Nashik Agriculture News : रब्बी पिकांसाठी अग्रेसर असणारा बागायतदारांचा जिल्हा यंदा दुष्काळामुळे हिरमुसला आहे. पाणीच नसल्याने हजारो एकर शेती ओस पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ५९ टक्के पेरणी झाली आहे. पावसाअभावी पिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावे तहानली आहेत.(So far 59 percent rabi sowing has been done in district nashik agriculture news)
जिल्ह्यात पावसाच्या पाण्यावरच शेतीचे भवितव्य अवलंबून असते. दिवाळीदरम्यान पाऊस झाला, तर रब्बीसाठी फलदायी असते, अन्यथा अर्धा जिल्हा रब्बीपासून दूरच असतो. येवला, मालेगाव, नांदगाव, सिन्नर या तालुक्यांना दर दोन किंवा तीन वर्षांच्या आत एक वर्ष रब्बीच्या पिकांवर पाणी सोडण्याची वेळ येते.
भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यातील रचना विषमतेची असून, अनेक भागात कालव्याचे पाणी पोहोचलेले नाही. जोडीनेच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात असल्याने फेब्रुवारीनंतर पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्रही अल्प आहे.
जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख ३५ हजार असून, रब्बीचे क्षेत्र एक लाख १३ हजार हेक्टरच्या आसपास आहे. एक हजार ६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावे रब्बी हंगामाची असून, दीड हजाराहून अधिक गावांची भिस्त खरिपावर आहे. जिल्ह्यात पाऊस समाधानकारक झाल्यास खरिपाच्या पेरण्या शंभर टक्क्यांपेक्षा अधिक होतात, अन्यथा रब्बी हंगाम अडचणीतच सापडतो.
विविध भागाला मिळणारे कालव्याचे पाणी शेतकऱ्यांनी खोदलेल्या विहिरी व कूपनलिका, अवर्षणप्रवण भागात झालेले हजारो शेततळ्यांमुळे जिल्ह्यातला रब्बीचा पॅटर्न वर्षागणिक बदलत आहे. दुष्काळी भागातही निफाड, दिंडोरीप्रमाणेच बागायत फुलत आहे.
यंदा पावसाळा संपला तरी जलस्रोत कोरडेच राहिल्याने खरिपाचीच वाट लागली. येवला, नांदगावसारख्या दुष्काळी तालुक्यात पावसाळ्यातही टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. येवल्यासह मालेगाव, सिन्नरमध्ये शासनाने दुष्काळी जाहीर केला आहे. या सगळ्या परिस्थितीचा रब्बी हंगामाला मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसतोय.
या वर्षी जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र घटणार असून, पीक पॅटर्नही बदलताना दिसतोय. विशेषत: कांदा, हरभरा या पिकांचे क्षेत्र वाढताना, तर गहू व रब्बी मका पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. आजपर्यंत गव्हाची ४४ टक्के पेरणी झाली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मकाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे.
उन्हाळ कांद्याचे पीक शेतकऱ्यांना हक्काचे वाटते, म्हणून कालवे, कूपनलिका व शेततळ्यांच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी सर्वाधिक प्राधान्य उन्हाळ कांदा लागवडीला दिले आहे. या खालोखाल थंडीसह थोड्या फार पाण्यावर येणाऱ्या ज्वारीकडे कल असून, शेती पडिक ठेवण्यापेक्षा थंडीच्या थोड्या फार ओलीवर येणाऱ्या हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी झाली आहे. अवर्षणप्रवण व दुष्काळी भागात हरभऱ्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.
हे आहेत थंडीचे फायदे...
तापमानातील घट फळपिकांना फार घातक ठरते. पिकांच्या आणि फळांच्या पेशी आकुंचन पावण्याची क्रिया स्वसंरक्षणार्थ होते. थंडीचा कालावधी चांगला असल्यास पिकांची वाढ चांगली आणि उत्पादन व उत्पादकतेत वाढ होते. यामुळे ज्वारी व हरभऱ्याच्या पिकाच्या फायद्यासाठी थंडीचा जोर वाढवा, अशी अपेक्षाही शेतकरी व्यक्त करतात.
कांदा पुन्हा आपलासा
जिल्ह्यात खरीप लाल, रब्बीचा रांगडा व उन्हाळी कांद्याची तब्बल दोन ते अडीच लाख हेक्टरवर लागवड होते. भावात सध्या मंदी असली, तरी उन्हाळी कांदा चाळीत साठवता येतो. शेवटी कांद्याच्या भावात तेजी दिसते, हा फायदा घेण्यासाठी अल्प पाण्यावरही निफाड, दिंडोरी, कळवण, सटाणा, देवळा, येवला, मालेगाव, नांदगाव आदी तालुक्यांत उन्हाळ कांद्याची लागवड सुरू आहे.
अशी झाली आतापर्यंत पेरणी
पिके- सर्वसाधारण क्षेत्र- पेरणी (हेक्टरमध्ये)
ज्वारी- ४०६५ - ६८४८ (१६८ टक्के)
गहू- ६४१५१ - २८४१४ (४४)
मका- ८४१९ - ७७३९ (९२)
हरभरा- ३५०८६ - २१३४० (६१)
एकूण- ११३५७६ - ६६६०३ (५९)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.