इगतपुरी (जि. नाशिक) : राज्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तब्बल ६५ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी 'टेट’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले असुन येत्या २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान ही परिक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. (TET Exam Schedule of tests required for teacher recruitment announced nashik news)
सदर परिक्षेचे वेळापत्रक आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. दोनशे गुणांच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित एकच प्रश्नपत्रिका या परीक्षेसाठी असणार आहे.या दोनशे प्रश्नांसाठी दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होत असल्याने त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.उमेदवारांची संख्या पाहून परीक्षेचे नियोजन होणार आहे.
साधारणतः दहा दिवस ही परीक्षा चालणार आहे.शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सध्या राज्यातील किती ऑनलाइन केंद्रे सुरू आहेत,तसेच परीक्षेसाठी फेब्रुवारी अखेरीस किती केंद्रे उपलब्ध होतील उमेदवारांची बैठक व्यवस्था, याची माहिती संकलित केली जात आहे.
खासगी शाळांना मुलाखतीचे बंधन : खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठे डोनेशन घेऊन शिक्षकांची भरती केली जात होती.आता ‘टेट’मुळे त्याला लगाम लागणार आहे.
एका जागेसाठी किमान दहा उमेदवारांना बोलावून मुलाखतीतून त्यांची निवड करणे बंधनकारक असणार आहे.तसेच केलेल्या सर्व कार्यवाहीचे रेकॉर्ड शालेय शिक्षण विभागाला सादर करावे लागणार आहे.जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरती ‘पवित्र’मधून मेरिटनुसार करण्यात येणार आहे.
दोन टप्प्यांत होणार ६५ हजार शिक्षक भरती : सध्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील २० लाखांवर विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण राहिलेले आहे.त्यामुळे दोन टप्यात शिक्षकभरती केली जाणार आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी त्यासंबंधीचे नियोजन करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये ३७ हजार आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये २८ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
त्यातील ५० टक्के पदे म्हणजेच ३३ ते ३५ हजार पदांची भरती केली जाणार असुन त्यानंतर सहा महिन्यांनी भरतीचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे.
दहा दिवस चालणार पारिक्षा
शिक्षक भरतीसाठी होणारी प्रत्यक्ष परीक्षा येत्या २२फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल ही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचे आयोजन करण्यापूर्वी परीक्षेच्या निकषांमध्ये काही आवश्यक सुधारणा करून शासन निर्णय जाहीर करण्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली आहे.
ऑनलाईन परिक्षेसाठी केंद्र संकलनाच्या कामाला वेग
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय २०१७ साली घेण्यात आला आहे.
त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्याच वेळी सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
परंतु, डिसेंबर २०१७ नंतर राज्यात पुन्हा कधीही संबंधित परीक्षा घेण्यात आलेली नाही. संबंधित परीक्षा ऑनलाईन घेण्याची कोणतीही यंत्रणा राज्य परीक्षा परिषदेकडे नाही. परंतु, शिक्षण विभागाशी संबंधित बाबींबाबत मार्गदर्शन,तसेच केंद्रस्तरावरील निरीक्षण या बाबी परीक्षा परिषदेच्या स्तरावरून करण्यात आल्या होत्या. त्याचपध्दतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पार पडणार आहे.
असे आहे वेळापत्रक :
●ऑनलाईन अर्ज भरणे : ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी ● शुल्क भरणेसाठी अंतिम मुदत ८ फेब्रुवारी ●प्रवेश पत्र मिळण्याचा दिनांक १५ फेब्रुवारी पासुन ●ऑनलाईन परिक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च
"राज्यात लाखो बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली आहे.राज्यात शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत.त्यामुळे राज्य शासनाने आता अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याचे जाहीर केल्याने अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे."- संतोष मगर,अध्यक्ष , डीटीएट बीएड स्टुडंट असोसिएशन.
"शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला होता.त्यानुसार शासन पातळीवरील निर्देशानुसार लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे."
- संजयकुमार राठोड, उपायुक्त तथा सदस्य सचिव ,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.