Soy Bean
Soy Beanesakal

Nashik Agricultural News : सोयाबीन उत्पादकांना दरवाढीची प्रतीक्षा! काढणी होऊन उलटले 4 महिने तरी भाव जैसे थे

सोयाबीनची काढणी होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला, तरी मालाला पाच हजारांच्यावर भाव नाही.
Published on

पिंपळगाव बसवंत : सोयाबीनची काढणी होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला, तरी मालाला पाच हजारांच्यावर भाव नाही.

यामुळे आपल्याजवळील सोयाबीन विकावे की अजून काही काळ थांबावे, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. काही शेतकरी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करीत असल्याचे चित्र आहे. (Soybean producers waiting for price increase 4 months passed since harvest prices same Nashik Agricultural News)

साधारणतः दिवाळीच्या सुमारास खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी करून ते शेतकऱ्यांच्या घरात येते. त्यावेळी जवळपास आजच्या एवढेच बाजारभाव होते.

गरजू शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना त्यावेळी सोयाबीन विकून टाकले, पण बऱ्याच शेतकऱ्यांनी भविष्यात भाववाढ होईल, या आशेने सोयाबीन साठवून ठेवले आहे.

मात्र, तीन ते चार महिने झाले, तरी बाजारभाव जैसे थे असल्याने सोयाबीनच्या दराचे काय होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

दरवाढीची घालमेल पिंपळगाव बाजार समितीचे उपबाजार असलेल्या पालखेड मिरचीचे येथे सुरू आहे. पालखेड उपबाजारात सध्या दररोज ३०० क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे.

उत्पन्नात कमालीची घट आल्याने अपेक्षित बाजारभाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती, पण तीही फोल ठरू लागली आहे.

हंगामात गरजेपुरते सोयाबीन विक्रीला काढून उर्वरित सोयाबीनचे भविष्यात भाव वाढतील, या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी माल साठवून ठेवला, पण आजही सोयाबीनचे बाजारभाव साडेचार हजार रुपयांपर्यंत आहेत.

दरम्यान, अडचणीत सापडलेले काही शेतकरी सोयाबीनची मिळेल त्या दराने विक्री करीत आहेत. शिवाय व्यापाऱ्यांनी हंगामात सोयाबीनचा साठा करून ठेवला आहे. पतसंस्था किंवा बँकांचे कर्ज उचलून वेअर हाऊसमध्ये व्यापाऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहे.

सोयाबीनमध्ये लाखो रुपये व्यापाऱ्यांनी गुंतविले आहेत. बँकांचे व्याज आणि सोयाबीन बाजाराचा चढ उतार पाहता बरेच व्यापारी आता अडचणीत सापडले आहेत.

Soy Bean
Nashik News: नांदगावला पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको! 22 दिवसांपासून दत्तनगरचा पाणीपुरवठा ठप्प

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

यंदा अल्प पावसामुळे सोयाबीन पिकाची फारशी वाढ झाली नाही. ऐन फुलोरा अवस्थेत पीक असताना, पुन्हा पावसाचा खंड, किडीच्या प्रादुर्भाव, तसेच मध्यतंरी आलेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात घट झाली.

दुसरीकडून मालाला भावही कमी राहिल्याने यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन फारसे फायद्यात राहिले नाही. कीटकनाशके, मशागत आणि शेतमजुरीचे वाढलेले दर पाहता सोयाबीनने शेतकऱ्यांना फार काही हाती लागू दिलेले नाही.

"सोयाबीनची काढणी होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला, तरी सोयाबीनच्या दरात वाढ होत नाही. त्यामुळे साठवून ठेवलेला सोयाबीन विक्री काढण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. आता मिळेल तो भाव घेऊन शेतकरी मालाची विक्री करीत आहेत."

-विजय गवळी, शेतकरी, नारायण टेंभी

"जगभरात सोयाबीनचे उत्पादन यंदा अधिक आहे. त्यातच सोयाबीन तेलाची मागणी व उपउत्पादनाच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे दर वधारताना दिसत नाहीत."

-मंगेश छाजेड, व्यापारी

Soy Bean
Nashik Water Crisis: विहिरींनी गाठलायं तळ, पाण्याचा बसेना मेळ! राजापूरला तीव्र पाणीटंचाई, टँकरची संख्या वाढविण्याची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.