SIEP Hero E-Bike Challenge : राष्ट्रीय स्तरावर आयोजित ‘एसआयईपी हिरो इ- बाईक चॅलेंज २०२३’ स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटी संचालित आर. एच. सपट अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या बाईकने प्रथम क्रमांक पटकावला. (SIEP Hero EBike Challenge bike of R H Sapat Engineering students won nashik news)
राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा नुकतीच गलगोटीआज विद्यापीठ (ग्रेटर नोईडा, उत्तर प्रदेश) येथे पार पडली. ‘रेट्रोफिटिंग’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जुन्या पेट्रोल दुचाकी गाडीत विविध बदल करून त्याचे इलेक्ट्रिक गाडीत रुपांतरण करत सादरीकरण केले.
‘एक्स-६० इ-बाईक’ या नावाने सादर केलेल्या गाडीने स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेत विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे कौतुक केले. ओकरा या संघामार्फत बनविण्यात आलेली ही इ- बाईक स्पर्धेत लक्षवेधी ठरली.
महाविद्यालयाच्या यांत्रिकी, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार आणि संगणक विभागातील २० विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. त्यांना यांत्रिकी विभागाचे प्रा. स्वप्नील सोनवणे, रवी टर्ले यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेसाठी विविध राज्यातून ४१ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी शंभराहून अधिक नियमांचे काटेकोरपणे पालन करून अवघ्या तीन महिन्यात ही दुचाकी विद्यार्थ्यांनी साकारली. स्पर्धेत वेगवेगळ्या फेरीच्या माध्यमातून सादर केलेल्या सर्वच दुचाकींची औद्योगिक क्षेत्रातील प्रख्यात तज्ज्ञांनी तपासणी, अनेक चाचण्यांतून मूल्यमापन केले.
विविध चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवत एक्स-६० या इ-बाईकने राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियनशिपचा पुरस्कार मिळवला. सर्वोत्तम ऑफरोड चाचणीमध्येदेखील प्रथम क्रमांक पटकवला.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सपट अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावर ७५ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक त्यांना प्रदान केले. तसेच प्रथम लोकनिवड पुरस्कार आणि गाडीच्या ड्यूरबिलिटीसाठी दुसरा क्रमांकदेखील इ-बाईकला प्राप्त झाला.
महाविद्यालयाच्या ओरका संघाने यापूर्वीदेखील ऑक्टोबर २०२२ मध्ये एसआरएम विद्यापीठ (चेन्नई) येथे एसएइ-इंडिया यांनी आयोजित केलेल्या नवनवीन ई-बाईक तयार करण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, मानव संसाधन व्यवस्थापन संचालक डॉ दीप्ती देशपांडे, आस्थापना संचालक शैलेश गोसावी, प्रकल्प संचालक पी एम देशपांडे, प्राचार्य पी. सी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्रकल्पात चिन्मय भणगे (कर्णधार), यश देशमुख, अथर्व देसले, शुभम जोशी, सिद्धार्थ कटारनवरे, प्रीती सोनवणे, तेजल मांडवकर, जाई जोशी, प्रथमेश इंगळे, जान्हवी चंद्रात्रे, अर्शद सय्यद, साक्षी सांगळे, हितेश भावसार, रिझवान पिंजारी, वेदांत अस्वले, सार्थक जोशी, तेजस दराडे, अभिषेक यादव, मयूर घमंडी आदींचा समावेश होता.
असे आहेत एक्स-६० ई-बाईची वैशिष्ट्ये
डिजिटल स्पीडोमीटर, जलरोधक आयपी ६७ बॅटरी पॅक, फोनद्वारे नियंत्रित करता येणारा स्मार्ट बॅटरी पॅक. विशेष म्हणजे गाडीचे सर्व भाग हे महाविद्यालयातील वर्कशॉपमध्ये बनविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.