मालेगाव : राज्यात दाभाडी विधानसभा मतदारसंघ मंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून नावलौकिक मिळवून होता. मतदारसंघ पुनर्रचनेत दाभाडीऐवजी शहरातील कॅम्प- संगमेश्वर मिळून मालेगाव बाह्य हा मतदारसंघ झाला. तालुक्यातील राजकारणात दाभाडीचे महत्व व नावलौकिक कायम असल्याने दाभाडी ग्रामपंचायत निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. ग्रामपंचातीच्या थेट सरपंचपदासाठी पालकमंत्री दादा भुसे यांचे दोन प्रबळ समर्थकच आमने- सामने भिडले आहेत. सरपंचपदासाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी अंतिम टप्प्यात तिरंगी लढत होईल, असा अंदाज आहे. तिरंगी लढतीत भुसे गटातील दोघांपैकी एक बाजी मारणार की भुसे गटातील दुहीची संधी विरोधक साधणार, याविषयी उत्सुकता आहे.
थेट सरपंचपदासाठी पालकमंत्री भुसे यांचे समर्थक माजी पंचायत समिती सभापती शशिकांत निकम, ग्रामपंचायतीतील विद्यमान सत्तारुढ पॅनलचे नेते व गिरणाकाठ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद निकम हे दोन प्रबळ समर्थक एकमत न झाल्याने आमने- सामने उभे ठाकले. अद्वय हिरे गटाचे संजय जगन्नाथ निकम विरोधकांचे एकमेव उमेदवार आहेत. माणुसकी फाउंडेशनचे ज्ञानेश्वर उर्फ नानाभाई निकम व माजी पंचायत समितीचे सदस्य संयोग निकम नशीब आजमावत आहेत.
शशिकांत निकम यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील ॲड. एल. के. निकम व आई रेणुका यांनी पंचायत समिती सभापती पद भूषवले आहे. पत्नी कावेरी निकम यांनी सरपंचपद भुषविले. संजय निकम यांना कौटुंबिक राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील दिवंगत जगन्नाथ सिताराम निकम गिसाकाचे माजी अध्यक्ष होते. भाऊ अशोक निकम बाजार समितीचे माजी संचालक आहेत. पत्नी संगीता माजी जिल्हा परिषद सदस्या आहेत.
प्रमोद निकम यांनी गेल्या पाच वर्षात गावात विविध विकासकामे करतानाच समर्थकांची चांगली फळी निर्माण केली. गेल्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी थेट सरपंच पदासाठी पराजित झाल्या असतानाही त्यांनी कामांचा धडाका सुरु ठेवला. त्याची सहानुभूती देखील श्री. निकम यांच्या पाठीशी आहे.
नानाभाई निकम यांनी माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण व अन्य सामाजिक कामांनी लक्ष वेधले. संयोग निकम हे शशिकांत निकम यांचेच चुलत भाऊ आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे ते समर्थक आहेत. तीनही प्रबळ उमेदवारांना जिल्हा पातळीवर ओळख आहे. सरपंचपदासाठीचे पाचही उमेदवार निकम आहेत.
अंतिम टप्प्यात होणार चुरस
स्थानिक पातळीवरील निवडणुकीत गावगाडा, भाऊबंदकी, वाडा, सुतकी नातगोत आदी प्रबळ असते. काहीवेळा जुने हेवेदावे, वाद व भाऊबंदकीत वितुष्टदेखील असते. अशा निवडणुकीत हे सारे उफाळून येते. त्यावर मात करत या सर्वांसह पक्ष कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन उमेदवारांना प्रचार करावा लागतो. अंतिमक्षणी लक्ष्मी देखील काम करते. तिघे उमेदवार प्रबळ असल्याने अंतिम टप्प्यात निवडणूक चुरशीची होईल.
१५ हजार ६०३ मतदार थेट सरपंचपदासाठी मतदानाचा हक्क बजावून आपला कारभारी निवडणार आहे. मतदार नवनेतृत्वाला संधी देत कारभारी करणार की जुन्या जाणत्यांकडेच कारभार सोपविणार हे लवकरच समजेल. तुर्त कडाक्याच्या थंडीतही दाभाडीतील राजकीय वातावरण तापले आहे.
सहा वॉर्डात ५२ उमेदवार रिंगणात
थेट सरपंचपदाशिवाय सहा वॉर्डातील १६ जागांसाठी ५२ उमेदवार नशीब आजमावत आहेत. यात शशिकांत निकम यांचे जनसेवा पॅनल, प्रमोद निकम यांचे दाभाडी ग्रामविकास पॅनल व संजय निकम यांचे कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल असे तिघा सरपंचपदाच्या उमेदवारांचे पॅनल निवडणूक रिंगणात आहेत. सरपंचपदाचे नानाभाई निकम व संयोग निकम हे अन्य दोन उमेदवार पॅनल निर्मिती करण्यात असमर्थ ठरले आहेत. सदस्यपदासाठी माजी उपसरपंच सुभाष नहिरे, प्रकाश अहिरे, किरण निकम, विजय देवरे, हरी निकम आदी काही प्रमुख उमेदवार नशिब आजमावत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.