नाशिक : निवृत्तीचे वय ६०, बहुतांश राज्यात रेल्वेप्रमाणे सार्वजनिक वाहतूक सेवेतही सवलतीसाठी साठ वर्षे वयाची अट ग्राह्य धरले जाते. मग महाराष्ट्रच अपवाद का? असा प्रश्न गेल्या दशकभराहून अधिक कालावधीपासून राजकीय नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांना आजवर उत्तर मात्र मिळालेले नाही. दरवेळी तेवढी आश्वासने मात्र मिळाले. प्रवास सवलतीसाठी वय ६५ वरून ६० वर आणण्यासाठीचा हा वनवास संपत नसल्याची परिस्थिती आहे. स्मार्टकार्डऐवजी जुन्या प्रचलित पद्धतीने ओळखपत्राची मागणीदेखील दुर्लक्षितच आहे.
स्मार्टकार्डची सक्ती केल्याने ज्येष्ठ नागरिकांचा मनस्ताप
अगदी महापालिकेच्या निवडणुका असो किंवा आमदार, खासदारकीच्या उमेदवारांना सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांची आठवण येते. मग त्यांच्यासाठीचा साधा प्रश्न सोडविण्यासाठी दशकभराहून अधिक काळ वाट बघावी लागणारे अत्यंत असंवेदशनीलपणाचे लक्षण असल्याची खंत व्यक्त होते आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रवास सवलत मिळविण्यासाठी राज्यातही ज्येष्ठ नागरिकांचे वय साठ वर्षे असावे, या मागणीसाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरु आहे, असे असताना आश्वासनांची खैरात व्यतिरिक्त आजवर ज्येष्ठ नागरीकांना काहीही मिळालेले नाही. मागणीसाठी केलेली आंदोलन, निदर्शने फोल ठरलेली आहेत. हा त्रास मिटलेला नसतांना, समस्येत आणखी भर घालताना स्मार्टकार्डची सक्ती केल्याने ज्येष्ठ नागरिकांचा आणखी मनस्ताप व्यक्त केला जातो आहे.
महिलांचे वय तर ५८ च
रेल्वे प्रवासासाठी तिकीट सवलतीकरीता ५८ वर्षांपुढील महिलांना सवलत दिली जाते. या धर्तीवर राज्यात एसटी प्रवासातही महिलांचे वय ५८ करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांची आहे. तसेच रेल्वे विभागाकडून पूर्वीप्रमाणे सवलत योजना सुरु केली पाहिजे.
स्मार्टकार्डची दमछाक नकोच
एसटी महामंडळातर्फे प्रवासादरम्यान स्मार्टकार्डची सक्ती केलेली आहे. परंतु दरवर्षी नूतनीकरण, कार्डचा सांभाळ अशा विविध कारणांनी हे स्मार्टकार्ड नकोच अशी ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीप्रमाणे ओळखपत्र म्हणून आधारकार्ड किंवा तहसीलदारांकडून प्रमाणित ओळखपत्र ग्राह्य धरले जावे, अशी मागणी केली जाते आहे.
"एसटी बस सवलतीत ज्येष्ठ नागरिकांचे वय साठ वर्षे करण्यासंदर्भात गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीदरम्यान त्यांनी आश्वासन दिले होते. तत्पूर्वी केंद्र सरकारने यासंदर्भात राज्य शासनाला सूचना जारी करण्यासंदर्भात तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचीही भेट घेतलेली होती. परंतु आजवर आश्वासनांच्या पलीकडे ठोस काही मिळालेले नाही. स्मार्टकार्डऐवजी पूर्वीप्रमाणे तहसीलदारांमार्फत प्रमाणित ओळखपत्र ग्राह्य धरले जावे."
- उत्तम तांबे, संघटक सचिव, फेस्कॉम, महाराष्ट्र.
"एसटी प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांचे वय साठ करण्यासंदर्भात सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना निर्णय होता होता राहून गेला. तेव्हापासून आजवर आश्वासनाच्या भरोसे ज्येष्ठ नागरिक जगत आहेत. केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्यानेही साठ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरीकांना एसटीत सवलत द्यावी. ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड तातडीने थांबायला हवी."
-मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, माजी सरचिटणीस, द्वारका ज्येष्ठ नागरिक संघ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.