Sanjay Raut : दोन दिवसांपासून नाशिकमध्ये छापासत्र सुरू असून, या छापासत्रात राज्यातील सत्ताधारी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांशी संबंधित कंपन्यांवर छापेमारी केली जात आहे. या छापेमारीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी बोट ठेवले.
यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी छापे पडले, त्याचे काय झाले, असे सांगत ‘ब्लॅकमेल’ करून निधी संकलित करण्याचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. (sanjay raut question What happened to earlier raids to shinde group nashik news)
नाशिकमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी खासदार राऊत आले होते. गुरुवारी (ता. १) सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना वक्तव्य केले. ते म्हणाले, की छापे नाशिकलाच का पडले, याचा विचार झाला पाहिजे. आता निवडणुकीच्या तोंडावर ‘ब्लॅकमेल’ केले जाईल. निधी संकलित होईल. सध्याचे राजकारण असेच सुरू आहे.
जालन्यातील स्टील कंपन्यांच्या बाबतीत काय झाले? सर्व माल बाहेर गेला. पुढे मध्यस्थी झाली. जे काही सुरू आहे, ते फारच भयानक आहे. ज्या ठेकेदारांवर छापेमारी झाली, त्या ठेकेदारांचा संबंध कोणाशी आहे, ठेकेदारांची गुंतवणूक कोण करतो हे समोर यायला हवे. प्राप्तिकर विभागाने मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
मुंबई, नाशिकसह जळगाव, पुणे अशा प्रमुख शहरांमधील ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक आणि सत्ताधारी आमदार यांच्यातील मिलीभगत लपून राहिलेली नाही. सर्वांची माहिती संकलित करून दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. विरोधकांना विकासकामांना निधी मिळत नाही. सत्ताधारी मात्र हजारो, कोटी रुपयांची कामे सांगतात.
छापासत्र नाशिकलाच का झाले, त्यांचे संबंध कोणाशी, त्यांची गुंतवणूक कुणाकडे आहे? नाशिकमध्ये ललित पाटील, पांढरपेशे पाटील आहेत. याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे स्पष्ट होईलच. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार समोर आले. प्रमुख शहरांतील ठेकेदारीला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतोय. आमदार- अधिकारी कोण आहेत? काही अधिकारी मिंधे नसतात.
त्यांच्याकडून निवडणुकीसाठी पैसे घेतले जातील. त्यांना ‘ब्लॅकमेल’ केले जाईल. राजकारण असेच आहे. जालन्यात मालमसाला घेऊन गेले. कोण घेऊन गेले, ते समोर आले. जे चालले आहे, ते भयंकर आहे. नगरसेवक, आमदार, खासदारांना निधी नाही. भाजपत प्रवेश केल्याशिवाय निधीची मदत केली जात नाही.
राहुल नार्वेकर यांनी जो गुन्हा केला, तोच चंडीगड येथे महापौरपदाच्या निवडणुकीत केल्याचे राऊत म्हणाले. देश वाचविण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी स्वतःहून पुढे आले पाहिजे, असे राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रस्तावावर वक्तव्य केले.
म्हणून सोरेन यांना अटक
झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना अटक करण्यासाठी सात हजारांचा फौजफाटा आला होता. झारखंडमध्ये जास्त जागा नाहीत; परंतु त्याही जागा त्यांना घ्यायच्या आहेत. सोरेन हे अडथळा ठरतील म्हणून त्यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रात घोटाळा झाला. त्याला ‘क्लीन चिट’ दिली होती. हसन मुश्रीफ, भावना गवळी, प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होते.
आसामचे मुख्यमंत्री आता कुठे आहेत? रोहित पवारांच्या कारखान्याचा आणि अजित पवार यांच्या कारखान्याचा विषय सारखाच आहे. पण, ‘ईडी’च्या दारात रोहित पवार चकरा मारत आहेत. कारण, ते मिंधे नाहीत. जनता दलाच्या खजिनदारांवर छापे पडले म्हणून नितीशकुमार गेले. अरविंद केजरीवाल हे जायला तयार नाहीत. आमच्या प्रमुख लोकांमुळे लोकशाहीचे रक्षण होईल, असे खासदार राऊत म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.