नांदगाव (जि. नाशिक) : रेल्वे मार्गावरील वाहतुकीला होत असलेल्या विलंबाला पर्याय म्हणून फाटक बंद करून तयार करण्यात आलेल्या नव्या भुयारी मार्गाची (Sub-way) नाकाबंदी होऊन वाहतूक कोंडीच्या समस्येत पुन्हा एकदा भर पडली आहे. त्यामुळे नांदगावकरांच्या नशिबी वाहतूक कोंडी कायमच आहे.
तांत्रिक दोषामुळे यंत्रणा ठरतेय कुचकामी
अरूंद रस्त्यांनी व्यापलेल्या शहरातून बाहेर पडण्यासाठी असलेले रेल्वे फाटक बंद करण्यात आले. पर्याय म्हणून स्वीकारण्यात आलेल्या विवादास्पद भुयारी मार्गातील तांत्रिक दोष तसेच राहून गेल्याने पावसाळा नसतानाही झिरपणाऱ्या पाण्यामुळे तो लक्षवेधी ठरला. आता ऐन पावसाळ्यात या भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्याचा उपसा करणारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. विशेष म्हणजे भुसावळ विभागाचे मंडल महाप्रबंधक एस. एस. केडिया यांनी स्थानिक रेल्वे स्थानकाला भेट देत परीक्षण केले. त्यांच्या भेटीत त्यांनी कुठली निरीक्षणे नोंदविली व उपाययोजनांच्या पातळीवर कुठले अभिप्राय नोंदविले अथवा सूचना केल्यात, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
प्रशासनाच्या मर्यादांवर प्रश्नचिन्ह
केडिया यांच्या भेटीच्या दुसऱ्या दिवशीच भुयारी मार्गातील पाण्याची गळती कायम होती. तर दुसरीकडे भुयारी मार्गातील अरूंद रस्त्यावरून हलक्या वाहनांच्या कोंडीने पुन्हा एकदा पालिका, पोलिस व रेल्वे प्रशासनाच्या मर्यादांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. भुयारी मार्गाच्या जुन्या बंद फाटकाच्या एंट्रीला छोट्या - छोट्या टपऱ्यांनी वेढा घातला असून, हे कमी काय म्हणून आठवडे बाजार, सणानिमित्त जागा न मिळालेल्या व्यावसायिकांनी जमिनीवरच पथाऱ्या टाकल्यात. तर दुचाकीस्वारांनी पार्किंगसाठी सब-वेच्या मोकळ्या जागेचा वापर केला. परिणामी, वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली. भुयारी मार्ग (Sub-way) मधून प्रवेश करताना व बाहेर पडण्यासाठी वाहनधारकांना पुढे सरकण्यासाठी विविध मार्ग काढावे लागत आहे.
पोलिस, पालिका यंत्रणाही बेदखल...
अशा तऱ्हेने तांत्रिकेतच्या कसोट्यावर सदोष ठरलेल्या भुयारी मार्गाचा दुसरा अध्याय सुरू झाल्याने ‘याचसाठी केला होता का हट्टाहास’ अशी अवस्था या झाली आहे. शहरातील वाहतूक कोंडीबाबत पोलिस व पालिकेच्या यंत्रणांनाही दखल घ्यावीशी वाटलेली नाही. अगोदरच आरेखनात अरूंद झालेला रस्ता अधिक संकोचला गेल्याने सामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्येत नव्याने अजून एका समस्येची भर पडली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.