Nashik News : स्वेटरविक्रेत्या तिबेटींनी धरली उच्च शिक्षणाची कास; नाशिकमधील तिघे झाले डॉक्टर

अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये स्वेटर विक्री करणारे तिबेटियन नागरिक सर्वांनाच माहीत आहेत. या व्यवसायात आता त्यांची नाशिकमध्ये तिसरी पिढी आहे. मात्र नवीन पिढीतील तिघे पारंपारिक व्यवसाय करत व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण संपादन करून डॉक्टर झाले आहेत.
Nashik News
Nashik Newssakal
Updated on

-निखिल रोकडे

नाशिक : अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये स्वेटर विक्री करणारे तिबेटियन नागरिक सर्वांनाच माहीत आहेत. या व्यवसायात आता त्यांची नाशिकमध्ये तिसरी पिढी आहे. मात्र नवीन पिढीतील तिघे पारंपारिक व्यवसाय करत व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण संपादन करून डॉक्टर झाले आहेत. विशेष म्हणजे मिळविलेल्या ज्ञानाचा व पदवीचा उपयोग व्यावसायिक दृष्टिकोन न बाळगता आपल्याच तिबेटी बांधवांची निःस्वार्थी भावनेने सेवा करण्याची मनाशी खूणगाठ बांधली आहे.

डॉ. टेन्झिल सेलडम यांनी सोवारिगपा या तिबेटियन वैद्यकीयशास्त्रात पदवी मिळविली आहे. डॉ. टेन्झिल ल्हाकी हे एमबीबीएस, तर डॉ. टेन्झिल झोंपा एमए, बी.एड एम, फील, पीएच. डी धारक आहेत. चीनकडून ६५ वर्षांपूर्वी तिबेटवर ताबा मिळवण्यात आला. हजारो तिबेटी नागरिकांना देश सोडावा लागला.

त्यापैकी काही भारतामध्ये आश्रयास आले. त्यामधील काही कुटुंबे नाशिकमध्ये स्थायिक झाली. नम्र, कष्टाळू व प्रामाणिकपणा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये. सुरवातीला शालिमार येथे व त्यानंतर शरणपूर रोड येथे त्यांच्याच नावाने तिबेटियन मार्केट या परिसराला नवी ओळख मिळाली. तिबेटी नागरिकांच्या दोन-तीन पिढ्या नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून स्वेटर व उबदार कपड्यांची विक्री करत आहेत.

देशाची ओळख नसताना निर्वासित म्हणून ते आले. जगण्याच्या लढाईत कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी संघर्ष केला. आता त्यांची मुले मोठी होऊन व्यवसायात मदत करण्याबरोबरच शिक्षणाला दुसरा पर्याय नाही म्हणून उच्च शिक्षणाकडे वळले. काहीजण लष्करातही कार्यरत आहेत.

फक्त ९३ नागरिक

नाशिकमध्ये २००३ पर्यंत तिबेटी नागरिकांचा स्वेटर व उबदार कपडे विक्रीचा व्यवसाय शालिमार येथे सुरळीतपणे सुरू होता. मात्र त्यांना मनपा प्रशासनाने तिथून स्थलांतरित करत शरणपूर पोलिस चौकी मनपाच्या उभारलेल्या शेडमध्ये जागा दिली. त्या वेळी तुरळक लोकवस्ती असलेल्या परिसरात चार-पाच वर्षे त्यांच्या व्यवसायाला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. अनेक तिबेटी नागरिक कर्जबाजारी झाले आणि हळूहळू आपापल्या सोयीने इतरत्र स्थायिक झाले. त्यावेळी २३० तिबेटी होते. मात्र आता केवळ ९३ नागरिक तिबेटियन मार्केटमध्ये वास्तव्यास आहेत.

नाशिककरांनी जे प्रेम दिले, ते अनमोल आहे. त्यांच्यामुळे आम्हाला सुरक्षितता मिळाली म्हणूनच आमची मुले उच्च शिक्षित झाली. देशभरातील तिबेटी नागरिकांना सेवाभावी तत्त्वावर आपले ज्ञान व कौशल्य समर्पित करण्याचा या मुलांनी निर्णय घेतला आहे. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

आर. के. नमग्याल, अध्यक्ष, तिबेटियन वेल्फेअर असोसिएशन

आमचे कुटुंबीय व समाज बांधव गेली अनेक वर्षे संघर्ष करत अपार कष्टमय जीवन जगले आहेत. त्यामुळे आम्ही उर्वरित सर्व आमचे आयुष्य कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न बाळगता त्यांची सेवा करणार आहोत.

- डॉ. टेन्झिल सेलडम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.