येवला (जि. नाशिक) : येवल्याच्या माळरानावर प्रयोगशीलतेच्या बळावर अनेक शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे विक्रम केले आहे. अवर्षणप्रमाण उत्तर-पूर्व भागातील खिर्डीसाठे (ता. येवला) येथील युवा शेतकरी योगेश इप्पर यांनीही आगळावेगळा प्रयोग करत आपल्या शेतात सीताफळाची बाग फुलविली आहे. या बागेतील सीताफळांची थेट बांगलादेशला गोडी लागली आहे. अवघ्या ७० गुंठ्यात त्यांनी तीन लाखाचे उत्पन्न मिळविले आहे. कृषी विभागाने त्यांच्या प्रयोगशीलतेची दखल घेऊन त्यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. (Sitafruit from drought stricken Malran reached Bangladesh miracle of young farmer of Khirdisathe Nashik Latest Marathi News)
ब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे गाव असलेल्या खिर्डीसाठे येथे पाऊस झाला तर पाण्याची उपलब्धता असते. दहा वर्षांपूर्वी इप्पर यांनी ७० गुंठ्यात ६०० झाड लावून सीताफळाचा अनोखा प्रयोग शेतात केला. हळूहळू या झाडाला फळे येऊ लागली मात्र काहीतरी चांगले केले तर चांगले उत्पन्न मिळेल या विचाराने योगेश यांनी या झाडांची व्यवस्थित निगा राखत निर्यातक्षम सीताफळ पिकवले. त्यांच्या सीताफळांना बांगलादेशच्या बाजारात १२० रुपये किलो प्रमाणे भाव मिळाला आहे. त्याची ग्रेडिंग व पॅकिंग योग्य पद्धतीने करून सदर माल बांगलादेश येथे निर्यात केला जात आहे.
१९९६ पासून त्यांनी आजतागायत आधुनिक शेती अगदी चांगल्या पद्धतीने करायला सुरवात केली. कृषी सह्ययक हरिभाऊ खोमणे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. कृषी विभागाच्या मदतीने त्यांना ठिबक सिंचन योजनेचे अनुदान प्राप्त झाले. तर सीताफळ लागवड ही घन लागवड पद्धत केली आहे.
आतापर्यंत सीताफळाचे उत्पन्न व खर्च यांचा लेखाजोखा काढला तर त्यांना २० हजार खर्च आला आणि उत्पन्न तीन लाख रुपये झाले आहे. तसेच जलयुक्त शिवार अभियान या योजनेअंतर्गत त्यांनी शेतामध्ये मृद संधारण देखील खूप कामे केले आहेत. या बागेसाठी त्यांनी गांडूळ खत कंपोस्ट खत व हिरवळीचे खत देखील वापरले आहे. या कामांमध्ये त्यांना पत्नी मालती इप्पर यांचे सहकार्य लाभले आहे.
हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
पुरस्काराने झाला सन्मान
शेतातील त्यांची प्रयोगशीलता व निर्यातक्षम पीक घेऊन आदर्श उभा केला आहे. त्याची दखल घेऊन योगेश इप्पर यांना कृषी विभाग व आत्मा नाशिक यांच्या विद्यमाने त्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी संजय देशमुख, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश सायाळेकर, कृषी पर्यवेक्षक मधुकर वर्पे, कृषी सहाय्यक हरिभाऊ खोमणे यांचे मार्गदर्शन लाभले.
“इतर पीक शेतात घेताना अनेक संकटे येतात. कधीकधी केलेला खर्च सुद्धा वसुल होत नव्हता. म्हणून आम्ही पीक पद्धतीत बदल करून कृषी विभागाच्या मदतीने ठिबक सिंचनाचा वापर करून सीताफळ फळबागेतून चांगले उत्पादन आम्हाला मिळत आहे. आणखी सीताफळ व फळबागांची लागवड करणार आहे." - योगेश इप्पर, आदर्श शेतकरी, खिर्डीसाठे
“योगेश इप्पर उदयोन्मुख प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी सीताफळ बागेसाठी घेतलेली मेहनतीने त्यांना निर्यातदार व पुरस्कार विजेते बनवले आहे. भविष्यात कृषी विभाग त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल.” -हरिभाऊ खोमणे, कृषी सहाय्यक,येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.