मालेगाव : गुणकारी शेवगा नवीन पीक बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. देशात शेवगा उत्पादनात तामिळनाडू अव्वल आहे. तमिळनाडूत होत असलेल्या बेमोसमी पावसामुळे शेवग्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तेथील बेमोसमी पाऊस कसमादेच्या पथ्यावर पडला आहे. कसमादेतील शेवग्याला ७० ते ८० रुपये किलोचा भाव मिळत आहे. भविष्यातही भाव टिकून राहण्याची शक्यता असल्याने दुष्काळी परिस्थितीत शेवगा शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. (Shevaga will give financial support this year Demand increased in Tamil Nadu Gujarat from Kasmade prices likely to sustain Nashik)
कसमादेतील शेवगा प्रामुख्याने मुंबई व चेन्नई येथील बाजारात विकला जात आहे. सध्या पीक काढणीचे काम सुरु आहे. कसमादेसह नाशिक जिल्ह्यात दहा ते बारा हजार एकरवर शेवगा लागवड करण्यात आली आहे.
शेवग्याचे पीक डिसेंबर ते जून या कालावधीत घेतले जाते. साधारणत: जानेवारीत उच्च प्रतिचा शेवगा बाजारात येतो. सध्या कसमादेत शेवगा काढणीची धूम आहे. परराज्यातील घाऊक व्यापारी कसमादेत आले असून मुंबई व चेन्नई येथे माल पाठविला जात आहे.
देशात तमिळनाडूनंतर महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरातमध्ये शेवग्याचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. गेल्यावर्षी चांगले उत्पादन होऊनही भाव मिळाला नाही. २० ते ३० रुपये घाऊक भाव होता. यावर्षी मात्र सुरवातीपासूनच समाधानकारक भाव मिळत आहे.
तामिळनाडूमध्ये गेली काही दिवस बेमोसमी पाऊस होत आहे. याचा सर्वाधिक फटका शेवग्याला बसला आहे. तमिळनाडूतील शेवग्याचे उत्पन्न त्यामुळे घटणार असल्याने कसमादेसह जिल्ह्यातील शेवग्याला चांगला भाव मिळत आहे.
कसमादेत दर्जेदार उत्पन्न घेतले जात आहे. चांगल्या दर्जाचा शेवगा ७० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. कमी पावसात येणारे पीक म्हणून शेवगा ओळखला जातो. माळमाथा व काटवन भागातील शेवगा घाऊक व्यापारी एकत्र करून डोंगराळे टोल नाक्यापर्यंत आणत आहेत.
या ठिकाणी ट्रकमध्ये माल भरून तो चेन्नईला पाठविला जात आहे. भाव साधारण राहिल्यास अनेक शेतकरी मार्चमध्येच दुबार छाटणी करतात. यावर्षी भाव टिकून राहण्याची शक्यता असल्याने मार्चमध्ये छाटणीचे प्रमाण कमी राहील. जूनपर्यंत भाव टिकून राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान डाळिंब व शेवगा वगळता इतर पिकांना भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. निसर्गाने साथ दिल्यास डाळिंब व शेवगा दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकतील. डाळिंबाबरोबरच शेवगा लागवडीला कसमादेत मोठा वाव आहे.
"तमिळनाडू व इतर भागात बेमोसमी पाऊस झाल्याने तेथील शेवग्याला फटका बसल्याने यावर्षी भाव टिकून राहतील. अनुकूल वातावरणामुळे कसमादेत शेवगा लागवडीस मोठा वाव आहे."
- गोकूळ आहिरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव
"शेवग्याच्या पानांपासून पावडर तयार केली जाते. या पावडरमध्ये पोषक तत्त्व मोठ्या प्रमाणावर असते. यावरील प्रक्रिया उद्योग गुजरात व तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. कसमादेसह महाराष्ट्रात या प्रक्रिया उद्योगाला मोठी संधी आहे. यावर्षी शेवग्याचे भाव टिकून राहतील. तरुण शेतकऱ्यांनी शेवगा लागवडीकडे वळले पाहिजे."
- ॲड. महेश पवार, शेवगा उत्पादक, रावळगाव.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.