येवला : पालखेड डाव्या कालव्याला पाणी सोडले आहे. मात्र, पश्चिम विभागात पाट पाणी न सोडल्याने प्रहार शेतकरी संघटनेतर्फे सोमवार (ता. ९)पासून उपोषण सुरू करण्यात आले. (strike hunger strike for Palkhed canal water Farmers complain of not getting water when needed Nashik)
येथील पालखेड डावा कालवा पाटबंधारे विभागाकडे मागणी करूनही दखल न झाल्याने उपोषण सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने अद्याप पिण्यासाठीही विहिरींना पाणी नाही.
सध्या २० ते २५ दिवसांपासून पालखेड कालव्यास पूर पाणी सुरू असून, पश्चिम विभागातील चाऱ्यांना अत्यल्प पाणी सोडून पाणी बंद केल्याने परिसरात जनावरांसह वाडी वस्तींवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने त्वरित पाणी सोडणे आवश्यक आहे.
परिसरातील शेतकऱ्यांवर पाट पाण्याबाबत पालखेड कालवा विभागाकडून नेहमीच दुजाभाव होत असून, पाणी वेळेवर व आवश्यक तेवढे न मिळणे नित्याचेच झाले आहे.
त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या आर्थिक संकटास तोंड द्यावे लागते. यास केवळ पालखेड कालवा विभाग जबाबदार असून, यापुढे हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने एरंडगाव येथील पालखेड कालवा कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. पाणी सोडत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे ‘प्रहार’तर्फे सांगण्यात आले.
वास्तविक येवला तालुका कायम दुष्काळी म्हणून पालखेड धरण समूहाची निर्मिती झाली. त्यातील एकूण साठ्याच्या ५२ टक्के पाणी तालुक्यासाठी आरक्षित आहे.
केवळ राजकारणासाठी पाण्यासारख्या अमूल्य संपत्तीचा वापर होत असून, तालुक्याला नेहमीच पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा सर्रास गैरवापर होत असून, केवळ नियोजनाअभावी शेतकऱ्यांची उभी पिके डोळ्यादेखत जळताना बघावी लागतात.
याबाबत संबंधितांना जाब विचारत शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी माहिती प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी दिली.
तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी पाण्याच्या प्रश्नावर राजकारण बाजूला ठेवून पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
उपोषणस्थळी तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, उपाध्यक्ष रामभाऊ नाईकवाडे, संघटक किरण चरमळ, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील पाचपुते,
शिवनाथ ठोंबरे, अशोक खापरे, विजय ठोंबरे, वाल्मीक घोरपडे, निवृत्ती मढवई, प्रकाश साताळकर, भाऊसाहेब रंधे, ऋषिकेश काळे, मच्छिंद्र वरे, रावसाहेब आहेर, नितीन पगारे, विलास ठोंबरे, मच्छिंद्र थेटे, अमोल गाडे, साहेबराव पडोळ, तुकाराम ठोंबरे, शांताराम खकाळे, सागर घोरपडे, सुमित रंधे व बहुसंख्य शेतकरी उपस्थित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.