आयुक्त रमेश पवार यांची 120 दिवसांतच बदली; शिंदे-फडणवीस सत्तास्थापनेची परिणती

nmc commissioner transfer latest marathi news
nmc commissioner transfer latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : नाशिककरांच्या मनात घर केलेल्या महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner ramesh pawar) यांची राज्य शासनाने अवघ्या १२० दिवसांमध्ये शुक्रवारी (ता. २२) तडकाफडकी बदली (Transfer) केली. बदलीमागचे ठोस कारण दिले नसले, तरी राज्यात शिंदे सरकार (Eknath shinde Government) स्थापन झाल्याचा हा परिणाम मानला जात आहे.

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासूनच आयुक्त पवार यांच्या बदलीची चर्चा होती. त्यावर शुक्रवारी (ता. २२) शिक्कामोर्तब झाले. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची आयुक्तपदावर नियुक्ती करताना त्वरित कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Transfer of NMC Commissioner Ramesh Pawar within 120 days Nashik Latest Marathi News)

कथित म्हाडा सदनिकांच्या घोटाळ्याचे निमित्त करून कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली करण्याच्या सूचना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार जाधव यांची बदली करताना त्यांच्या जागी मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार बदली झाल्याने पवार यांच्या नियुक्तीला महत्त्व प्राप्त झाले होते. मुंबई महापालिकेचे केडर असताना नाशिक महापालिकेत बदली झाल्याने थेट ‘मातोश्री’चाच वरदहस्त असल्याची चर्चा होती;

परंतु आयुक्त पवार यांनी त्यांच्या कामकाजात असा कुठलाही आविर्भाव आणला नाही. उलट १२० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांच्या कामकाजातून कार्यक्षमता सिद्ध केली. भूमिपुत्र असल्याने गोदावरी नदी संदर्भात त्यांना आस्था होती. आयुक्तपदाच्या कार्यकाळात गोदावरी स्वच्छतेचा प्रश्‍नासह नमामि गोदा प्रकल्पासाठी ते आग्रही होते.

गोदावरी स्वच्छतेची पहाटे पायी व रिक्षातून फेरफटका मारून पाहणी करणे नाशिककरांना भावले. तातडीने निर्णय घेणे व काम मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा नाशिककरांना पसंत पडला. महापालिकेच्या कामकाजातदेखील त्यांनी मोठी सुधारणा घडवून आणली.

पालिका कर्मचाऱ्यांचे काम पाहून त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील राहिले. त्यातूनच सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा होत आहे.

nmc commissioner transfer latest marathi news
जिल्ह्यात आणखी 8 धान्य गुदाम; धान्याची साठवण क्षमता होणार चौपट

महापालिकेवरचे दोन हजार ८०० कोटींचे दायित्व ही डोळ्यात खुपणारी बाब त्यांनी खोडली. अनावश्यक कामांना कात्री लावताना सध्या जवळपास ६०० ते ७०० कोटींचे दायित्व कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

कार्यालयीन वेळेत नियोजित कार्यक्रम व साइट व्हिजिट वगळता पालिका मुख्यालयात ठाण मांडून बसल्याने त्यातून कामावर नियंत्रण निर्माण करण्यात पवार यांना यश आले. महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये गोंधळ असल्याची बाब समोर आल्याने कर्मचाऱ्यांना थेट निलंबनाचा इशारा देत याद्या दुरुस्त करून घेतल्या.

एकंदरीत अवघ्या १२० दिवसांत नाशिककरांवर आयुक्त पवार यांच्या कामकाजाची चांगलीच छाप पडली, असे असताना शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात त्यांची झालेली बदली नाशिककरांसाठी आश्चर्यकारक मानले जात आहे.

पुलकुंडवार ३४ वे आयुक्त

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे चौतिसावे आयुक्त म्हणून ते पदभार स्वीकारतील. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी त्या संदर्भातील आदेश पारित केले आहेत.

नवनियुक्त आयुक्त डॉ. पुलकुंडवार शनिवारी (ता. २३) कार्यभार स्वीकारतील, असे बोलले जात आहे. डॉ. पुलकुंडवार नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. १९९३ मध्ये यवतमाळ तहसीलदार म्हणून त्यांची प्रथम नियुक्ती झाली.

त्यानंतर अमरावती, जालना, हिंगोली व नांदेडमध्ये त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. २०१६ मध्ये ते आयएएस झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक होते. २०१८ पासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक आहेत.

nmc commissioner transfer latest marathi news
Nashik : 2 बॅटऱ्यासह डिझेलची चोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.