नाशिक : मराठी साहित्याचे भूषण असलेले तात्यासाहेब वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. खुद्द तात्यासाहेबांकडून प्रेरणा घेऊन माय मराठीतले अक्षर सुंदरच असायला हवे, या ध्यासाने गेल्या २५ वर्षांहून कार्यरत असलेले जळगाव येथील किशोर कुलकर्णी यांचे हस्ताक्षराचे कार्य या निमित्ताने अधोरेखित करणे आवश्यक ठरते. संगणक युगात अक्षराबाबत कार्य म्हणजे हरणारी लढाई; परंतु हस्ताक्षर सुघड, सुंदर व्हावे ही तळमळ असलेला हा अक्षर कार्यकर्ता मात्र या ठिकाणी निराळा ठरतो.
मानवाने उत्तरोत्तर प्रगती साधली. मानव गुहेत राहत होता तेव्हापासून त्याला लेखन कला अवगत आहे. कागद आणि पेन तर थेट आजची संगणकप्रणाली याद्वारे आपला इतिहास लिहून जतन करू लागला आहे. अलीकडच्या शतकात लिहिण्याकरिता पेनाचा वापर झाला; परंतु काळानुरूप लेखन पद्धतीत बदल होत गेला. संगणकामुळे तसेच स्मार्ट फोनमुळे लेखनाचे पेन कमी होतील, असे चित्र होते; मात्र तसे दिसून येत नाही. विकासाच्या वाटेवर कागद, पेनाच्या सोबतीला हस्ताक्षराची जोड कायम अबाधित राहिली, हे मात्र कुणीही मान्य करेल.
हल्ली संगणक व इंटरनेटचे युग असले तरी लेखनकलेची जागा अन्य कोणी घेऊ शकत नाही, किंबहुना त्या तंत्रज्ञानामुळे हस्ताक्षरास वाव मिळेल, या विश्वासाने पत्रकार किशोर कुलकर्णींचे काम सुरू आहे. ते म्हणतात, की ‘गुगल हॅन्डरायटिंग अॅप्लिकेशन’मुळे मोबाईल स्क्रीनवर अक्षर गिरवले असता, ते युनिकोडमध्ये आपोआप टाइप होऊन परावर्तित होते. त्यामुळे ते तंत्र हस्ताक्षर लेखनास पूरक ठरत आहे, असे त्यांचे मत आहे.
किशोर कुलकर्णी जळगावच्या ‘जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड’मध्ये मीडिया विभागात कार्यरत आहेत. नाशिक येथील ‘एचपीटी कॉलेज’मधून पत्रकारितेची पदवी त्यांनी घेतली. त्या दरम्यान, त्यांची भेट ‘अक्षर सुधारण्यासाठी झटणारे’ नाना लाभे यांच्याशी झाली. नानांनी कुलकर्णींच्या अक्षरांना सुंदर वळण दिले. नाना लाभे यांच्या कार्यामुळे कुलकर्णी प्रभावित झाले. त्यांनी त्याकामी १९९७ पासून लक्ष घालण्यास सुरवात केली. त्यांचा ‘घडवा सुंदर अक्षर’ हा उपक्रम तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरू झाला.
किशोर कुलकर्णी ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ या उपक्रमासाठी गावागावांत जाऊन शाळांमध्ये सहज, सुंदर, स्वच्छ आणि सरळ अक्षर कसे काढावे, याबाबत प्रात्याक्षिकांसह मार्गदर्शन करतात. व्याख्यान तर देतातच. शालेय विद्यार्थीच नव्हे, तर प्रौढ, उच्चपदस्थ व्यक्तींचेही हस्ताक्षर सुधरविण्यास किशोर कुलकर्णी यांचा हातखंडा राहिलेला आहे. त्यांच्या उपक्रमाने तीन हजारांहून अधिकांचे हस्ताक्षर सुवाच्च सुंदर झाले आहेत.
ज्याचे अक्षर सुंदर, वळणदार तर ती व्यक्ती प्रसन्न, नीटनेटकी, शिस्तप्रिय असते असे म्हटले जाते. किशोर कुलकर्णी यांनी ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ हे पॉकेट बुक प्रकाशित केले आहे. त्यांच्या ‘पासवर्ड सुंदर अक्षराचा’ या पुस्तकाचे प्रकाशन ८ जानेवारी २०१६ मध्ये अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती २ सप्टेंबर २०१७ मध्ये एकनाथ खडसे यांच्या हस्ते प्रकाशित झाली.
‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ या उपक्रमांतर्गत किशोर कुलकर्णी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यावर भर देतात. शालेय विद्यार्थ्यांचे तसे कारागृहातील कैद्यांचे अक्षर सुधारण्यासाठी त्यांनी कार्य केले. सातत्याने कार्य केले तर ते परिणामकारक ठरू शकते, असे ते म्हणतात. हस्ताक्षर सुंदर दिसण्यासाठी, टपोरे वळणदार दिसण्यासाठी काय केले पाहिजे, वर्णातील मुख्य रेषा, ती सरळ काढली जावी, मोठी असावी, अक्षरातील उंची, अक्षरातील दोन वर्णांचे अंतर, जाडी, लेखणी-पेन कोणता असावा, कागदावर पेन कसा चालवावा, पेन चालविण्याची दिशा, लिहिण्याची गती, वळण, कसे व कोठे थांबवावे आदी मुद्द्यांसह किशोर कुलकर्णी सोदाहरण मार्गदर्शन करतात.
जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा,
तसेच महाविद्यालयांमध्ये जाऊन सुंदर अक्षर कसे काढावे यासंबंधी प्रात्याक्षिकांसह व्याख्याने देत असतात. त्यांनी तळमळीने, चिकाटीने व निरपेक्ष भावनेने केलेल्या या कार्याबद्दल त्यांच्या पाठीवर पुरस्कार, गौरवरूपी शाबासकीची थापदेखील मिळाली आहे. हस्तलेखनाचे भूर्जपत्र ते पत्र असे सुमारे अडीचशेहून अधिक दुर्मिळ अक्षरांचे नमुनेदेखील त्यांच्याकडे आहेत. त्यांचे प्रदर्शन अनेक ठिकाणी झाले आहे. त्यांच्या अक्षरकार्याबद्दल त्यांना पुरस्कार व मानसन्मानदेखील प्राप्त झाले आहेत.
‘रतनलाल सी. बाफना युवा पुरस्कार’ (वर्ष २०१२), ‘समाज शिक्षक’ (वर्ष २०१३), ‘सूर्योदय साहित्यरत्न (वर्ष २०१४)’, खानदेश अहिराणी कस्तुरी मंच पुणेतर्फे ‘अक्षरभूषण पुरस्कार (वर्ष २०१६)’ अशा विविध पुरस्कारांनी अक्षर सुधारक किशोर कुलकर्णी यांचा गौरव झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.