Nashik News : समृद्धीमार्गे धावणाऱ्या शिर्डी- नागपूर बस सेवेला ब्रेक!

पुरेशे प्रवासी मिळत नसल्याने तोट्यात चालणारी सेवा बंद करण्याची एसटीवर नामुष्की
MSRTC Bus
MSRTC Bus esakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : महाराष्ट्राच्या विकासाचा राजमार्ग म्हणून बघितल्या जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शिर्डी ते नागपूर दरम्यान नॉनस्टॉप सुरु झालेली पहिली स्लीपरकोच एसटी बस सेवा काही दिवसांपूर्वी स्थगित करण्यात आली आहे.

इंधन व टोलचे पैसे निघतील एवढेही प्रवासी मिळत नसल्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समृद्धी महामार्गावरुन धावणाऱ्या या बसला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला. समृद्धी महामार्ग एसटीसाठी तोट्याचा ठरला असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. (Shirdi Nagpur bus service on Samriddhi highway stop due to lack of passengers Nashik News)

गेल्या डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले होते. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गाजावाजा करत डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांची शिर्डी ते नागपूर अशी समृद्धी महामार्गावरील पहिली थेट रातराणी स्लीपरकोच असलेली एसटी बस सेवा सुरु केली होती.

या बसमधून तेराशे रुपये भाडे मोजून आठ तासात शिर्डीला पोहोचता येत असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, अवघ्या तीन महिन्यातच ही बस सेवा बंद करण्याची वेळ एसटीवर ओढावली आहे. अपेक्षेप्रमाणे प्रवासी मिळत नसल्यामुळे ही बस सेवा थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

एसटीच्या आकडेवारीनुसार शिर्डी ते नागपूर या बस सेवेला डिसेंबर महिन्यात एकूण आसन क्षमतेच्या तुलनेत 41 टक्के प्रवासी मिळाले होते. मात्र, जानेवारी महिन्यात त्यात घट होऊन आसन क्षमतेच्या तुलनेत अवघे 13 टक्के प्रवासी मिळाले.

फेब्रुवारी महिन्यात ही संख्या केवळ आठ टक्क्यांवर आली. फेब्रुवारी महिन्यात तर अनेक दिवस एकही प्रवासी मिळाला नाही, म्हणून बस सेवा बंद ठेवावी लागली होती. नागपूर आगाराची असणारी ही बस शिर्डी पर्यंत येत नसल्याने सहाजिकच शिर्डी येथून सुटणारी नियोजित फेरी देखील वारंवार रद्द होऊ लागली.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

MSRTC Bus
Tax Recovery : वसुलीसाठी नांदगाव पालिकेकडून ढोल बजाव मोहिम

मार्च, एप्रिल महिन्यात शालेय परीक्षांचा काळ पाहता प्रवासी संख्या आणखी कमी होईल हे लक्षात घेऊन एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रकांनी एसटी व्यवस्थापनाकडे ही बस सेवा बंद करण्याची परवानगी मागीतली. त्यानुसार सध्या बस सेवा स्थगित करण्यात आली आहे.

शिर्डी ते नागपूर नॉनस्टॉप प्रवासाकरिता या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति १३०० रुपये व मुलांसाठी ६७० रुपये इतके प्रवासभाडे निश्चित करण्यात आले होते. तसेच ७५ वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात १००% मोफत, तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५०% सवलत देण्यात आली होती.

या बसमध्ये प्रवाशांना २ बाय १ पद्धतीची ३० आसने (पुशबॅक पद्धतीची) बसण्यासाठी, १५ शयन आसने (स्लीपर) अशी रचना होती. या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२ किमी व वेळेमध्ये सव्वाचार तास बचत झाली. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही बस बंद ठेवण्याची वेळ एसटी प्रशासनावर आली आहे.

"टप्पा वाहतूक हे एसटीचे मूळ धोरण आहे. प्रवासी चढउतार झाली तरच फेरी परवडते. समृद्धी महामार्गावरून बसचा प्रवास थेट होत असल्याने मर्यादित प्रवासी संख्येमुळे साहजिकच नुकसान झाले. औरंगाबाद, जालना, अमरावती, अकोला या ठिकाणी प्रवासी चढ उतार करण्याची सुविधा निर्माण झाली तरच एसटीला समृद्धी मार्गे आश्वासक उत्पन्न मिळेल."

- रामचंद्र शिरोळे, वाहतूक नियंत्रक - शिर्डी

MSRTC Bus
Traffic Jam : मुंबई- नाशिक महामार्गावर कंटेनर बंद पडल्याने वाहतूक कोंडी; बेशिस्त वाहनचालकांमुळे मोठा खोळंबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.