नाशिक : चैत्र शुध्द एकादशीला आज पारंपरिक रथोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात आणि रामभक्तांनी केलेल्या जयजयकारात उत्साहात पार पडला.
त्यानंतर आज दुपारी सियावर रामचंद्र की जय, जय सीता राम सीता या जयघोषाने काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून ठिक ६.३२ मिनिटांनी गरूडरथाने प्रस्थान केले. त्यानंतर पावणेसातला श्रीराम रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. (Shriram Rathotsav 2023 excitement of Ram devotees Devotees flock for darshan nashik news)
मिरवणुकीला प्रारंभ होण्यापूर्वी यावर्षीचे पूजेचे मानकरी समीर पुजारी यांच्या हस्ते श्री काळाराम मंदिरात श्रीराम पंचायतनची महापूजा करण्यात आली. त्यानंतर पूजा केलेल्या भोगमूर्ती सजविलेल्या पालखीत ठेवून काळाराम मंदिराला प्रदक्षिणा घालून कहार मंडळींनी पालखी मंदिराच्या पूर्व दरवाजाने गरुड रथापर्यंत आणली.
समीर पुजारी यांच्या हस्ते महाआरती करून पुन्हा भोगमूर्ती रामरथामध्ये घेण्यात आल्या. श्रीरामाच्या पादुका या गरुडरथामध्ये ठेवण्यात आल्या. समीर पुजारी यांनी श्रीराम रथाकडे तोंड करून पालखी समवेत चालण्यास प्रारंभ केला.
त्यानंतर श्रीरामाच्या जयघोषात रथ ओढण्यास सुरवात झाली. गरूडरथ आहिल्याराम व्यायामशाळेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहाने ओढला. त्यापाठोपाठ रास्ते आखाडा तालीम संघाच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामाचा रथ ओढला.
श्री काळाराम मंदिरापासून निघालेला गरूडरथ व श्रीरामरथ ढिकलेनगर, नागचौक, काट्या मारोती पोलिस चौकी, गणेशवाडीमार्गे गाडगे महाराज पुलाखालून श्रीरामरथ म्हसोबा पटांगण येथे थांबवण्यात आला. गरुडरथ हा गाडगे महाराज पुलाजवळून रोकडोबा व्यायामशाळा, दहिपूल, नेहरू चौक मार्गे, धुमाळ पॉईंट, मेनरोड, सरकारवाड, भांडीबाजारमार्गे म्हसोबा पटांगण येथे आला.
पुन्हा गरूडरथ पुढे होऊन त्यापाठोपाठ श्रीरामरथ निघाला. देवीमंदिर, साईबाबा मंदिर, भाजी बाजारामार्गे रामतिर्थावर दोन्ही रथ एकत्र आले. तेथे जवळपास दोन ते तीन तास अवभृतस्नान घालण्यात आले. रामतिर्थासह म्हसोबा पटांगणावरही फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. भाविक लहान मुलांना रथावरील मूर्तीच्या पायाशी नेत दर्शन घेत होते.
रथाच्या नाड्याला, चाकाला मनोभावे हात लावून दर्शन घेण्यासाठीही झुंबड उडाली होती. श्रीरामाचे दर्शन व यात्रेचा आनंद लुटण्यासाठी शहर परिसरातून लहान मुलांसह भाविकांनी विशेषतः महिला भाविकांनी गर्दी केली होती. दुपारपासूनच पंचवटीतील रस्ते भाविकांच्या अलोट गर्दीने फुलून गेले होते.
कापड बाजारात गरुडरथ येताच जोरदार घंटानाद करण्यात आला. बालाजी संस्थांनचे महंत बालाजीवाले यांनी रथाचे स्वागत केले. रामतिर्थवरील अवभृतस्नानानंतर दोन्ही रथ रात्री उशिरा मूळस्थानाकडे मार्गस्थ झाले.
गोदाघाट गर्दीने फुलला
रात्री उशिरा गरुड रथ म्हसोबा पटांगणावर पोहोचला. त्यानंतर दोन्ही रथ रामतीर्थकडे मार्गस्थ झाले. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. राम, सीतेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यात्रेने अर्थ करणासाही काही प्रमाणात बूस्ट मिळाला. रथयात्रेदरम्यान राम, सीता, लक्ष्मणाची वेशभूषा केलेल्या जिवंत देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
नव्या पायंड्याला सुरवात
रामरथावर राजकिय नेत्यांची गर्दी नको असे नाशिककरांना वाटते. या गर्दीमुळे अनेकांना दर्शनाचा व्यवस्थित लाभ घेता येत नाही या नागरिकांच्या तक्रारीनंतर यंदा आमदार राहुल ढिकले यांनी रथावर राजकीय नेत्यांची गर्दी कायम नसावीयासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले होते. त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला.
केवळ पूजेप्रसंगी रथावर ही गर्दी झाली, मात्र तीही प्रमाणात. स्वतः आमदार ढिकले हेही पूजेनंतर लगेच रथावरून उतरले, त्यामुळे रथ पुढे जात असताना ऩागरिकांना व्यवस्थित दर्शन घेता आले. आमदार ढिकले यांनी केलेल्या आवाहनानुसार एका चांगल्या पायंड्याला सुरवात झाली आहे, ती पुढेही कायम राहावी अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.