Nashik News : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील केंद्र सरकारच्या शिंदे दिगर एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलचे प्राचार्य अशोक बच्छाव यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी शिंदे दिगर एकलव्य स्कूलच्या तब्बल २३६ विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन करीत दिवसभर ठिय्या आंदोलन केले.
गेल्या महिन्यात या शाळेतील विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकावर कारवाईसाठी महत्त्वाची भूमिका घेणाऱ्या प्राचार्य डॉ. बच्छाव यांचीच बुधवारी (ता.७) आदिवासी आयुक्तालय प्रशासनाने पिंपळनेर (जि. धुळे) येथे बदली केली. (Students food sacrifice for principal stayed in school for whole day nashik news)
त्यामुळे संतप्त झालेल्या २३६ विद्यार्थ्यांनी सकाळपासून विद्यालयाच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन केले. प्राचार्य बच्छाव यांची अन्यायकारक बदली रद्द होईपर्यंत अन्नत्याग करून येथून हलणार नाही, अशी भूमिका संतप्त विद्यार्थ्यांनी घेतल्यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ झाली.
अजमीर सौंदाणे येथील एकलव्य रेसिडेन्शिअल स्कूल कॅम्पसमध्ये सध्या भरणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर येथील एकलव्य स्कूलच्या विद्यार्थिनींशी गैरवर्तनप्रकरणी येथील शिक्षक विनोद कहार यास १७ जानेवारीला निलंबित केल्यानंतर मंगळवारी (ता.६) गुन्हाही दाखल झाला आहे.
कहार हे गेल्या एक ते दीड वर्षापासून विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी होत्या. २७ सप्टेंबरला प्राचार्य बच्छाव या ठिकाणी रुजू झाल्यानंतर निवासी अधीक्षिका स्वाती पगार यांनी हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
याबाबत प्राचार्य बच्छाव यांनी विशाखा समितीचा अहवाल मागवून घेत तातडीने अभिप्राय पाठवत आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्तांमार्फत कहार यांच्यावर निलंबन कारवाईत यश मिळवले. मात्र या गंभीर प्रकरणात प्रशासनाने अधीक्षिका पगार यांना नाहक निलंबित केल्याचे बोलले जात आहे.
गेल्या २१ जानेवारीला संतप्त पालकांनी विद्यालयात येऊन अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता. राज्य महिला आयोगाच्या सदस्या माजी आमदार दीपिका चव्हाण आणि राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांच्यासमोर पालकांनी सत्य घटनेची इत्थंभूत माहिती दिली.
अधीक्षिका पगार आणि प्राचार्य बच्छाव यांच्यामुळेच या प्रकरणाला वाचा फुटली असून फक्त त्या दोषी शिक्षकावरच कडक कारवाईची मागणी संतप्त पालकांनी केली होती. तसा अहवाल संबंधित विभागाला दिल्याने संबंधित शिक्षकावर पोलिसांत गुन्हाही दाखल झाला. मात्र मंगळवारी (ता.६) सायंकाळी प्राचार्य बच्छाव यांनाही बदलीचा आदेश ईमेल द्वारे आला.
बुधवारी (ता.७) सकाळी नेहमीप्रमाणे प्राचार्य दिसत नसल्याचे बघून विद्यार्थ्यांनी विचारपूस केली असता सरांची बदली झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले. नववीपर्यंत शिकणारे हे सर्व विद्यार्थी जमा झाले आणि जोरदार घोषणाबाजी करत सरांची बदली होईपर्यंत हटणार नसल्याची भूमिका घेतली.
घोषणाबाजीतून प्रशासनाचा निषेध
विशेष म्हणजे बुधवार (ता.७) पासून चाचणी परीक्षा सुरू होणार होती. मात्र परीक्षा देण्यासही त्यांनी स्पष्ट नकार दिला. उपस्थित शिक्षकांनी त्यांना नाश्ता-जेवण घेण्याची विनंती केली. मात्र अमान्य केली. विद्यार्थी आंदोलन करत असल्याचे समजताच पालकांनी येथे धाव घेतली. सटाणा, अजमेर सौंदाणे येथील सामाजिक कार्यकर्ते येथे पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली.
दरम्यान ही बाब खासदार डॉ. सुभाष भामरे यांना कळल्यानंतर त्यांनी आयुक्तांशी चर्चा करत तातडीने या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. कळवण कार्यालयातील अधिकाऱ्यांनीही येथे पोचून विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य प्रा.अनिल पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर कदम, सटाणा पोलिस स्टेशनचे निरीक्षक बाजीराव पोवार, शिवसेनेचे लालचंद सोनवणे, भाजप नेते डॉ. विलास बच्छाव आदींनी घटनास्थळावर भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. मात्र विद्यार्थी त्यांच्या निर्णयावर ठाम होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.