पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास चार दिवसांनी प्रारंभ होणार असताना आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम या दोन मुत्सद्दी नेत्यांमध्ये डाव-प्रतिडावांचे राजकारण रंगले आहे.
आमदार बनकर यांनी निर्माण पिंपळगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये निर्माण केलेल्या सहा सोसायट्यांचे संचालक हे निवडणुकीत मतदार असण्याच्या मुद्द्यावर सहकार विभागाकडून स्थगिती मिळाल्याचे अधिकृत वृत्त आहे. पण अद्याप अधिकृत आदेश मिळाला नसल्याने बनकर व कदम गटांच्या इच्छुक उमेदवारांमध्ये चलबिचल सुरू आहे.
माजी आमदार कदम हे त्यासाठी मुंबईत चार दिवसांपासून तळ ठोकून असल्याचे समजते.त र आमदार बनकर हे ही अधिवेशनामुळे मुंबईत आहे. त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीच्या सत्तासंघर्षात शह-काटशह रंगला आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्याने आमदार बनकर यांना सहा सोसायट्यांच्या अस्तित्वासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
आमदार बनकर यांनी पिंपळगाव बाजार समितीची निवडणूक डोळ्यासमोर सप्तशृंगी महिला सोसायटी पिंपळगाव बसवंत, तारूखेडले, चांदोरी, पालखेड, नारायण टेंभी सहा सोसायट्यांची निर्मिती केली. बाजार समितीच्या निवडणुकीत नव्या सोसायट्यांचे संचालक मतदार असल्याने आमदार बनकर यांचे सोसायटी गटात पारडे अधिकच जड झाले.
तर त्यांचे विरोधक माजी आमदार अनिल कदम यांनी पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत स्वत: उमेदवारी करण्याबरोबरच तगड्या उमेदवारांचे पॅनल उभे करण्याचे आव्हान दिले होते. नव्या सहा सोसायट्यांमुळे अनिल कदम यांची डोकेदुखी वाढली होती.
त्यांनी थेट जिल्हानिबंधक व तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात मोर्चा काढून प्रशासन हादरून सोडले. सोसायट्या रद्द करण्याची मागणी केली. पण त्यात अपयश आले होते. पुढे कदम यांनी थेट न्यायालयात या सोसायट्यांना आव्हान दिले आहे.
न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
माजी आमदार कदम यांच्या समर्थकांनी प्रारूप मतदार यादी त्या सहा सोसायट्यांवर हरकत नोंदविली पण ती फेटाळली गेली. राज्यातील सत्तांतरामुळे त्या सहा सोसायट्यांना स्थगित मिळविण्यात अनिल कदम हे यशस्वी झाल्याचे वृत्त आहे.
त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कदम यांनी सहकारमंत्र्याकडून स्थगिती मिळविल्याची जोरदार चर्चा आहे. पण त्याबाबत आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही. यावर माजी आमदार अनिल कदम यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. तर शासनाच्या या निर्णयाविरोधात आमदार बनकर यांनीही उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.
मुंबईत सुरू असलेल्या घडामोडींवर निफाड मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. बनकर व कदम हे परस्परांना घेरण्याची संधी सोडणार नाही, हे गेल्या दोन दिवसांच्या नाट्यमय घडामोडींवरून स्पष्ट होते. सोसायटी गटातील ७८ मतांसाठी न्यायालयाचा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
''शासनाचा हा निर्णय अनाकलनीय आहे. सोसायटीचे कामकाज नियमित असताना संबंधित संचालकांना बाजार समिती निवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून दूर ठेवणे नियमबाह्य आहे. या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.'' - दिलीप बनकर, आमदार
''सहा सोसायट्यांना स्थगितीचा निर्णयाच्या आदेशाची प्रत हाती आल्यानंतर त्यावर बोलेल.'' -अनिल कदम, माजी आमदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.