Milk Adulteration Crime : सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे दूध भेसळ करताना पकडलेल्या हिंगे बंधूंसह त्यांना भेसळीच्या साहित्याचा पुरवठा करणारा उजनी येथील हेमंत पवार यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर सिन्नर न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
त्यांची मंगळवारी नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. (three involved in sinnar milk adulteration case sent to nashik Central Jail crime)
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मिरगाव येथील ओम सद्गुरु दूध संकलन केंद्रात छापा टाकून संतोष विठ्ठल हिंगे व प्रकाश विठ्ठल हिंगे या दोघा भावांना कास्टिक सोडा व मिल्क पावडर च्या मिश्रणातून तयार केलेले भेसळीचे द्रावण संकलन केलेल्या दुधामध्ये टाकताना रंगेहात पकडले होते.
त्यांच्या घरातून देखील भेसळीचे साहित्य पोलिसांना तपासणीत मिळून आले. या दोघा भावांकडून मिळालेल्या माहितीवरून उजनी येथील हेमंत श्रीहरी पवार यांच्या गोदामावर छापा टाका येथे कास्टिक सोडा व मिल्क पावडरचा सुमारे अकरा लाख रुपये किमतीचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला होता.
दुधाची भेसळ हा विषय अन्न व औषध प्रशासनाच्या करीत येत असल्याने त्या विभागाच्या सह आयुक्त श्रीमती सुवर्णा महाजन यांनी वरील तिघांचे विरोधात वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अन्नभेसळ अधिनियमातील तरतुदीचा आधार घेतो पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
रविवारी तिघांना सिन्नर न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी ते ठेवण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते.
मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात तिघांची रवानगी करण्यात आली.
वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड या प्रकरणी तपास करीत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय सोबतच दूध भेसळ सारखे गंभीर प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला आहे. मिरगाव येथे झालेली कारवाई श्री. उमाप यांच्याच आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने केली होती.
पोलीस कोठडीत असलेल्या तिघा संशयितांची स्थानिक गुन्हे शाखेकडून सोमवारी पुन्हा चौकशी करण्यात आली. मात्र या तिघांकडून दूध भेसळीच्या संदर्भात माहिती द्यायला टाळाटाळ करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मिल्क पावडर व कास्टिक सोड्याचा पुरवठादार असलेला हेमंत पवार दूध भेसळीच्या प्रकरणांमध्ये यापूर्वी देखील अडकला होता. वर्षभरापूर्वी पाथरे येथे दूध भेसळीचे प्रकरण उघडकीस आले होते.
या प्रकरणाचे धागेद्वारे राहुरी मार्गे मुंबईतील एका केमिकल कंपनीपर्यंत पोहोचले होते. त्यात हेमंत पवार हा मास्टरमाईंड असल्याचे उघड होऊन देखील कठोर कारवाई झाली नव्हती.
आता देखील त्याच्या गोडाऊन मध्ये सापडलेला मिल्क पावडरचा साठा हा आरोग्यास अपायकारक नसल्याचे एफडीए कडून सांगण्यात येते. मात्र हे उत्पादन केवळ औद्योगिक वापरासाठी असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
पवार हा सदर मिल्क पावडर कोणत्या उद्योगांना पुरवठा करतो. त्याच्याकडे त्याबाबत अधिकृत परवाना आहे काय, त्याच्या पुरवठादारांच्या लिस्टमध्ये कोण कोण आहेत याचा शोध घेणे आवश्यक ठरणार आहे.
दूध भेसळीच्या कारवाई बाबत जिल्हा पोलिस अधीक्षक स्वतः लक्ष घालत असल्याने हेमंत पवारला बोलते केले तर सिन्नर सह निफाड, कोपरगाव तालुक्यातील दूध भेसळतील असंख्य चेहरे उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.