नाशिक : नॅशनल टेक्निकल ॲडव्हायसरी ग्रुप ऑन इम्युनाइजेशन (NITAGs) यांच्यातर्फे कोव्हिशील्डच्या (Covishield) दोन डोसमधील अंतर वाढविण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यानंतर सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. किमान १२ आठवडे अर्थात, ८४ दिवसांच्या फरकाने आता डोस दिला जाणार आहे. या निर्णयाला वैज्ञानिक (सायंटिफिक) आधार असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. असे असले तरी लशीच्या परिणामकारकतेचा आढावा वेळोवेळी घेत, कालावधीत सुधारणा करण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे. (There is a scientific reason behind increasing the gap between the two doses of Covishield)
केंद्र शासनाने सुधारित आदेश जारी केल्यानंतर राज्यातही कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील कालावधीत वाढ केली आहे. त्यानुसार शनिवार (ता. १५)पासून दुसऱ्या डोसकरिता येणाऱ्या नागरिकांच्या दुसऱ्या डोसकरिता अंतर किमान १२ आठवड्यांचे झाले आहे का, याची पडताळणी केली जात आहे. यासंदर्भात तज्ज्ञांचे मत जाणून घेतले असता, त्यांच्या सांगण्यानुसार निर्णयाला वैज्ञानिक आधार असल्याने भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. निरीक्षणांअंती हा निर्णय घेण्यात आल्याने तो स्वीकारायला हवा.
वेळोवेळी संशोधनाचा घ्यावा आधार
कोरोनाचा स्ट्रेन सातत्याने बदलत आहे. अशात सध्याच्या परिस्थितीला अनुसरून हा निर्णय घेतला असला तरी येत्या काळात वेळोवेळी जारी संशोधन अहवालांच्या आधारे निर्णय घ्यावा. त्यानुसार लसीकरणाच्या दोन डोसमधील अंतरामध्ये आवश्यक बदल करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच केवळ तुटवडा आहे म्हणून अंतर वाढविणे योग्य ठरणार नाही. लसीकरणात राजकारण आणायला नको, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
...तर गोंधळ निर्माण झाला नसता
यापूर्वी विविध पाश्चिमात्य देशांमध्ये लसीच्या दोन डोसमधील अंतर आठ ते १२ आठवड्यांपर्यंत ठेवलेले आहेत. भारतातही लसीकरण मोहीम सुरू केल्यावर पहिल्या टप्प्यात याचा आढावा घेणे अपेक्षित होते. नंतरच्या काळात लशींच्या तुटवड्याचा प्रश्न ऐरणीवर आला असताना दोन डोसमध्ये अंतर वाढविण्याचा निर्णय संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. लसीकरणाच्या सुरवातीलाच यासंदर्भात निर्णय झाला असता, तर गोंधळाची स्थिती उद्भवली नसती, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लशीची परिणामकारकता वाढीसाठी दोन लशींमध्ये किमान बारा आठवड्यांचे अंतर हवे असल्याच्या निर्णयाला संशोधनाचा आधार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय स्वागतार्ह असेल. परंतु लशींचा पुरेसा साठा नसल्याने किंवा अन्य कारणांनी असे निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. वेळोवेळी संशोधनाच्या आधारे निर्णय घेतले जावेत.
-डॉ. हेमंत सोननीस, अध्यक्ष, आयएमए नाशिक
देशभरात लशींचा तुटवडा जाणवत असल्याने अपयश लपविण्यासाठी केंद्र सरकार केविलवाणा प्रकार करीत आहे. लशींचा पुरवठा करण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याने, दोन लशींमध्ये अंतर वाढविण्याची वेळ ओढवलेली आहे. या निर्णयाला कितपत वैज्ञानिक आधार आहे, याची फेरतपासणी करण्याची आवश्यकता आहे.
-डॉ. अमोल वाजे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल
ब्रिटनसह अन्य काही पाश्चिमात्य देशांमध्ये पूर्वीपासून कोरोना प्रतिबंधक लशींच्या दोन डोसमधील अंतर आठ ते १२ आठवडे ठेवले आहे. भारतात घेतलेल्या निर्णयालाही वैज्ञानिक आधार असल्याने घाबरून किंवा गोंधळून न जाता, प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- डॉ. मृणाल पाटील, अधिष्ठाता, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय
(There is a scientific reason behind increasing the gap between the two doses of Covishield)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.