अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून ऊस या पिकाकडे पाहीले जाते. त्यामुळे ऊस लागवडीकडे शेतकरी वळाले असतांना मात्र राजकीय स्वार्थ अन् कारखानदारांच्या मनमानी कारभारामुळे इगतपुरी तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील ऊस अद्यापही तोडणी झाली नसल्याने शेतात उभा आहे.
२५ हजार मेट्रिक टन ऊस शिल्लक राहणार
कारखानदार म्हणतात पाणी भरा म्हणजे वजन वाढेल तर पाणी द्यायचे मग ऊस काय मे महिन्यात तोडायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. हंगाम सुरू होवून चार महिने उलटले सोळा महिन्यांचा कालावधी होवूनही ऊसतोड न झाल्याने उभ्या ऊसाला तुरे फुटले आहे. त्यामुळे प्रतवारी घसरल्याने वजनात आणि प्रामुख्याने उताऱ्यात घट येणार आहे. त्यातच यंदाच्या हंगामातील २५ हजार मेट्रिक टन ऊस शिल्लक राहणार असल्याची भीती कृती समितीने व्यक्त केली असल्याने ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होणार आहे.
मार्च महिना सुरु होवूनही ऊसतोड कामगारांच्या टोळ्या दाखल न झाल्याने काही शेतकऱ्यांनी खाजगी दुग्धव्यवसायिकांना ऊस देण्याचे ठरवले मात्र टनाला अवघा चौदाशे ते पंधराशेचा भाव मिळत असल्याने टनामागे हजार ते बाराशे रुपये तर एकरी दीड लाखांचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे लांबलेल्या ऊसतोडणीमुळे एकूणच शेतकऱ्यांना हेक्टरी साडेतीन लाख म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हंगामात दीड कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून नाशिक सहकारी साखर कारखाना लवकरात लवकर सुरु करावा अशी मागणी इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या लाखोंच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?
प्रतिवर्षी नगर कारखाने नासाका कार्यक्षेत्रातील इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्यातील ऊस नेतात मात्र वर्षांपासून नगर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने ऊसाचे लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.त्यामुळे नाशिक साखर कारखाना क्षेत्रातील ऊस तोडणी ला नगर जिल्ह्यासह निफाड,तालुक्यातील कारखान्यांनी दुय्यम स्थान दिले आहे. त्यामुळे सोळा महिने होवूनही तोडणी न झाल्याने ऊसाला तुरे निघाले आहेत. यंदाच्या हंगामातील २५हजार मेट्रिक टन ऊस शिल्लक राहण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
"नाशिक कारखान्याच्या अंतर्गत येणाऱ्या चारही तालुक्यातील विद्यमान आमदारांसह लोकप्रतिनिधींनी व माजी पदाधिकाऱ्यांनी कारखाना सुरु करण्यासाठी केलेले प्रयत्न हे केवळ राजकीय स्वार्थ आणि श्रेयवादापोटी होते. कारखान्याला कोणी वालीच नसल्याने लोकप्रतिनिधी बिनधास्त अन् शेतकरी उध्वस्त हीच सद्यस्थितीत वास्तविकता आहे. सहकारी प्रशासनाच्या सहकार्यातून ठोस निर्णय घेण्याचा कृती समितीच्या विचाराधीन आहे.'' - मनोज सहाणे, अध्यक्ष नासाका बचाव कृती समिती.
"ऊस तोडणी हंगामातील चार महिने उलटूनही ऊस शेतात उभा आहे. तोडणी लांबल्याने तुरे निघाले आहे. त्यामुळे वजनासह उताऱ्यात घट येणार आहे. कारखानदार म्हणतात पाणी देत राहा, मग ऊस काय मे महिन्यात तोडायचे? दुग्धव्यवसायिकही निम्म्याहून कमी दराने खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या लाखोंच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? - दत्तात्रय पासलकर, शेतकरी तथा निवृत्त कर्मचारी नासाका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.