Kidney Disease: साडेतीन लाख लोक मूत्रपिंडविकारांनी त्रस्‍त..! ‘डायलिसिस’ च्या रुग्‍णसंख्येत दरवर्षी दोनशेने वाढ

बदलती जीवनशैली व इतर विविध कारणांनी शहरातील सुमारे साडेतीन लाख लोक हे सौम्‍य ते गंभीर स्वरूपाच्या मूत्रपिंड विकारांनी त्रस्‍त आहेत.
Kidney
Kidney esakal
Updated on

नाशिक : बदलती जीवनशैली व इतर विविध कारणांनी शहरातील सुमारे साडेतीन लाख लोक हे सौम्‍य ते गंभीर स्वरूपाच्या मूत्रपिंड विकारांनी त्रस्‍त आहेत. यापैकी वैद्यकीय स्‍थिती खालावलेल्‍या रुग्‍णांना ‘डायलिसिस’ प्रक्रिया करावी लागते.

दरवर्षी अशा रुग्‍णांमध्ये सुमारे दोनशेने वाढ होत असून, मूत्रपिंड निकामी होणाऱ्या रुग्‍णांच्‍या संख्येतही वाढ होते आहे. तुलनेत प्रत्‍यारोपणाचे प्रमाण नगण्य आहे. (Three half lakh people suffering from kidney disorders Annual increase in number of dialysis patients by two hundred nashik)

धकाधकीच्‍या जगण्यात कळत किंवा न कळत नागरिकांना अनेक व्‍याधींना तोंड द्यावे लागते. प्रामुख्याने जीवनशैलीतील होत असलेले बदल आजारांसाठी आमंत्रण ठरत आहेत. गेल्‍या काही वर्षांमध्ये इतर विविध आजारांप्रमाणे मूत्रपिंडविकाराच्‍या रुग्‍णांमध्येही वाढ नोंदविली गेली आहे.

शहरातील लोकसंख्येचा विचार केल्‍यास सुमारे साडेतीन लाख लोकांना सौम्‍य ते गंभीर स्वरूपाचे मूत्रपिंड विकार आहेत. सौम्‍य स्वरूपाच्या आजारांवर लवकर निदान व उपचार झाले नाहीत तर कालांतराने हे आजार गंभीर रुप धारण करत असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

चार हजाराहून अधिक रुग्णांना डायलिसिस

ग्रामीण भागासह उत्तर महाराष्ट्रातून रुग्‍ण शहरात डायलिसिस प्रक्रियेसाठी येतात. नाशिकचा विचार केल्‍यास छोटे व मोठे युनिट असलेले सुमारे वीस डायलिसिस सेंटर कार्यान्‍वित आहेत.

यामध्ये चार हजाराहून अधिक रुग्‍णांवर डायलिसिस प्रक्रिया केली जाते आहे. दरवर्षी सुमारे २०० रुग्‍णांची भर यामध्ये पडते आहे. रुग्‍णाच्‍या वैद्यकीय स्‍थितीनुसार आठवड्यातून किमान एकदा तर कमाल तीन वेळेपर्यंत केली जाते आहे.

मधुमेह, उच्च रक्‍तदाबाच्‍या निम्‍या रुग्‍णांमध्ये विकार

अनियंत्रित मधुमेह व उच्च रक्‍तदाब असलेल्‍या जवळजवळ निम्‍या रुग्‍णांना मूत्रपिंडाच्‍या विकारांचा सामना करावा लागतो आहे. यामध्ये मूत्रपिंड निकामी होणाऱ्या रुग्‍णांची संख्यादेखील लक्षणीय आहे.

त्‍यापाठोपाठ वारंवार मुतखडा होणाऱ्या रुग्‍णांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. वेळीच व योग्‍य उपचाराअभावी मूत्रपिंडाची कार्यक्षमता प्रभावित होऊन निकामी होत असल्‍याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले आहे.

