नाशिक : पहिल्या दु:खद घटनेतून सावरत नाही, तोच दुसरा निरोप येतो अन् या दोन्ही घटनांच्या भावनांना वाट मोकळी होण्यापूर्वीच तिसऱ्यांदाही तशीच बातमी येते. वेळ आली की, प्रत्येकाला जगाचा निरोप घ्यावाच लागतो पण, एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनामुळे जीव सोडवा लागल्याची हृदयद्रावक घटना क्वचितच घडते.
एकापाठोपाठ गेले तिघे
आईनंतर मोठा भाऊ आणि यानंतर वडिलांच्या निधनाचे दु:ख पचवत इतरांना सावरण्याचा प्रयत्न. यापेक्षा अधिक हेलावणारा प्रसंग कोणताच नसेल. अवघ्या पंधरा दिवसांत अशा दु:खांचे धक्के शहरातील देशपांडे कुटुंबीय सोसतेय. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी मंडळातील सदस्य आणि पेठे विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक वि. भा. देशपांडे (वय ७६) यांचे शुक्रवारी करोनामुळे निधन झाले. त्यांच्या पत्नी अपर्णा (७०) यांचे दहा ते बारा दिवसांपूर्वी, तर थोरला मुलगा आनंद (४६) यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेऊनही करोनाने कुटुंबाची पाठ सोडलेली नाही.
कुटुंबीयांसाठी अनपेक्षितच
देशपांडे यांचा दुसरा मुलगा अमोल यांच्यावर खासगी रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरू आहेत, तर, रंगूबाई जुन्नरे शाळेतील शिक्षक असलेला देशपांडे यांचा धाकटा मुलगा अमित हे सर्व विधी करीत आहेत. अवघ्या पंधरा दिवसांत घरात तीन मृत्यू घडले. काही दिवसांपासून जे काही घडतंय ते कुटुंबीयांसाठी अनपेक्षितच आहे. शुक्रवारी देशपांडे यांच्या निधनाचे वृत्त समजात शिक्षण वर्तुळात हळहळ व्यक्त होऊ लागली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सर्वजण सामिल असल्याचे सांगत शोक व्यक्त केला गेला.
सुहृदांनी जागविल्या आठवणी
वि. भा. देशपांडे शिक्षण पेठे विद्यालयात झाले. त्याच शाळेत शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. त्यांनी संस्थेच्या कार्यकारी मंडळात सदस्य हे पद बरेच वर्ष भूषविले. संस्थेच्या डी. एस. कोठारी कन्या शाळेच्या शाळा समिती अध्यक्ष पदाची जबाबदारीसुद्धा त्यांच्याकडे होती. त्यांचे गणित आणि विज्ञान या विषयांवर विशेष प्रभुत्व होते. त्यांना कधीच कोणताही आजार झाल्याचे आठवत नाही. ते कायम सर्वांना निरोगी राहण्यासाठी व्यायामाचा सल्ला द्यायचे. त्यांना गायनाची आवड असल्याने संस्थेच्या आणि बाहेरील काही कार्यक्रमात ते आवर्जून गायन करायचे, अशी आठवण संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी सांगितली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.