Nashik Shasan Aplya Dari : जिल्ह्यात हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवस मुसळधारेची शक्यता वर्तविली आहे. दुसरीकडे शनिवारी (ता. १५) ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी शिंदे गटाने कंबर कसली आहे.
भरपावसात खरिपाची कामे सोडून उपक्रमाकडे लाभार्थी फिरकण्याची शक्यता कमी असल्याने २५ हजार लाभार्थ्यांची गर्दी जमविण्यासाठी सगळी यंत्रणा शिंदे गटाने कामाला लावली आहे.
भाजप-शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट या महायुतीच्या या उपक्रमात सर्वाधिक साडेतीन हजार लाभार्थी मात्र काँग्रेसच्या मतदारसंघातील आहेत. (shasan aplya dari Beneficiaries will be brought by 450 buses nashik news)
मुख्यमंत्री स्वतः नाशिकच्या कार्यक्रमाला येणार असल्याने जिल्ह्यातील सत्ताधारी गटाचे म्हणजे झाडून सगळ्याच पक्षाचे आमदार उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळात चांगल्या मंत्रिपदासाठी स्पर्धा असल्याने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्री आणि आमदारांत शक्तिप्रदर्शन रंगणार आहे.
चांगल्या खात्यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी स्पर्धा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या फेररचनेत नवोदितांना आशा आहे, तरी विद्यमान मंत्र्यांचे पद जाण्याची भीती आहे. अशा वातावरणात भरपावसात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राजकीय शक्तिप्रदर्शनाची तयारी म्हणून गाजण्याची शक्यता आहे.
प्रत्येक तालुक्याला ‘टार्गेट’
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी प्रत्येक तालुक्याला लाभार्थ्यांच्या गर्दीचे ‘टार्गेट’ दिले आहे. पावसाळ्यात शेतीची कामे सोडून लाभार्थ्यांना कार्यक्रमास्थळी आणण्याचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मनधरणी सुरू आहे. एरवी ज्या कामांसाठी लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत, त्याच लाभार्थ्यांना दोन दोन फोन करून उपस्थितीसाठी मिन्नतवारी सुरू आहे. अधिवेशनापूर्वी नाशिकमध्ये हा कार्यक्रम व्हावा, यासाठी पालकमंत्री आग्रही आहेत.
कार्यक्रमासाठी २५ हजार लाभार्थ्यांच्या उपस्थितीचे तालुकानिहाय टार्गेट ठरवून दिले आहे. शासकीय लाभ दिलेल्यांची गर्दी जमवून प्रतिसादाचे चित्र दाखवून कार्यक्रम यशस्वितेचे प्रयत्न आहेत.
पावसामुळे नाशिक शहराला लागून तालुक्यांना जास्त लाभार्थी आणण्याचे उद्दिष्ट आहेच, पण लाभार्थ्यांच्या येण्या-जाण्याची, जेवणाची व्यवस्था करूनही अपेक्षित प्रतिसाद नसल्याने अधिकारी स्वतः लाभार्थ्यांशी संपर्क साधून उपस्थितीसाठी आग्रह धरीत असल्याचे चित्र आहे.
लाभार्थी मात्र काँग्रेसच...
भाजप-शिंदे गट-अजित पवार गट यांच्या महायुतीचे जिल्ह्यात १५ पैकी १३ आमदार आहेत. तर काँग्रेसचा एकमेव आमदार असूनही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात सर्वाधिक साडेतीन हजार लाभार्थी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्या मतदारसंघातील आहे.
त्र्यंबकेश्वर (२०००), इगतपुरी (२५००) याप्रमाणे होणार आहेत. याउलट येणाऱ्या लाभार्थ्यांपैकी केवळ प्रातिनिधिक लाभार्थ्यांनाच व्यसपीठावर जाण्याीच संधी मिळणार असल्याने ‘त्या’ प्रातिनिधिक लाभार्थ्यांत आपण असणार का? हा प्रत्येक लाभार्थ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे गावोगावच्या लाभार्थ्यांची मनधरणी करीत कार्यक्रमाला आणण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे.
