्या आमदार, खासदारांनी राजीनामे दिले, की दबाव वाढेल अन् लागलीच सरकार एक तासात आरक्षण देईल पाहा. हा संवाद ऐकणाऱ्यांना जणू आरक्षण यांच्याच हातात आहे, असे वाटले. (sakal special chalta bolta on Maratha Reservation nashik)
ही झुमकावाली पोरं..!
सध्या खानदेशातील एका गाण्यानं मराठी युवक-युवतींच्या मनात घर केलं आहे. मुलगा किंवा मुलगी समोरासमोर आल्यानंतर ‘ही झुमकावाली पोरं’ असं सहज पुटपुटलं जातं; परंतु असं हे पुटपुटणं कोणाला पावतं; तर कोणाच्या अंगलट येतं.
असे दोनच प्रकार अपेक्षित आहेत; परंतु एका घटनेत दोन्हींचं मिक्स असं कॉम्बिनेशन आलं तर? त्याचं झालं असं ः सायंकाळच्या वेळेत तेही मेन रोडला एका गर्दीत समोरून आलेल्या एकाला तरुणीचा चेहरा भावला.
त्या तरुणीच्या हास्याने त्यानेही ‘ही झुमकावाली पोर’ गायला सुरवात केली; परंतु तो चेहरा जसा जवळ येऊ लागला, तसा त्याच्या चेहऱ्यावरचा नूर बदलत गेला.
समोर येणारा चेहरा ‘झुमकावाली पोर’ नव्हती; तर ‘झुमकेवाला पोरगा’ होता लक्षात आल्यावर त्याच्याबरोबर असलेल्यांना हसू आवरणे कठीण झाले. ज्याबद्दल गाणे पुटपुटले गेले, तो मात्र नजरेची वेगळीच झलक देऊन गेला. तेही टाळ्या वाजवत.
गाडी शिकण्याची हौस, त्यात पडला पाऊस
महिलांना गाडी शिकण्याची भारी हौस असते. मग ती फोरव्हीलर असो की टूव्हीलर. प्रत्येकीची गाडी शिकण्याची वेगळीच स्टाइल असते. काही महिलांचा ब्रेकपेक्षा आपल्या पायांवर जास्त विश्वास असतो, तर काहींना डबलसीट येत नाही.
अशाच एका महिलेने दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन टूव्हीलर घेतली. गाडी घेऊन अर्थात आपल्या पतिमहोदयांना सोबत घेऊनच त्या मैदानावर पोचल्या. पतिमहोदय गाडीच्या खाली उतरले आणि पत्नीच्या हाती गाडी सोपवली.
गाडी कशी चालवायची, याविषयी सांगायला सुरवात करणार, इतक्यात समोरून टूव्हीलर आली, तेवढ्यात त्या महिलेने आपल्या हातातील ‘ॲक्सिलेटर’ जोरात पिळला.
काही क्षणातच दोन्ही गाड्यांची धडक होऊन त्या ‘अहोऽऽ अहोऽऽ’ करीत धाडदिशी जमिनीवर कोसळल्या. दोन्ही गाड्यांचे किती नुकसान झाले, हे पाहत पतिमहोदयांनी मैदानावरून अक्षरश: पळच काढला म्हणा की.
भाऊ, बिस्कीट अन नारळपाण्याचे पैसे वाचवलेस..!
सध्याची तरुणाई बेधुंद होऊन गाडी चालवते. त्यात मित्रमंडळींबरोबर फिरायला निघाली तर विचारायला नको. असाच युवक मित्रांचा समूह गंगापूर रोडवरून जात होता. एकमेकांमध्ये लागलेली स्पर्धा पाहता गर्दीतही ही मंडळी सुसाट जात होती.
त्यात जे व्हायला नको, तेच झाले. गर्दीतून गाडी काढायच्या प्रयत्नात एका दुचाकीस्वाराची गाडी स्लिप झाली. काही सेकंदात त्यांच्याभोवती गर्दी जमली. एकाने उठून बसविले, दुसऱ्याने पाणी आणून दिले.
तिथे उभे त्यांचे मित्र आपल्या जखमी मित्रांबरोबर बोलायचा प्रयत्न करताना तब्येतीची चौकशी करीत होते. हॉस्पिटलमध्ये न्यावे का, याचा अंदाज घेण्याचे काम सुरू होते. त्यातील खोडकर मित्र मोबाईलमध्ये डोकं घालत काहीतरी पाहत होता.
इतक्यात अपघातग्रस्त युवक उभे राहिले अन सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तेवढ्यात मोबाईल पाहणारा मित्र म्हणाला, ‘बरं झालं भाऊ, बँकेत बॅलन्स नाही.
हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले असते तर बिस्कीट, नारळपाणी आणायला लागले असते. कडकीत पैसे वाचवले तुम्ही...’ असे म्हणताच तणावग्रस्त सर्व उपस्थितांमध्ये हास्यफवारे उडाले.
जरा आमचंही ऐका ना !
लोकप्रतिनिधी म्हटला, की नेहमी भाषण देण्याच्या आविर्भावात ते असतात. गेल्याच आठवड्यात जिल्हा प्रशासनाच्या प्रधान कार्यालयामध्ये सध्या राज्यभर गाजत असलेल्या विषयांवर बैठक होती.
बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्र्यांसह सर्व शासकीय कार्यालयांचे अधिकारी जातीने हजर होते. लोकप्रतिनिधी मात्र मोजकेच. म्हणजे पंधरापैकी चारच. विषयाला अनुसरून बैठकीला सुरवात झाली. अनेकांनी मते मांडली. काही सूचना केल्या.
त्यानंतर वेळ आली लोकप्रतिनिधींची. शहरातील एक लोकप्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून त्याच विषयावर बोलत होत्या. अर्थात त्यांची टर्म संपत आलेली असताना अचानक याविषयी बोलण्याचा त्यांना कसा काय साक्षात्कार झाला, असा प्रश्न अनेकांना पडलेला होता.
या बैठकीतही त्यांनी तशा धाटणीने बोलणे सुरू केले, जेणेकरून शहरात कांदा-बटाटे विक्री व्हावी अशीच जणू त्या प्रतिबंधित पदार्थांची विक्री सुरू आहे... असो.
बऱ्याच वेळ बोलून झाल्यानंतर पुढच्या लोकप्रतिनिधींनी पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी खर्ची घातलेल्या वेळेच्या निम्म्या वेळेत आपले मतप्रदर्शन केले. शेवटी पालकमंत्र्यांनी बोलायला सुरवात केली त्या वेळी बऱ्याचवेळ बोलूनही त्या लोकप्रतिनिधीने शेजारील लोकप्रतिनिधींशी कानात कुजबूज सुरू केली.
ही बाब पालकमंत्र्यांना खटकली असावी; त्यामुळे, ‘आता जरा आमचेही ऐका ना !’ असा टोमणा दिल्याने कुजबूज करणारे काहीसे ओशाळले. पण जी चर्चा व्हायची ती झालीच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.