Nashik News : राष्ट्रीय महामार्गावरील दत्तमंदिर ते द्वारका दरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाची घोषणा होऊन तीन वर्षे उलटले तरी अद्यापही पुलासंदर्भात फाइल दिल्लीत हलली नसताना पूर्व विधानसभा मतदारसंघातील नांदूर नाका पाठोपाठ आता मिरची चौकातही विधिमंडळ अधिवेशनात ५० कोटी रुपये उड्डाणपुलासाठी मंजूर करण्यात आले आहे. (Second flyover on chhatrapati Sambhaji highway nashik news)
आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रयत्नांनी दोन्ही पूल मंजूर झाल्याने छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील महापालिका हद्दीतील वाहतूक सुरळीत होण्यास यानिमित्ताने मदत होणार आहे. ८ ऑक्टोंबर २०२२ मध्ये छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मिरची चौकात खासगी ट्रॅव्हल्स बसला भल्या पहाटे अपघात झाला. या अपघातात १२ प्रवासी होरपळून मरण पावले.
घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने भेट देत अपघाताचे ब्लॅक स्पॉट शोधून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने संयुक्त सर्वेक्षण केले त्यात अपघाताचे २६ ब्लॅक स्पॉट आढळले.
छत्रपती संभाजी महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार लक्षात घेता ॲड. ढिकले यांनी नांदूर नाका येथे उड्डाणपुलाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्यानंतर पाठपुरावा करून ५० कोटी रुपयांचा निधी उड्डाणपुलासाठी मंजूर केला. परंतु त्यानंतरही वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणे अशक्य असल्याचे लक्षात आले.
जनार्दन महाराज आश्रम ते नांदूर नाका दरम्यान मोठ्या प्रमाणात लॉन्स, मंगल कार्यालये असल्याने वाहनांची गर्दी होत असल्याने मिरची चौकात उड्डाणपुलाची मागणी आमदार ॲड. ढिकले यांनी केली. नागपूर विधिमंडळ अधिवेशनात पहिल्याच दिवशी सुधारित पुरवणी मागणी पत्रात मिरची चौकातील उड्डाणपुलासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यास मान्यता देण्यात आल्याने १ किलोमीटरच्या अंतरात महामार्गावरील उड्डाणपुलामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे.
''महामार्गावरील वाढत्या अपघातामुळे सलग उड्डाणपूल गरजेचा होता. परंतु प्रथम नांदूर नाका येथील उड्डाणपूल मंजूर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या उड्डाणपुलासाठी पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला यश मिळाले. उड्डाणपूल झाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.''- ॲड. राहुल ढिकले, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.