‘गल्लीत गोंधळ- दिल्लीत मुजरा’ या प्रसिद्ध विनोदी चित्रपटातील अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा अभिनय सर्वांच्या लक्षात असेल. याच अभिनेत्याप्रमाणे कधी चित्रपटात नाऱ्याची भूमिका निभव, तर कधी अस्सल राजकारण्यांप्रमाणे पक्षबदल करून विजय मिळविण्याचा भीमपराक्रम करणारे गोरखराव जिल्हाभर प्रसिद्ध आहेत.
त्यांनी आपल्या गावाला आदर्श बनविले. शिवाय, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून विविध राज्य व केंद्रस्तरीय पुरस्कार पटकावले. त्यांच्या या कार्याची दखल आजवर सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी घेतलेली आहे.
आता दस्तुरखुद्द पालकमंत्री दादा भुसे यांनीही त्यांच्या कार्याची दखल आपल्या भाषणात घेतली. मोडाळे गावात राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या आदर्श दृष्टिकोनाचे कौतुक करीत, जिल्ह्यातील इतर गावेही आदर्श करण्यासाठी पुढाकार घेण्याची सूचना केल्याने त्यांचा आदर्श जिल्ह्याने घ्यावा, असे तर त्यांना सूचित करायचे नव्हते ना?
(SAKAL Special chalta bolta tragedy political satire nashik)
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ठराविक कालखंडानंतर स्वीकृती घेण्याची वेळ येते. मात्र, राजकारण्यांच्या बाबतीत तसे होत नाही. किंबहुना, अधिक जोराने ते कधीकाळी मिळालेले प्रतिष्ठेचे पद मिरवितात.
महापालिकेत लोकांमधून निवडून आलेल्या नगरसेवकांच्या कोट्यानुसार स्वीकृत सदस्यांची निश्चिती होते. या सदस्यांना सभागृहात तसा फारसा भाव नसतो. मतदानाचा अधिकार तर बिलकुलच नसतो.
त्यामुळे प्रतिष्ठेचे पद मिळविण्याची घटनेने दिलेली ही एक प्रकारे सोयच आहे. त्यातही स्वीकृतपदाच्या पुढे माजी लागल्यावर संबंधित व्यक्तीचे अधिकच अवमूल्यन होते. मात्र, असे असले तरी काहींना पदाचा बडेजाव मिरविण्यात वेगळाच आनंद मिळतो.
असाच एक आनंद एका नवीन आलेल्या उपायुक्तांसमोर मिरवत असताना एका माजी स्वीकृत नगरसेवकाची चांगलीच तारांबळ उडाली. एका खासगी कामाचे निमित्त करून संबंधित माजी स्वीकृत नगरसेवकाने मोठ्या तोऱ्यात काम सांगितले.
सदरचे काम सांगताना मी किती श्रेष्ठ आहे व सभागृह कसे गाजविले, याचेच तुणतुणे तो अधिक वाजवत होता. थोड्या वेळाने संतापलेल्या अधिकाऱ्याने ‘साहेब, तुम्ही मानी झाला आहात, त्यातही तुम्ही स्वीकृत सदस्य होता,’ याची आठवण करून दिल्यावर संबंधित माजी स्वीकृत नगरसेवकाची चांगलीच कोंडी झाली.
मॉल्समध्ये ग्राहकांच्या सहाय्यतेसाठी सेल्समन उपलब्ध असतात. एखादी वस्तू सापडत नसेल किंवा एखाद्या योजनेविषयी जाणून घ्यायचे असेल तर अशावेळी या सेल्समनची सहाय्यता होते.
पण ग्राहकांच्या या संवादातून एखाद्याला मनस्ताप करून देणारा, तर इतरांना खिदखदवून हसविणारा प्रसंगदेखील घडू शकतो. झाले असे, की ग्राहकांची वर्दळ असलेल्या मॉलमध्ये तेथील कर्मचाऱ्यांच्या शर्टच्या रंगसंगतीशी मिळताजुळता शर्ट घातलेला एक युवा ग्राहक खरेदीसाठी आलेला होता.
प्रत्येक ठिकाणी ट्रॉली ओढून नेण्यापेक्षा तो एक कोपऱ्याला ट्रॉली ठेवून पाहिजे त्या वस्तू आणून त्यात ठेवत चालला होता. काही उत्पादने निरखताना तेथे आलेल्या महिला ग्राहकाने मदत घेण्याच्या सहाय्याने विचारले, ‘दादा, यावर काय स्कीम सुरू आहे.’
काही क्षणांसाठी संबंधित युवकाला काही समजलेच नाही. यांची कदाचित आपल्याला इथला कर्मचारी समजल्याची जाणीव होताच शायनिंग मारत युवक म्हणाला, ‘आय एम नॉट एम्प्लॉइ हियर.’
पण महिलेच्या डोक्यावरून गेल्याने त्यांनी पुन्हा विचारले, ‘दादा, मराठीत सांग ना, इंग्रजी इतकं काही कळत नाही.’ आपला पुन्हा एकदा पचका झाल्याचे लक्षात घेता संतापून युवक म्हणाला, ‘अहो ताई, मी इथं खरेदी करायला आलोय.
मी सेल्समन नाहीये. तुम्ही इथल्या कर्मचाऱ्यांना विचारा ना.’ महिलेला तिच्या चुकीची जाणीव झाली खरी, पण या संवादामुळे तेथे उपलब्ध इतर ग्राहकांना संवादादरम्यान हसू आवरणे कठीण बनले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.