Nashik News : तालुक्यात खरिपाबरोबर रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. पावसाअभावी जमिनीत फारशी ओल नाही. विहिरींतील पाणीपातळी कमी झाली आहे. परिणामी, रब्बी हंगामावर मोठा परिणाम झाला आहे.
सिन्नर तालुक्यांतील १२८ गावांची नजर पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी द्विधामनःस्थितीत सापडला आहे. एकंदर तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. (Sinnar taluka pay within 50 paise Rabi season also in danger along with Kharif due to lack of rain Nashik News)
सिन्नरच्या महसूल विभागाने सप्टेंबरअखेरची सिन्नर तालुक्याची नजर पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचे सांगितले. पीक कापणीनंतर सुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबरअखेर जाहीर होईल.
दुष्काळी तीव्रता योजनांचा लाभ घेण्यासाठी यंदा डिसेंबरमध्ये अंतिम पैसेवारी जाहीर होण्याची शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. सिन्नर तालुक्यात केवळ १२८ गावे आहेत.
त्यात ११० गावे तालुक्यात खरिपाची, तर १८ गावे रब्बीची आहेत. मात्र, तालुक्यात सप्टेंबरअखेर व १२८ गावांची नजर पैसेवारी ५० पैशांच्या आत जाहीर झाली आहे. सिन्नर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ५५६ मिलिमीटर असते.
या वर्षी केवळ ३६८ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या केवळ ६६ टक्के पाऊस पडला आहे. अल्प पावसामुळे अनेक गावांमध्ये पेरण्या झाल्या नाहीत. अनेक गावांमध्ये नांगरटीही झाली नाही.
ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीन, मका पिकाला वेळेवर पाणी मिळाले नाही. त्याचा सोयाबीन, मका पिकाला मोठा फटका बसला.
उरल्यासुरल्या सोयाबीनची सोंगणी शेतकऱ्यांनी शेतात केली. त्यातही ३० टक्केच उत्पन्न मिळाले असल्याचे शेतकरी सांगतात. खर्चही न निघाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
तालुक्याच्या पूर्व भागातील फुलेनगर व दुशिगपूर बंधाऱ्यात पाण्याची आवक झाली नाही. या परिसरात दरवर्षी दुष्काळ असतो. भोजापूर, कोनांबे, उंबरदरी, सरदवाडी, बोरखिंड धरणे भरल्याने त्यावरील पाणीयोजना सुरळीत चालतील.
मात्र, पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट राहील. ऑक्टोबरमध्येच दुभत्या जनावरांसाठी चाऱ्याची चणचण अनेकांना भासत आहे.
अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा
निऱ्हाळे गावासह २३ वाड्यांना ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात पांगरीच्या ६ वाड्या, खंबाळेच्या ४, शिदेवाडीच्या २, पंचाळेच्या ८, दोडी खुर्दच्या रामोशीवाडी, निऱ्हाळेच्या तीन वाड्यांचा समावेश आहे.
पशुधन वाचविण्याची शेतकऱ्यांना चिंता
खरिपाची पिके पावसाअभावी वाया गेली आहेत. आता रब्बीची पेरणी तोंडावर आली आहे. मात्र, पावसाचे कोणतेही आशादायी चित्र दिसत नाही.
यामुळे वैरणीशिवाय तालुक्यातील पशुधन कसे वाचवावे, याची चिंता बळीराजाला लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट आहे.
"यंदा रब्बीच्या पेरण्या कराव्यात की नाही, असा प्रश्न बळीराजा समोर आहे. खरीप वाया गेला असून, रब्बीचे पिकेही वाया जाण्याची भीती आहे. पूर्व भागात अनेक गावात पाण्याचे टँकर सुरू असून, चाऱ्यासाठी आतापासूनच दरमजल फिरावे लागत आहे. यंदा सर्व गणिते बिघडली आहेत. शासनाने सिन्नर तालुका दुष्काळ जाहीर करावा व सर्व मदत शेतकऱ्यांना करावी."
-डॉ. रवींद्र पवार, सभापती, बाजार समिती, सिन्नर
"शेतकऱ्याला उत्पादन खर्च काढून चार पैसे मिळाले नाही, तर त्याच्यावर कर्ज वाढते. नवीन पिकांसाठी त्याच्याकडे भांडवल उरत नाही. पुन्हा लम्पी रोगाने डोके वर काढले आहे. शासनाने पशुधन विमा योजना राबवली पाहिजे. खरीप वाया गेला असून, रब्बी पिकांसाठी शेतात ओल नाही." -योगेश शिंदे, शेतकरी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.