Nashik News : नाशिक तालुक्यातील सारूळ, राजूरबहुला आणि पिंपळद येथील १५ खाणपट्टाधारकांचे महाखनिज प्रणालीमध्ये ऑनलाइन सुरू असलेले वाहतूक पास (ईटीपी) बंद करण्याचा निर्णय अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी घेतला आहे. (Transport pass of mining lease drivers in taluka blocked by district administration Nashik News)
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जिल्हा प्रशासनाने सारूळ, राजूरबहुला व पिंपळद या परिसरातील २१ खडीक्रशरवर कारवाई करत ते सील केले होते. खडीक्रशरचालकांनी नियम पाळले नसल्याचा ठपका ठेवत परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात उत्खनन केल्याचे सांगत प्रशासनाचे सदर कारवाई केली होती.
या कारवाईविरोधात क्रशरचालकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यात न्यायालयाने अपर जिल्हाधिकारी यांना सुनावणी घेऊन योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश दिले होते.
त्यानुसार अपर जिल्हाधिकारी पारधे यांनी सुनावणी घेतली. मात्र त्यात त्यांनी खाणपट्टा आदेशातील अटी व शर्ती ८, ९ व १४ चा भंग केल्याचे दिसून आले. खाणपट्ट्यात किती उत्खनन झाले, याची दैनंदिनी नोंदवही ठेवलेली नाही.
खाणपट्टा परिसरात सीमांकन केलेले नाही, डोंगर/टेकडी कटिंग करताना सहा मीटर नियमाचे पालन केलेले नाही. तसेच खाणपट्ट्याचे निष्पादन (करारनामा) करून घेतलेला नाही. टेकड्यांचे शिखरे व उतार या ठिकाणावरून गौणखनिजाचे उत्खनन करता येणार नाही, असे खाणपट्टा आदेशात अटी व शर्तीत असूनही टेकड्यांची शिखरे व उतारावर उत्खनन करण्यात आले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ज्याठिकाणी खाणपट्टा डोंगराळ भागात असेल तेथे डोंगररांगांचे उभे उत्खनन करता येणार नाही, असे अटी-शर्तीत नमूद असूनही डोंगराळ भागातील डोंगररांगांचे उभे उत्खनन करून गौणखनिज उत्खनन होत असल्याचे दिसून आले आहे.
या त्रुटींबाबत खाणपट्टाधारक यांना ३ जून २०२२ ला नोटीस देऊन सात दिवसांत खुलासा सादर करण्याची संधी देण्यात आली होती.
याबाबत खाणपट्टाधारक यांनी सादर केलेला लेखी खुलासा केवळ नकारात्मक स्वरूपाचा असल्याने व आढळून आलेल्या त्रुटींबाबत कोणतीही समाधानकारक उत्तरे दिलेली नसल्याने अपर जिल्हाधिकारी पारधे यांनी १५ खानपट्ट्यांच्या उत्खननावर बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश काढले आहेत.
दरम्यान, पारधे यांच्या आदेशाविरोधात खाणपट्टाचालकांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली असल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.