नाशिक : नांदूरमध्यमेश्वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात संकटग्रस्त यादीतील ‘ग्रेटर स्पॉटेड’ गरुडाचे दर्शन झाले. तसेच हिमालयातील ‘पाहुण्यां’च्या आगमनाला सुरवात झाली आहे. ब्ल्यू टेल बीईटरची संख्या वाढली आहे. गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावरील धरणाच्या जलशयामुळे परिसराचे लावण्य खुलले आहे. गाळ साचून वनस्पतींची वाढ झाल्याने इथे पक्ष्यांसाठी उत्कृष्ट अधिवास तयार झाला आहे. (Sighting of endangered Greater Spotted Eagle in Nandur Madhmeshwar Nashik Latest Marathi News)
पाणथळ पक्ष्यांना आकर्षित करत आहे. २६५ हून अधिक जातीच्या पक्ष्यांची नोंद येथे झाली आहे. दर वर्षी इथे येणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढत आहे. ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाल्याने परदेशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पाणथळ संरक्षणासाठी वन विभागाला काम करावे लागणार आहे, असे पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे. यंदा अभयारण्यात वर्षभर धरणाचे पाणी साठून राहिल्याने स्थलांतरित पक्षी येतील का नाही? अशी शंका पक्षी अभ्यासकांमध्ये आहे.
गाळपेऱ्यातील पाणीसाठा असून पाऊस अधिक झाल्याने पक्ष्यांना बसण्यासाठी जागा नाही. अशा परिस्थितीत आठ दिवसांपासून हिमालयातून येणाऱ्या गडवाल, कॉमन पोचार्ड, ब्ल्यू टेल बीईटर आदी पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरवात झाली आहे. ‘आययूसीएन’द्वारे असुरक्षित प्रजाती म्हणून वर्गीकरण केलेला ‘ग्रेटर स्पॉटेड’ गरुड हा शिकारी पक्षी अभयारण्यात दाखल झाला आहे.
‘ग्रेटर स्पॉटेड’ गरुड हा पक्षी पूर्व आणि अंशतः मध्य युरोप, मध्य रशिया आणि मध्य आशिया, अंशतः चीन, भारतीय उपखंड आणि उच्च मध्य- पूर्वमध्ये प्रजनन करतो. हिवाळ्यात ते प्रामुख्याने दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, मध्य पूर्व, भूमध्यसागरीय खोऱ्यात आणि अंशतः पूर्व आफ्रिकेत स्थलांतरण करतात. ओल्या जमिनीच्या अधिवासात राहण्यास प्राधान्य देतात.
बेडूक आणि विविध प्रकारचे पक्षी, अनेकदा असुरक्षित पानपक्षी, सरपटणारे प्राणी आणि कीटक हे त्यांचे खाद्य आहे. गरुड अनेकदा लहान गरुडावर हल्ला करून त्याला ठार करतात. स्थलांतरादरम्यान, मोठे ठिपके असलेले गरुड रोज साधारणपणे दीडशे किलोमीटर अंतर पार करतात. कधी एका दिवसात ते ३५० किलोमीटर अंतर पार केल्याचीही नोंद आहे.
अभयारण्यातील झाडावरील आणि गवताळ भागातील पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. चमचा, वारकरी, उघड्या चोचीचा करकोचा, राखी बगळा, गडवाल, जांभळी पानकोंबडी, पोचार्ड, रंगीत करकोचा, सूर्यपक्षी, दयाळ, लार्क, कोतवाल, गप्पीदास, वेडा राघू, मुनिया, डव, हुदहुद, पीपीट, बुलबुल, नीलकंठ, नाचण आदी पक्ष्यांबरोबर मार्श हेरीअर हा शिकारी पक्षी इथं पाहावयास मिळत आहे. वन विभागाने पर्यटकांसाठी विविध सोयी केल्या आहेत. दुर्बिण, गाइड, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, निरीक्षण मनोरे आदींचा त्यात समावेश आहे.
गरुडाविषयीची माहिती
- सुमारे ६२ ते ७२ सेंटिमीटर लांबी
- पसरलेल्या पंखांची लांबी ५.२५ ते ६ फूट
- गर्द काळपट, तपकिरी डोके व पंखांची किनार असणाऱ्या या पक्ष्याच्या शेपटीखाली असलेली इंग्रजी ‘व्ही’ आकारातील पांढरी पिसे असतात
- शरीर व पंखांवरील छोटे पांढऱ्या ठिपक्यांवरून नाव मिळाले
- क्लांगा शास्त्रीय नाव असणारा पक्षी भारताच्या उत्तर भागात निवास करताना हिवाळी स्थलांतराच्या शेवटच्या टप्प्यात मध्य व दक्षिण भारतात येतो
- नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार आदी ठिकाणीही आढळतो
"हिवाळ्यामध्ये नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होते. पक्षी बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. निसर्गपरिचय केंद्रातून प्रोजेक्टरद्वारे पक्ष्यांची माहिती दिली जाते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना धरणातील पाण्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून एका खोलीत ‘लाइव्ह’ पक्षी दाखविण्याची सोय करण्यात आली आहे."
- विक्रम अहिरे, सहायक वनसंरक्षक, वन विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.