PSI Success Story : जगातील यशस्वी लोकांच्या यशाचे एकच रहस्य आहे. निरंतर मेहनत आणि धैर्य. जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही, जी मनुष्य साध्य करू शकत नाही.
फक्त आपण जे काही ध्येय पाहत आहोत ते साध्य करण्यासाठी न थांबता कठोर परिश्रम केले तर नक्कीच यश मिळते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे देवळा तालुक्यातील कापशी (भावडे) येथील शेतकरी कुटुंबातील रविकांत सुभाष भदाणे. (success story ravikant badhane become psi nashik news)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलग तीन वेळा अपयश आल्यानंतर देखील 'हार न मानता चौथ्या प्रयत्नात ‘पोलिस उपनिरीक्षक' या पदाला गवसणी घातली आहे.
रविकांत हा मूळचा कापशी (भावडे) ता.देवळा येथील रहिवासी. रविकांतचे प्राथमिक शिक्षण कापशी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल, देवळा येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण कर्मवीर रामरावजी आहेर या कॉलेज मध्ये झाले. पुढे त्याने भूगोल विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. नंतरच्या काळात घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्यामुळे रविकांतने नाशिक येथे पार्ट टाइम जॉब केला.
आपल्या मोठ्या भावासोबतच त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. भाऊ मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून नोकरीला लागला. त्यानंतर रविकांतने पार्टटाइम जॉब सोडून फक्त अभ्यासावर भर दिला. रविकांतने पहिली पूर्व परीक्षा दिली त्यात त्याला अपेक्षित यश मिळाले खरे मात्र, मुख्य परीक्षेतील यश संपादन करण्याची संधी १ मार्कने हुकली. पुन्हा दुसऱ्यांना मुख्य परीक्षा दिली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तेव्हाही पदरी निराशा आली. तिसऱ्यांदा मुख्य परीक्षा दिली पुन्हा यशाने हुलकावणी दिली. तिन्ही वेळेस यशाने थोड्या फरकाने हुल दिली. रविकांतने, चौथ्यांदा जोमात अभ्यासाला सुरवात केली अन् यशाला कवेत घेतले. मध्यंतरी कोरोना काळातील संचारबंदीच्या काळात रविकांतने शेतीची कामे केलीत. एमपीएससीसाठी कुठलाही क्लास व अभ्यास वर्ग लावला नाही.
केवळ स्वयंअध्ययनावर जोर दिला. या कालावधीत मुरकुटे व सर्वेश्वरी अभ्यासिका येथे स्वयं अध्ययन व अभ्यास सुरू ठेवला. ‘पोलिस उपनिरीक्षक ’ व्हायचं हाच एकमेव ध्यास असल्यामुळे इतर परीक्षांकडे रविकांतने लक्ष दिले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट 'ब' परीक्षा २०२० अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदाची निवड यादी मंगळवारी (ता. ४) जाहीर करण्यात आली.
त्यात कापशी (भावडे) येथील रविकांत सुभाष भदाणे या २९ वर्षीय युवकाने पोलिस उपनिरीक्षक पदावर आपले स्थान निश्चित केले. रविकांतच्या या असामान्य यशाबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे. नियमित अभ्यासाने यशाला गवसणी घालणे शक्य झाले असे रविकांतने "सकाळ"शी बोलताना सांगितले.
"वडिलांचे स्वप्न होते की, आपल्या मुलांनी उच्चशिक्षित होऊन चांगल्या पदावर नोकरी करावी. आज मोठा भाऊ सहाय्यक कक्ष अधिकारी व लहान भाऊ सैन्यदलात कार्यरत आहे. आम्ही तिन्ही भावांनी वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. माझ्या या यशाचे श्रेय मी परिवाराला व सहकारी मित्रांना देतो." - रविकांत भदाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.