Success Story : नौदलातील वैमानिकाच्या जीवनावर आधारित ‘टॉप गन’ या हॉलिवूड चित्रपटाने तरुणाईला भुरळ घातली असतांना, नाशिकच्या पुष्कराज थोरात या युवकानेदेखील गगन भरारीचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे.
पुष्कराजची भारतीय नौदलात वैमानिक पदावर निवड झाली असून, त्याचे स्वप्न साकार झाले आहे. (Success Story pushkaraj selected as Pilot in Navy Will join Naval Academy in Kerala for training nashik news)
गंगापूर रोडच्या सावरकरनगर येथील रहिवासी पुष्कराज अनिल थोरात याला नुकतेच भारतीय नौदल अकॅडमीकडून वैमानिक प्रशिक्षणासाठीचे पत्र प्राप्त झालेले आहे. त्यानुसार १७ जूनला तो केरळमधील एझिमाला येथे नौदल ॲकॅडमीत प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे.
सहा महिने प्री फ्लायिंग ट्रेनिंग घेतल्यानंतर पुढे एक वर्ष हैद्राबाद येथील एयर फोर्स अकॅडमीत प्रत्यक्ष उड्डाणाचे प्रशिक्षण घेईल. अठरा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर तो नौदलात वैमानिक बनून देशसेवेत रुजू होणार आहे.
त्याची नेव्हल एव्हिएशनच्या ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन पायलट’ या प्रवेश प्रक्रियेद्वारे निवड झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो नाशिकमधील सुदर्शन ॲकॅडमीच्या हर्षल आहेरराव यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करत होता. यासाठीची बंगळूरू येथे झालेल्या एसएसबी मुलाखतीत तो उत्तीर्ण झाला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
परीक्षा संपताच होणार रवाना
पुष्कराज सध्या कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला शिकत आहे. येत्या १६ जूनला त्याची अंतिम परीक्षा संपत असून, दुसऱ्या दिवशी १७ जूनला तो नौदल ॲकॅडमीत आपल्या प्रशिक्षणासाठी दाखल होत आहे.
पुष्कराजचे वडील अनिल थोरात सध्या संगमनेर येथे महावितरण कंपनीमध्ये कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. आई पूनम थोरात मानसशास्त्रीय सल्लागार आहेत. पुष्कराजने महाविद्यालयीन जीवनात क्रिकेट आणि व्हॉलिबॉलमध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहे.
"योग्यवेळी, योग्य मार्गदर्शनाखाली तयारी केल्यामुळे अंतिम वर्षाच्या निकालापूर्वीच पुष्कराजचे नौदल अकॅडमीत वैमानिकासाठीचे प्रशिक्षण सुरु होत आहे. इतर तरुणांनीही लवकरात लवकर ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्न करावे. पुष्कराजप्रमाणे कमी वयात मोठे ध्येय गाठावे."
- हर्षल आहेरराव, संचालक, सुदर्शन अकॅडमी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.