Nashik Parking Problem : पोलिस आयुक्तालयाने शहरातील रहदारीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांची टोइंग करणे बंद केले आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी असलेल्या नो- पार्किंगमध्ये वाहनांची सर्रास पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे.
तर दुसरीकडे आयुक्तालयाकडून नवीन ठेकेदार नेमण्यासाठीची प्रक्रिया सुरू असली तरी ती अत्यंत संथगतीने सुरू आहे.
यामुळे शहराच्या मध्यवर्ती व रहदारीच्या ठिकाणी बेशिस्त वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जात सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. (Towing contract processing slow in city Rampant parking of vehicles in no parking lot nashik)
शहरातील वाहतूक व्यवस्था विनाअडथळा राहावी, बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी आणि नो- पार्किंगमधील वाहनांची टोइंग करून दंडात्मक कारवाई व्हावी, यासाठी शहर पोलिस आयुक्तालयातर्फे श्रम साफल्य या टोइंग ठेकेदारामार्फत कारवाई केली जात होती.
गेल्या वर्षी ठेकेदाराची मुदत संपली असता, त्यास तत्कालीन पोलिस आयुक्तांनी मुदतवाढ दिली होती. मात्र, गेल्या १५ मार्चपासून विद्यमान पोलिस आयुक्तांनी सदरील टोइंग ठेकेदारास मुदतवाढ दिली नाही.
त्यामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून शहरात नो-पार्किंगमधील वाहनांविरोधात टोइंगची कारवाई थांबली. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला. टोइंग कर्मचारी, वाहतूक पोलिस आणि वाहनधारक यांच्यातील वादाचे खटके थांबले आहेत.
परंतु, वाहतूक शाखेकडून ठराविक ठिकाणी आणि तेही वाहतूक सिग्नलवरच बेशिस्त वाहनचालकांविरोधात ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. तर, नो-पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांवर वाहतूक शाखेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या बेशिस्त वाहनचालकांची मुजोरी वाढली आहे.
बेशिस्त वाहनांच्या पार्किंगमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या होऊन वाहतुकीची कोंडी होते आहे. या नित्याचा त्रास सर्वसामान्य नाशिककरांना सहन करावा लागतो आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या ठिकाणी नित्याची कोंडी
स्मार्ट रोड, एमजी रोड, शिवाजी रोड, शालिमार, सिटी सेंटर मॉल, ठक्कर बाजार, झेडपी रोड या ठिकाणी रस्त्याच्या कडेला चारचाकी व दुचाकी वाहनांची पार्किंग केली जाते. टोइंग सुरू असताना याच ठिकाणांवरून सर्वाधिक वाहनांची टोइंग होत असे.
टोइंग बंद झाल्यापासून या ठिकाणी बेशिस्त वाहनचालक बिनधास्तपणे आपली वाहने पार्क करतात. काही रस्त्यालगत तर पार्क केलेल्या वाहनांच्या दोन-दोन रांगा लागतात.
यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने उद्भवते आहे. याकडे वाहतूक पोलिसांकडूनही सोईस्कररीत्या दुर्लक्ष होते आहे.
"टोइंग निविदा संदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत लवकरच आढावा घेऊन पुढील प्रक्रिया जलदगतीने सुरू करण्यात येईल."
- सचिन बारी, सहायक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक शाखा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.