Nashik News : सहल शालेय उपक्रमातील महत्त्वपूर्ण व आवडीचा उपक्रम आणि सहल म्हटली की मुलांना आनंद होणे स्वाभाविकच. मात्र जबाबदारी व प्रवास खर्च म्हणून ग्रामीण भागातील शाळा फारसा पुढाकार घेत नाही.
टाकळी (ता. मालेगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शैक्षणिक सहल मुंबई दर्शन करून सुखरूप पोचली. या बाल पर्यटकांच्या दिमतीला बडी अधिकारी मंडळी स्वतः सहली समवेत सहभागी झाली होती. (Takli children visit to Mumbai was unique nashik news)
चिमुकल्यांना मुंबई सफर घडविण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून गावचे भूमिपुत्र राज्य उत्पादन शुल्क अधिकारी दिगंबर शेवाळे करतात. यंदाची सहल गावगाड्याच्या मुंबई स्थित अधिकारी व त्यांच्या कर्मचारी यांच्या सहवासाने अनोखी झाली. तीन दिवशीच सहलीची शाही व्यवस्था करण्यात आली होती. विविध ठिकाणच्या प्रेक्षणीय स्थळांसह बोटिंग प्रवासाचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला.
गावच्या मातीतील लेकरांना अधिकाऱ्यांनी अंगाखांद्यावर घेऊन गाणी म्हणत नृत्य करून अहिराणी गीतांसह संबळ गीतावर ताल धरला. या सहलीचे सीबीआयचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी स्वागत करुन विद्यार्थांशी संवाद साधत साधला. एनआयएचे अधिकारी अशोक अहिरे, अनिल पाटील, पोलिस निरीक्षक शहाजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना खाऊ दिला.
विशेष म्हणजे या सहलीची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी घेऊन कौतुक केले. शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी टाकळी शाळेत जाऊन शिक्षकांना शाब्बासकी देत पालकांचे कौतुक केले.
मुख्याध्यापिका भारती जाधव, शिक्षक भगवान जाधव, सविता देवरे, किरण ठोके यांनी विद्यार्थ्यांची काळजी घेतली.
"शाळेने राबवलेला हा सहलीचा अनोखा उपक्रम कौतुकास्पद आहे. दोन रात्र व तीन दिवस विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन सुखरूपपणे घरी पोचले. बालवयात उच्च पदस्थ अधिकारी यांचा सहलीला लाभलेला सहवास भविष्य घडविण्यासाठी प्रेरक ठरणार आहे." -डॉ. नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी, नाशिक.
"गावच्या शिक्षणाचे वैभव असलेल्या गोरगरीबांच्या विद्यापीठातील लेकरांच्या चेहऱ्यावरचे हास्य हाच मला मिळालेला सर्वोच्च आनंद आहे. अशा शाळा समाजासाठी आदर्श ठरतात. शिक्षकांची मेहनत, कामाची पद्धत आदर्शवत आहे. 'टाकळी' मॉडेल म्हणून राज्यात पुढे आणण्यासाठी सदैव सोबत आहोत. गावच्या शाळा टिकवण्यासाठी गावच्या प्रत्येक भूमिपुत्राने पुढाकार घ्यावा." - दिगंबर शेवाळे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, मुंबई
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.