ग्रामीण भागात क्षारयुक्‍त पाण्याच्‍या सेवनामुळे आजार जडत आहेत. व्‍यसनाधीनता हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. अवयव दानातून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून दिलेल्‍या दानातून प्रत्‍यारोपणाचा पर्याय उपलब्‍ध असतो.

एकीकडे डायलिसिस घेणाऱ्या रुग्‍णसंख्येत वाढ होत असताना, तुलनेत प्रत्‍यारोपण होणाऱ्या रुग्‍णांची संख्या अतिशय अल्‍प आहे. शहरात सहा ते सात रुग्‍णालयांमध्ये प्रत्‍यारोपण सुविधा असली तरी शस्‍त्रक्रियांची संख्या तोकडी आहे.

Kidney
Kidney Disease: किडनी स्टोनचा त्रास असेल तर ‘ही’ फळं खाणे टाळा, वाढेल तुमचाच त्रास

आजारावर लक्ष द्या, ‘क्रिएटीन’ महत्त्वाचा

मूत्रपिंडाची कार्यप्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी सुदृढ जीवनशैली महत्त्वाची ठरते. पोषक आहार, मिठाचे मर्यादित प्रमाण, पिण्याचे स्‍वच्‍छ पाणी, व्यसनांपासून दूर राहाणे महत्त्वाचे आहे.

मूत्रपिंडाची कार्यक्षमता दर्शविणाऱ्या ‘क्रिएटीन’ स्‍तर वैद्यकीय तपासणीतून लक्षात येऊ शकतो. डॉक्‍टरांच्‍या सल्ल्‍याने या स्‍तरावर नियमितपणे लक्ष ठेवण्याचा सल्‍ला दिला जातो आहे.

विकारांबाबत ठळक नोंदी..

* १०० पैकी १५ लोक मूत्रपिंडाच्‍या विकारांनी त्रस्‍त

* अनियंत्रित मधुमेह असलेले निम्‍मे रुग्‍ण होताय शिकार

* मूत्रपिंड निकामी झालेले शहरात दरवर्षी २०० रुग्‍ण डायलिसिसवर

* डायलिसिसवरील ८० टक्‍के रुग्‍णांना प्रत्‍यारोपणाची आवश्‍यकता

* प्रत्‍यक्षात १ ते २ टक्‍के रुग्‍णांचेच होतेय प्रत्‍यारोपण

"गेल्‍या काही वर्षांमध्ये मूत्रपिंडविकारांत वाढ झालेली असून, गंभीर स्‍थितीत डायलिसिस आवश्‍यकता असलेल्‍या रुग्‍णसंख्येतही वाढ होते आहे. प्रभावी औषधोपचारापासून प्रत्‍यारोपणापर्यंत रुग्‍णाचा जीव वाचविण्यासाठी बरेच पर्याय उपलब्‍ध आहेत. विकारांबाबत सामन्यांमध्ये जागृकता असणे आवश्‍यक असून, डॉक्‍टरांच्‍या सल्ल्‍यानुसार उपचार पूर्ण करावे."

- डॉ. नागेश अघोर, मूत्रपिंडविकार तज्‍ज्ञ.

"अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्‍तदाब असलेल्‍या रुग्‍णांपैकी निम्‍या रुग्‍णांना मूत्रपिंड विकाराच्‍या समस्‍येला सामोरे जावे लागते. त्‍यामुळे नियमित तपासणी व योग्‍य उपचार घेतल्‍यास भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकते. मुतखड्याच्‍या समस्‍येला गंभीरतेने घेताना योग्‍य उपचार घेणे आवश्‍यक असून अन्‍यथा मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका उद्‌भवतो. जीवनशैली चांगली राखणे, व्‍यसनांपासून दूर राहताना स्‍वच्‍छ पाणी पिल्‍यास आजारांपासून बचाव करता येईल."

- डॉ. किशोर वाणी, मूत्रपिंडविकार तज्‍ज्ञ

Kidney
Benefits of kidney beans : प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे राजमा; जाणून घ्या फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.