सिन्नर : बाजार समितीचे सभापती रवींद्र पवार यांचे कोनांबे ग्रामपंचायतीचे सदस्यपद अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणाच्या मुद्द्यावर अपात्र ठरविले. यावर उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय अशी लढत देऊनही अपात्रतेची कारवाई जैसे थे राहिली.
या कारवाईचा आधार घेत जिल्हा उपनिबंधकांनी श्री. पवार यांना बाजार समितीच्या संचालकपदावरूनही हटविले आहे. आमदार माणिकराव कोकाटे गटाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे- उदय सांगळे यांच्या गटाला दिलेला हा मोठा शह मानला जात आहे. (Sinnar Bazar Committee chairman Pawars directorship canceled Nashik News)
सिन्नर बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही गटांचे प्रत्येकी नऊ संचालक निवडून आले होते. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाचा एक संचालक फोडत माजी आमदार राजाभाऊ वाजे-उदय सांगळे यांच्या गटाने बाजार समितीत सत्ता हस्तगत केली.
सोनांबेचे सरपंच रवींद्र पवार सभापतिपदी विराजमान झाले. त्यामुळे बाजार समितीतील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला. कोकाटे गटाकडून फुटलेल्या सिंधूबाई कोकाटे यांना उपसभापतिपदाची लॉटरी लागली.
बाजार समिती सभापतीच्या निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्यानंतर कोकाटे गटाकडून सभापती रवींद्र पवार यांना कोंडीत पकडण्याची खेळी खेळण्यात आली. सभापती पवार बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटातून निवडून आले होते.
ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या सोनांबेचे सरपंच होते. गावाच्या स्थानिक राजकारणात शिवाजी पवार यांची शासकीय जागेतील विहीर सरपंच पवार यांनी कारवाई करून बुजविली होती. या कारवाईनंतर शिवाजी पवार यांनी सरपंच पवार यांच्या पक्क्या घराचे अतिक्रमित बांधकाम उघडकीस आणून त्यांच्या विरोधात अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केलेते.
त्यावर सुनावणी होऊन सप्टेंबरमध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच पवार यांच्याविरोधात असलेले पुरावे तपासून त्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द ठरवले होते.
या निर्णयाविरोधात विभागीय महसूल आयुक्त, उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय अशी लढत श्री. पवार यांनी दिली. अपर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवून श्री. पवार यांचे अपिल फेटाळले होते.
श्री. पवार यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द झाल्यामुळे आपसूकच त्यांना सरपंचपदासह बाजार समिती संचालक व सभापतिपदावर पाणी सोडावे लागले. ग्रामपंचायत सदस्यपद रद्द झाल्यामुळे ते ज्या गटातून बाजार समिती संचालक म्हणून निवडून आले होते, तेथील निवड रद्द होत असल्याचे तक्रारदार शिवाजी पवार यांनी जिल्हा उपनिबंधकांच्या निदर्शनास आणून दिले.
सहकारी संस्था निवडणूक कायदा तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम १५ मधील तरतुदीनुसार रवींद्र पवार यांना संचालकपदावरून जिल्हा उपनिबंधकांनी बाजूला केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.