नाशिक : (चांदवड) मातीचे घर, कुडाचे छप्पर, घरी वीजपुरवठा नाही...अशा स्थितीत रात्री दिव्याखाली अभ्यास करत बळीराजाच्या लेकीने गगनभेदी यश मिळविले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सोनाली छगन चव्हाण हिने बारावीत ८४ टक्के गुणांसह सरस्वती विद्याप्रसारक मंडळाच्या उच्च माध्यमिक विद्यालयातून अव्वल क्रमांक पटकावला. दिव्याखाली अभ्यास करताना सोनालीने केलेली कामगिरी उज्ज्वल अशीच आहे.
रात्र-रात्र दिव्याखाली अभ्यास करून यश
मुलीचे यश पाहून तिने केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान सोनालीच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर झळकतेय. वागदर्डी (ता. चांदवड) येथील सोनालीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मंगल व छगन चव्हाण यांची कन्या सोनालीने रात्र-रात्र दिव्याखाली अभ्यास करून यश मिळविले. हे गरीब दांपत्य आपल्या शेतातील मातीच्या घरात राहतात. घरची तीन-चार एकर जिरायती शेती. जवळ विजेची सोय नसल्याने घरी विजेचा दिवा कधी लागलाच नाही. सोनाली शाळेत हुशार, पण घरी वीज नाही. मात्र, जिद्दीच्या जोरावर तिने रोज रात्री दिव्याच्या प्रकाशात अकरा-बारापर्यंत अभ्यास केला. मुलगी अभ्यास करताना आई-वडिलांनाही तोपर्यंत जागे राहावे लागायचे.
सोनाली झोपल्यानंतर दिवा विझवत झोपणे हाच दिनक्रम...
दिवसभर शेतात काम करायचे अन् रात्री मुलीबरोबर जागायचे. अभ्यास करताना सोनाली झोपी गेल्यावर दिवा विझवत झोपणे, हाच तिच्या आई-वडिलांचा दिनक्रम झाला होता. एकदा तर अभ्यास करता-करता सोनाली झोपी गेली अन् विपरीत होता होता वाचले. दिव्यावर तिचे केस पडले... मात्र, दैव बलवत्तर चांगले म्हणून थोडक्यात संकट टळले. तेव्हापासून तिच्या अभ्यासाबरोबरच आई-वडिलांचे जागरण नित्याचे झाले.
मला आता डी.एड. करून शिक्षक होण्याचे स्वप्न आहे. आई-वडिलांचे कष्ट जवळून पाहिले असल्याने त्यांना हातभार लावण्याची इच्छा आहे. त्यांना नेहमी सुखी ठेवण्यासाठी आणखी शिकणार आहे. - सोनाली चव्हाण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.