नाशिक: सिडकोतील(CIDCO) त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉलदरम्यान होणाऱ्या उड्डाणपुलासाठी तब्बल ५८८ वृक्ष तोडण्याची तयारी महापालिका(Municipal Corporation) करीत आहे. त्या दिशेने पावले टाकत अनेक झाडांना नोटीसा लावल्या आहेत. यामुळे शहरात विकासाच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, पर्यावरणप्रेमी वृक्ष वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
या मार्गावर अनेक देशी वृक्ष असून, वडाची दीडशे वर्षापूर्वीची झाडे आहेत. वड भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. वटवृक्ष भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होतो.
पारंब्यावरून खाली येतात म्हणून या वृक्षाला ‘न्यग्रोध’ असेही नाव आहे. हे झाड सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये दिसले, म्हणून बेंगालेन्सिस, तर बंगालीत व्यापाऱ्याला बनिया म्हणतात, म्हणून बन्यान ट्री असे इंग्रजीत नाव आहे. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण आणले. यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते याच वृक्षाखाली म्हणून आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात. चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेदात वडाचा उल्लेख आढळतो. कुरुक्षेत्री देवांनी महायज्ञ केला. त्यावेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले.त्या सोमचमसाचा एक वटवृक्ष बनला, अशी शतपथ ब्राह्मणात याच्या उत्पत्तीची कथा आहे.
वड यज्ञीय वृक्ष असून, यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवितात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान श्रीविष्णू वटपत्रावर बालरूपात शयन करीत असतं, अशी पौराणिक कथा आहे. ब्रह्मदेवांचे ‘वड’ निवासस्थान आहे, अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. भगवान शिवांचेही या वृक्षावर निवासस्थान मानतात. अशी वडाची महती असताना, त्यांना वाचविणे म्हणजे आपल्याला जीवदान मिळण्यासारखे आहे. एक वडाचा वृक्ष वर्षात तब्बल १७७ किलो प्राणवायूची निर्मिती करतो. उंटवाडीतील ‘नैसर्गिक व्हेंटिलेटर’ असणाऱ्या वडाच्या वृक्षाला वाचविण्यासाठी मोठी मोहीम नाशिकमध्ये सुरू झाली आहे.
अशी वृक्षतोड म्हणजे हेतू पुरस्कर उच्च न्यायालयाचा अवमान आहे. वड, पिंपळ, उंबराचे झाड तोडण्यास मनाई असताना, अशी भूमिका घेणे योग्य नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यायला हवा.
राजेश पंडित, अध्यक्ष, नमामि फाउंडेशन
वडाचे झाडे खरेतर नाशिकचे वैभव आहे. नैसर्गिक संपदा जपणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. सिमेंटच्या जंगलांपेक्षा नैसर्गिक जंगले वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. वृक्षांची किंमत कधीच करता येणार नाही आणि अशी शेकडो वर्ष जुनी वृक्ष संवर्धन करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे
शेखर गायकवाड, अध्यक्ष, आपले पर्यावरण संस्था
एक नाशिककर म्हणून हे सर्व बघताना निराशा झाली असून, कोरोनामुळे आंदोलन करू शकत नाही. आणि मनपा झाडांना नोटीस लावून मोकळी होते. आता हा लढा नाशिकारांचा आहे, असे मला वाटते
भारती जाधव, वृक्षप्रेमी
या परिसरात उड्डाणपुलाची आवश्यकता नाही. धार्मिक स्थळाजवळील शेकडो वर्षांपूर्वीचे हे वृक्ष तोडून आपण काय साध्य करणार आहोत. एका वडाची किंमत दीड कोटी होते. मग हे तेवढे पैसे भरणार आहे का? आम्ही जनजागृती अभियान सुरू केले असून, ही झाडे तुटणार नाहीत, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
रमेश अय्यर, पर्यवरणप्रेमी
शहराचा विकास करताना वृक्ष कसे वाचविता येईल, याचा विचार होणे आवश्यक आहे. वृक्ष तोडायला दहा मिनिटे लागतात, पण ते वाढविण्यासाठी शेकडो वर्ष लागतात. वृक्षाचे महत्त्व समजून घेत नाहीत, तोपर्यंत प्रशासन असे काम करीत राहील. त्यांना खरे असे शिक्षण देण्याची गरज आहे.
तुषार पिंगळे, वृक्षवल्ली फाउंडेशन
आपल्या शहराची अधोगतीकडे वाटचाल सुरु झाली की काय, असे हे वृक्षतोडप्रसंगी वाटते. ५८८ वृक्ष तोडण्यापेक्षा उड्डाणपूल न झालेलाच बरा, असे मला वाटते. हेरिटेज वृक्ष वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे.
चंद्रकांत पाटील, पर्यावरणप्रेमी
हेरिटेज दर्जा असणारा वृक्ष आम्ही नक्कीच तोडू देणार नाही. नाशिकला कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व समजले, पण प्रशासनाला अजून समजलेले नाही. उड्डाणपुलापेक्षा आम्हाला हे प्राचीन वृक्षे महत्त्वाची आहेत.
अमित कुलकर्णी, अध्यक्ष, निसर्ग सेवक युवामंच, सिडको
वडाची झाडे नाशिकचा आत्मा आहे. औषधी गुणधर्माने नटलेला हा वृक्ष कोलकता, ओडीसामध्ये मोठ्या प्रमाणात बघावयास मिळतो. तेथील सरकार असे वृक्ष तोडण्यास परवानगी देत नाही. वनराईमध्ये वडाची झाडे जपली जातात. असे असताना नाशिकमध्ये असे वृक्ष तोडणे खूपच वेदानादाई आहे.
वैद्य विक्रांत जाधव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.