तालुका लाभार्थी बस
नाशिक शहर ५००० ७५ सिटी लिंक
ग्रामीण ५००० ७५ सिटी लिंक
निफाड १५०० ३० एसटी बस
देवळा ५०० १० एसटी बस
पेठ ५०० १० एसटी बस
त्र्यंबकेश्वर २००० ४० एसटी बस
नांदगाव ५०० १० एसटी बस
दिंडोरी २००० ४० एसटी बस
सिन्नर १५०० ३० एसटी बस
येवला ५०० १० एसटी बस
मालेगाव २००० ४० एसटी बस
इगतपुरी १५०० ३० एसटी बस
सुरगाणा ५०० १० एसटी बस
बागलाण ५०० १० एसटी बस
कळवण ५०० १० एसटी बस
चांदवड १००० २० एसटी बस
एकूण २५००० ४५०
- तीन तास सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन
- लाभार्थ्यांना पाणी आणि जेवणाचे पाकीट
- योजनांची माहिती देण्यासाठी ४० स्टॉल
- बेरोजगार मेळाव्याच्या २० स्टॉलची सोय
- शासकीय विभागांतर्फे विविध स्टॉल
जि.प.वर जबाबादारी १५ हजार लाभार्थ्यांची
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद समन्वयक असून, जिल्हाभरातील २५ हजार लाभार्थ्यांपैकी १५ हजार लाभार्थी आणण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनाकडून लाभार्थ्यांसह सरपंच, उपसरपंचांना साकडे घातले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गुरुवारी (ता. १३) सर्व गटविकास अधिकारी, कर्मचारी, सरपंच यांची एकत्रित व्हिडिओ कॉन्फरन्स घेत नियोजनाच्या सूचना दिल्या.
१५ हजार जिल्हा परिषद, पाच हजार नाशिक ग्रामीणचे नाशिक तहसीलदारांकडे, तर पाच हजार लाभार्थी नियोजनाची जबाबदारी नाशिक महापालिका प्रशासनाकडे सोपविण्यात आली आहे.
यात, जिल्हा परिषद समन्वयक असल्याने प्रशासनाकडून आठवडाभरापासून तयारी सुरू आहे. यासाठी श्रीमती मित्तल यांनी १० व ११ जुलैला विशेष मोहीम तालुक्यांमध्ये राबविली. यासाठी सर्व विभागप्रमुख, अधिकारी यांना फिल्डवर उतरविले होते.
जिल्हा परिषद प्रशासनाला १५ हजाराचे उद्दिष्ट असल्याने कार्यक्रमस्थळी जिल्ह्यातील एक हजार ३४२ सरपंच, उपसरपंच तसेच एक हजार ११७ ग्रामसेवक यांच्यासह शासन यंत्रणेतील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सर्व सरपंच, उपसरपंचांची व्यवस्था व्यासपीठासमोरील ‘डी झोन’मध्येच करण्यात येणार असून, सर्व सरपंचांना ओळखपत्र देण्यात आले आहे.
सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामसेवकांना फेटे बांधले जाणार आहेत. सकाळीच सर्व लाभार्थी डोंगरे वसतिगृह मैदानावर येतील. कार्यक्रमस्थळी व वाहनतळाच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिकांची, लाभार्थ्यांसाठी नाश्ता, भोजन, पिण्याचे पाणी, चहा आदींचे नियोजन करण्यात आले आहे. नियोजनावर शुक्रवारी (ता. १४) अंतिम हात फिरवला जाणार आहे.
नावीन्यपूर्ण उपक्रमांचा डंका
या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण असलेल्या मिशन भगीरथ प्रयास, सुपर फिफ्टी या सारख्या योजनांचे सादरीकरण देखील करण्यात येणार आहे. यासाठी या योजनेतील कामांचे व्हिडिओ तयार करण्यात आले असून, त्याचे सादरीकरण केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.