किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा
Success Story : वडांगळी गावच्या यात्रेत आलेल्या तमाशातील गायक अचानकपणे ‘झिंगाट’ झाल्याने त्याच्या जागेवर वगनाट्य म्हणायला उभा राहिलेला सिन्नर तालुक्यातील निमगाव देवपूरचा ऋषीकेश उत्तम शेलार हा आता उत्कृष्ट गायक व संगीतकार म्हणून नावारूपास आला आहे.
त्याचा लहान भाऊ अनिकेत हा अफलातून बासरी वादक आहे. या दोन्ही भावांनी दिवसभर शेतातील काम करून मिळेल त्या वेळेत संगीताची आराधना केली. एका वगनाट्याने ऋषीकेशच्या आयुष्याला कलाटणी दिली. त्याच्या संघर्षमय जीवनाविषयी साधलेला संवाद...(Success Story Vaganatya in Tamasha made inspiring journey of Rishikesh and Aniket shelar nashik news)
- गायनाची आवड कशी निर्माण झाली?
ऋषीकेश : शाळेत असताना मी तमाशातील वगनाट्य पाठ केले होते. एकदा वडांगळी गावच्या यात्रेत तमाशा आलेला असताना त्यातील वगनाट्य म्हणणारा कलावंत ‘झिंगाट’ झाला. त्यामुळे तो स्टेजवर येत नव्हता.
गावातील लोकांना माहीत होते की मी वगनाट्य सादर करू शकतो. त्यांनी मला थेट स्टेजवर उभे केले आणि वगनाट्य सादर करायला लावले. वग सादर केल्यानंतर मला जाणीव झाली की आपणही गायक होऊ शकतो.
- जाणीव होऊनही इतके वर्षे उशीर का झाला?
ऋषीकेश : शाळेत असताना हा किस्सा घडला. त्यानंतर कुठे शिक्षण घ्यावे, याविषयी माहिती नव्हती. यात बराच कालावधी गेला. इयत्ता दहावी व बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. शाळेत असताना वडांगळीचे संगीत शिक्षक गणेश डोकबाने यांनी प्रथमत: संगीताविषयी माहिती दिली.
त्याआधारे लासलगाव येथे बाबासाहेब चव्हाणके यांच्याकडे गायन व संगीताचे धडे गिरवायला लागलो. आता पंडित प्रसाद खापर्डी यांच्याकडून संगीत व गायनाचे धडे घेत आहे.
- शेतात काम करून संगीत क्षेत्रात करिअर स्वप्न बघणे अशक्य नाही वाटले?
ऋषीकेश : देवपूरला आमची अडीच एकर शेती आहे. लहानपणापासूनच शेतातील कामे करत होतो. त्यात वेगळे काही वाटतच नाही.
गायींचे शेण व दूध काढणे, शेतातील सर्व कामे करूनच गायक होण्याचे स्वप्न बघत होतो. अगदी आजही शेतातील कामे नियमितपणे करतो. त्यात वावगे वाटण्यासारखे काहीच नाही.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
- अनिकेतने संगीत क्षेत्रात पाय रोवले आहेत.
ऋषीकेश : अनिकेत हा माझा लहान भाऊ आहे. माझ्याकडून त्याने प्रेरणा घेतली आणि बासरी वादन करायला लागला. त्याने संगीत विषयात पदवी घेतली आहे. तर त्याला पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घ्यायचे आहे. पण सध्या तो उत्कृष्ट प्रकारे बासरी वाजवतो.
- पहिले गाणे ते इंडियन आयडॉल मराठी हा प्रवास कसा पूर्ण झाला.
ऋषीकेश : पाऊस गाताना हे माझ्या आयुष्यातील मी निर्माण केलेले पहिले गाणे होते. त्यानंतर असंख्य गाणी मी गायली. त्यामुळे इंडियन आयडॉल मराठी सारख्या व्यासपीठावर गाण्याची संधी मला मिळाली. प्रसिद्ध संगीतकार अजय व अतुल यांनी मला गाण्याची संधी दिली.
- ‘कलगीतुरा’ या नाटकातून तुझे पदार्पण होत आहे, त्याविषयी
ऋषीकेश : दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘कलगीतुरा’ या नाटकाची ‘एनसीपीए’ या नाट्यसंस्थेने निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्याचे संगीत व लोकगीतांची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे मी अत्यंत जबाबदारीने ती सांभाळत आहे.
सत्यघटनेवर आधारित या नाटकात संगीत व कला या एकमेकांच्या हातात हात घेऊन सोबत पुढे जातात. लोकपरंपरा जोपासताना जुन्या गोष्टी नव्या पद्धतीने सजवल्या तर त्या जिवंत राहतील. त्यांना जिवंत करण्याचा माझा प्रयत्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.