नाशिक : महापालिकेच्या जागेत २८ जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी असताना तब्बल ६३ ठिकाणी फलक उभारण्यात आल्याने महापालिकेचा लाखो रुपयांचा महसुल बुडाला.
याबरोबरच चुकीचे काम झाल्याने संबंधित ठेकेदारावर त्याअनुषंगाने कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहे. त्यातून शहरातील जाहिरात फलक घोटाळ्याची व्याप्तीदेखील समोर येणार आहे. (scope of billboard scam exposed revenue of NMC lost lakhs of rupees nashik news)
महापालिकेने उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने खुल्या जागांवर २८ ठिकाणी जाहिरात फलक उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. निविदेच्या अटी व शर्तींमध्ये फक्त खुल्या जागेत २८ ठिकाणी जाहिरात फलक उभे करण्याचे नमूद होते.
मात्र संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देताना खुल्या जागेसह रस्ते, दुभाजक, वाहतूक बेटे, इमारती, उद्याने, सर्व प्रकारच्या वापरात नसलेल्या व वापरात असलेल्या जागा व बांधीव मिळकतीवर जाहिरात फलक उभारण्याची परवानगी देण्यात आली.
निविदेत फक्त जाहिरात फलक असा उल्लेख असताना कार्यारंभ आदेशामध्ये मात्र जाहिरात फलकांसोबत प्रकाशित फलक, युनिपोल, एलईडी वॉल या सर्वांना परवानगी दिली.
त्यामुळे शहरात २८ ऐवजी ६३ जाहिरात फलक (होर्डिंग्ज) लागल्याचा आरोप नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी चौकशी समिती गठित केली आहे.
त्यात निविदेतील अटी व शर्तींमध्ये करण्यात आलेल्या बदलांची चौकशी केली जाणार आहे. त्यात दोष आढळल्यास कारवाई होईल. परंतु त्यापूर्वी २८ होर्डिंग्जची परवानगी असताना ६३ होर्डिंग्ज उभारण्यात आले.
त्याची चौकशी होणे गरजेचे असून वेल्फेअर असोसिएशनने यासंदर्भात पुरावे दिल्यानंतरही संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
समितीसमोर आव्हान
महापालिकेने २८ होर्डिंग्ज लावण्याचे आदेश दिले असताना प्रत्यक्षात ६३ हून अधिक होर्डिंग शहरात लावण्यात आले आहेत. त्यावर जाहिरातींचा अनधिकृतपणे व्यवसाय सुरू आहे या आर्थिक व्यवहाराचे महापालिकेत कुठल्याही प्रकारची नोंद नाही.
त्यामुळे वेल्फेअर असोसिएशनने पुराव्यासह दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आव्हान समिती समोर आहे.
वाहतूक बेटात परवानगी कशी?
वाहतूक बेटाच्या चारही बाजूने वाहने ये-जा करतात. या वाहनांमधून चारही दिशा दिसणे आवश्यक असते असे असताना वाहतूक बेटांमध्ये जाहिरात फलक लावण्यात आल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई का केली नाही व जाहिरात विभागाकडून वाहतूक बेटात परवानगी दिली कशी, असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.