वडेल (जि. नाशिक) : राज्यात कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या टप्प्यात वाढला. ग्रामीण भागातही त्याचे लोण पसरले. मागील पंधरवड्यात ग्रामीण भागातील चित्र जास्त विदारक होते. कोरोनाने बाधित अनेक तरुण व वयस्कर नागरिकांना जीव गमवावा लागला. यातून बाहेर पडण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेने स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन केले. गावागावांत कडक निर्बंध व औषध व जंतुनाशक फवारणी झाली.
ग्रामीण भागात कठोर उपाययोजना फळाला
‘ब्रेक द चेन’ या उपायाची कठोर अंमलबजावणी करण्यात आली. लोकसहभागातून निधी संकलन करून मास्क, सॅनिटायझर व अर्सेनिक अल्बम औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. त्याचा चांगला परिणाम जाणवला. ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र कडकडीत बंद होता. आठवडेबाजार, यात्रोत्सव यांनाही बंदी होती. मास्कची सक्ती करण्यात आली होती. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर प्रथमच दंडात्मक कारवाईदेखील झाली. स्वयंसेवकांसह शिक्षकांनी जनजागृती केली. औषधी फवारणी, निर्जंतुकीकरणावर भर देण्यात आला. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. अजंग येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत प्रशासनामार्फत कोविड संशयितांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करून कोविड रुग्णांना मानसिक बळ देण्याचे काम झाले. याशिवाय विविध राजकीय पक्ष, तसेच सामाजिक संघटनांमार्फत अर्सेनिक अल्बम औषधी, मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात येत असून, ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे.
फक्त लढ म्हणा...!
वडेल येथील शिक्षक संदीप पगार विविध वेशभूषांमधून लसीकरणाबाबत जनजागृती करत असून, गावातील तरुण स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याबाबत आग्रही भूमिका घेताना दिसत आहेत. एकूणच गावपातळीवर ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागातील कर्मचारी, शिक्षक, आशा स्वयंसेविका, विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष, तरुण आपापल्या परीने कोरोनाला हरविण्यासाठी सज्ज झाले असून, त्यांना शासकीय पातळीवरून ‘फक्त लढ म्हणा’ इतक्याच कौतुकाच्या थापेची अपेक्षा आहे.
ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने केलेली कामे
-स्वयंस्फूर्त जनता कर्फ्यू, लसीकरण
-गावाचे निर्जंतुकीकरण
-विविध वेशभूषांमधून लसीकरणाबाबत जनजागृती
-सार्वजनिक ठिकाणी विनामास्क वावरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही
-कोविडच्या संशयित रुग्णांसाठी गावातच विलगीकरण कक्षाची व्यवस्था
-आरोग्य विभागामार्फत गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांवर घरोघर जाऊन उपचार
-‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत सर्वेक्षण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.